दर गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

दर गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे - शहरात पाणीकपातीचा निर्णय झाला नसला, तरी दर गुरुवारी मात्र संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीचे कारण पुढे करत, पावसाळ्यापर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पाण्याची बचत होईल, अशी आशा महापालिका प्रशासनाला आहे. 

महापालिका आणि पाटबंधारे खात्याच्या वादात शहराच्या पाणीसाठ्यात कपात होण्याची शक्‍यता असून, १३५० एमएलडी (प्रतिदिन दशलक्ष लिटर) इतका पाणीसाठा घेण्याबाबत महापालिका ठाम आहे, तर दोनशे एमएलडी पाणी कमी देण्याच्या पाटबंधारे खात्याच्या हालचाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आता पाणी बचतीच्या उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. त्यात जलकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीअभावी पाणीपुरवठा विस्कळित होऊ नये, यासाठी दर गुरुवारी ती करण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारसह दुसरा दिवस म्हणजे, शुक्रवारी पुणेकरांना कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा जवळपास दीडशे एमएलडी पाण्याची बचत होते. त्यामुळेच या पुढील काळात आठवड्यातून सर्व जलकेंद्रांची पाहणी तसेच अन्य आवश्‍यक कामे करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. 

 ते म्हणाले, ‘‘जलकेंद्रांची नियमित देखभाल-दुरुस्ती केल्याने पाणीपुरवठ्यात अडथळे येणार नाहीत आणि पाणीही वाया जाणार नाही. त्यामुळे ही कामे केली जातील.’’

गैरवापर सुरूच! 
पिण्याचा पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले. मात्र, त्याबाबतचा आदेश अद्याप काढण्यात आला नव्हता. त्यामुळे पाणीटंचाई असूनही पिण्याचा पाण्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर विशेषतः वॉशिंग सेंटर, बांधकामे, उद्याने या ठिकाणांची पाहणी केली जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune no water supply to pune city on thursdays 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com