रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के रुग्ण "एचआयव्ही' बाधित

रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के रुग्ण "एचआयव्ही' बाधित

पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून निष्पन्न झाले आहे. 

ऐच्छिक व नियमित रक्तदानास प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहेच; पण त्याचबरोबर रुग्णाला दिला जाणारा रक्ताचा प्रत्येक थेंब सुरक्षित असणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी रक्‍त संक्रमणातून संक्रमित होणाऱ्या जंतूंचा (ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्‍शन्स - टीटीआय) प्रसार रोखण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञान वापरणे आवश्‍यक आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जनकल्याण रक्तपेढीतर्फे परिषदेचे आयोजन केले होते. त्यात "टीटीआय'वर चर्चा झाली, त्यातून ही माहिती पुढे आली. 

जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी, रॉश डायग्नॉस्टिक्‍स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रवण सुब्रमण्यम व "मेडिकल व सायंटिफिक अफेअर्स' विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सेवलीकर यात सहभागी झाले होते. 

डॉ. सेवलीकर म्हणाले, "दान केलेल्या रक्तातील संसर्ग शोधण्यासाठी अद्ययावत चाचण्या उपलब्ध आहेत. त्यातून रक्तात असलेल्या; पण निदान न झालेल्या जंतूंचे निदान होते.'' 

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ""रुग्णाला तातडीने सुरक्षित रक्तपुरवठा होण्यासाठी नियोजित रक्त संक्रमणाची गरज असते. यासाठी हे संपूर्ण क्षेत्र व विनामूल्य ऐच्छिक रक्तदानाची तयारी असणारे दाते यांच्या वर्षभरातील सहयोगामुळेच हे केवळ शक्‍य होते. सर्वांना सर्वंकष आरोग्यसेवा द्यायची असेल तर प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित व दर्जेदार रक्ताचा पुरवठा होणे गरजेचे असते. जनकल्याणमध्ये आम्ही "एनएटी टेस्टिंग'मुळे 70 महिन्यांत 111 जणांचे आयुष्य "टीटीआय'पासून वाचवू शकलो, ही समाधानाची बाब आहे. 

डॉ. श्रवण सुब्रमण्यम म्हणाले, ""जगभर 20 टक्के देशांनी "एनएटी टेस्टिंग' सक्तीचे केले आहे. सक्षम डायग्नॉस्टिक्‍समुळे आपल्याला सुरक्षित रक्तपुरवठा करून सुरक्षित केले जाते.'' 

"एनएटी टेस्टिंग'ची गरज 
राज्यातील रक्तपेढ्यांनी "एनएटी' टेस्टिंगसारख्या आधुनिक रक्त तपासणी पद्धती अवलंबण्यावरही भर देण्यात आला. देशभरात सुमारे अडीच हजार रक्तपेढ्या आहेत. त्यांपैकी जेमतेम दोन ते तीन टक्के रक्तपेढ्या "एनएटी टेस्टिंग' करतात.

Web Title: Blood transfusion has resulted in 169 patients being HIV-infected

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com