लग्नाचं बजेट 'झिरो' रुपयात, धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयातर्फे विवाहसोहळा

लग्नाचं बजेट 'झिरो' रुपयात,  धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयातर्फे विवाहसोहळा

पुणे - दुष्काळाची स्थिती, त्यात घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम, लग्न समारंभावर खर्च करण्याची ऐपत नाही. यावर मार्ग काढण्यासाठी जात-पात, धर्म न पाहता नियोजित वधू-वरांकडून एकही रुपया न घेता जोडप्याचे नातेबंध जुळविण्यात धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांत विविध संस्थांच्या मदतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यांत ५७ जोडप्यांचे शुभमंगल झाले आहे.

पुण्यात धर्मादाय सहआयुक्‍त दिलीप देशमुख, धर्मादाय उपायुक्‍त नवनाथ जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत पुण्यासह जेजुरी आणि परभणी जिल्ह्यातील पाथरी या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले. या तीन सोहळ्यांत ५७ जोडप्यांची लग्ने झाली. धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयाने सामाजिक संस्थांच्या मदतीने वर्षभरात एक हजार जोडप्यांचा विवाह करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. 

सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांना नोंदणी शुल्कही द्यावे लागणार नाही. नववधूला मंगळसूत्र, वधू-वर दोघांना कपडे, संसारोपयोगी वस्तू दिली जातात. शिवाय, दोन्ही बाजूंच्या वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची सोयही केली जाते. नोंदणीपूर्वी वधू-वराच्या वयाचा पुरावा घेतला जातो. त्यांचे लग्न न झाल्याची खातरजमा केली जाते. सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी दानशूर व्यक्‍ती किंवा संस्थांकडून मंगल कार्यालय मोफत मिळते. तसेच, कोणी मंगळसूत्र, कपडे तर कोणी संसारोपयोगी भांडी घेण्याची जबाबदारी उचलतात.

आंतरधर्मीय विवाह
पाथरी येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात एका हिंदू-मुस्लिम जोडप्याचा आंतरधर्मीय विवाह उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, वधू आणि वर हे दोघेही दिव्यांग आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी मुलांच्या भविष्याचा विचार करून धर्माचा विचार न करता या विवाहाला होकार दर्शविला.

एखाद्या कुटुंबीयांवर लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये. बहुतांश मुले-मुली ही शेतकरी आणि गरीब कुटुंबांतील आहेत. त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक हातभार लागावा, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. 
- दिलीप देशमुख, धर्मादाय सहआयुक्‍त

Web Title: Community Marriage Zero Budget Social Work

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com