ऊस विकास आराखडा गांभिर्याने राबविण्याची गरज: शरद पवार

Sharad Pawar, sugar factor, Agriculture,Sugarcane,Irrigation

पुणे : कमी ऊस उत्पादन, कमी गाळपामुळे कमी मिळकत होते. परंतु पगारावरील वाढता खर्च आणि कर्जाची परतफेड करावी लागत असल्याने साखर कारखानदारीचे आर्थिक गणित बिघडलेे आहे. त्यामुळे कारखान्यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ऊस विकास आराखडा गांभिर्याने राबविण्याची गरज असल्याचे मत, माजी केंद्रीय कृषीमंंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ‘ऊस विकास कृती कार्यक्रम’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्राच्या उद् घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख, आमदार अजित पवार, आ.जयंत पाटील,आ.राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, “जागतिक ऊस उत्पादनामध्ये ब्राझीलनंतर भारताचा क्रमांक लागतो. तर देशात उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. आपली खरी स्पर्धा उत्तर प्रदेशाशी आहे. उत्तर प्रदेशात निर्माण होणा-या साखरेला दिल्ली, हरयाणा, पंजाबसोबत पश्चिम बंगाल, आसाम आणि ईशान्य भारतातील राज्ये आहेत. वाहतुकीचा खर्च कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादकाला परवडत नाही.”

“दुष्काळी परिस्थीतीमुळे राज्यातील 10 लाख हेक्टरचे ऊस क्षेत्र कमी झाले. तसेच मुख्यमंत्री फडणविस यांच्या घोषणेनुसार ठिबक सिंचन करण्याच्या अटीवर ऊस उत्पादनाला परवानगी देणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याच्या नियोजनामध्ये ठिबकवर जावे लागेल. आर्थिक गणित बिघडु नये यासाठी प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी नेमणे. प्रतिहेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी जैविक, बायोकंपोस्ट खते, जैविक रोग आणि किटकनाशके वापरणे. माती परिक्षण केंद्राची उभारणी करणे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत शाश्वत ऊस उत्पादन केल्यास कारखानदारी टिकु शकेल,”असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वळसे पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर कृषी क्षेत्रातील संशोधकांनी विविध विषयांवर सादरीकरण केले.

ऊस असो की नसो आमच्या आमदारांना कारखाना लागतो : शरद पवार
“आमच्या काही नेेते आणि आमदारांकडुन ऊस उत्पादन नसताना देखील साखर कारखाने काढली जातात. माणसे सांभाळण्यासाठी आम्ही देखील त्याला मदत करतो. काही जणांना कारखाना काढु नका असा सल्ला देऊन देखील कोणी ऐकत नाही. मग आम्ही म्हणतो कारखाने काढा, पण पुढील समस्यांना तोंड द्या. बेसुमार कारखान काढल्यांमुळेे आजचे हे दिवस आलेत, “असे सुचक विधान शरद पवार यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ रंगला.

image_print
Total Views : 546

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड