प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधी पाहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळालं नवं बळ

प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधी पाहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळालं नवं बळ

प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणांना आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असून, काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा खेळी करत खरंच लोकसभा निवडणूक काँग्रेसने किती गंभीर घेतली आहे हेच दिसते. गेल्या काही वर्षांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उंचावलेली प्रतिमा आता प्रियंका गांधींमुळे नक्कीच नवसंजीवनी देणारी ठरेल.

दहा 2004-2014 अशी दहा वर्षे सत्तेत राहिल्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झाली. यानंतर काँग्रेस पुन्हा उभारी घेईल की नाही असे प्रश्न उपस्थित झाले. या जोरदार पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यापुढे काँग्रेसला बदलणे गरजेचे होते. काँग्रेसने हेच ओळखत आपल्या पूर्ण कार्यपद्धतीत बदल केले. सर्वांत मोठे काम म्हणजे सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडून राहुल गांधी यांच्यावर जबाबदारी सोपविली. राहुल गांधी यापूर्वी उपाध्यक्षपद संभाळत असले तरी त्यांच्याकडे पक्षाची पूर्णपणे जबाबदारी नव्हती. अखेर ती त्यांच्यावर आली आणि काँग्रेसची धुरा पुढे नेण्यास त्यांनी सुरवात केली. याचाच फायदा हळूहळू का होईना काँग्रेसला होताना दिसत आहे. राहुल गांधींनी गुजरातमध्ये भाजपला जोरदार लढत दिली. कर्नाटकात धजदच्या साथीने सरकार स्थापन केले आणि त्यानंतर तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या हिंदी पट्ट्यात काँग्रेसचा झेंडा रोवला. राहुल गांधींनी ज्येष्ठांना आपले ज्येष्ठत्व देऊन यंग ब्रिगेड तयार करण्याची सुरवात केल्याची या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसते. यामध्ये राजीव सातव यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली. तर, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया या सारख्या युवा नेत्यांकडे राजस्थान, मध्य प्रदेशची जबाबदारी होती. आता याच पंक्तीत एक मोठे नाव आले ते खुद्द राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांचे.

उत्तर प्रदेशमधील विजयाची गणिते देशाची गणिते ठरविते, हे म्हणतात ते चुकीचे नाही. कारण, उत्तर प्रदेशातील 80 जागा या संसदेत कोण बसविणार हे ठरवत असते. 2014 मध्ये पण असेच झाले होते. भाजपने एक हाती जागा जिंकून देशभरात कमळ फुलविले होते. आता याच उत्तर प्रदेशने काँग्रेसने आपला हुकुमी एक्का उतरवत भाजपसह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांना खुले आव्हान दिले आहे. सप आणि बसपने आघाडी करत काँग्रेसला दूर ठेवले होते. याला उत्तर म्हणून काँग्रेसने प्रियंका गांधींना सरचिटणीस पद देऊन पूर्व उत्तर प्रदेशचे प्रभारी केले आहे. पूर्व उत्तर प्रदेश म्हणजे काँग्रेसचे दोन बालेकिल्ले अमेठी आणि रायबरेली याच भागात येतात. याबरोबरच नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीही याच भागात येतो. त्यामुळे काँग्रेस या भागात कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधी पाहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेशात लढण्यासाठी नवे बळ मिळेल. आयर्न लेडी अशी उपमा असलेल्या इंदिरा गांधींसारखी कामगिरी प्रियंका गांधींकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. त्याची सुरवात झाली असून, काँग्रेसला खरंच प्रियंका गांधी हात देऊन सत्तेपर्यंत नेतील हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com