पुण्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहणार कायम, पारा 42.6 अंशावर

पुण्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहणार कायम, पारा 42.6 अंशावर

पुणे - भयंकर उष्ण आणि उकाड्याने त्रस्त करणारा शुक्रवार पुणेकरांनी अनुभवला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुण्यातील शिवाजीनगर येथे ४२.६, तर लोहगाव येथे ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरातील उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

सकाळी दहा वाजल्यापासून सुरू असलेल्या उन्हाचा चटका संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाणवत होता. पुण्यात २५ एप्रिल २००८ मध्ये ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर अकरा वर्षांनंतर एवढ्या प्रमाणात तापमानवाढ झाल्याची नोंद हवामान खात्यात झाली नव्हती, ती शुक्रवारी झाली.  शहरात गेल्या शनिवारी (ता. २०) कमाल तापमानाचा पारा ३८.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला होता. त्यात चार अंश सेल्सिअसने वाढ झाली. गेले सलग चार दिवस कमाल तापमानाचा पारा चाळिशीपेक्षा जास्त नोंदला जात आहे. शहरात भरदुपारी रस्त्यांवर फिरताना सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचे स्पष्ट जाणवत होते. रस्त्यांवर प्रचंड उन्हाचा चटका, तर घरात उष्म्याच्या झळा येत असल्याचे आज सर्वांनीच अनुभवले. उष्म्यापासून बचावासाठी ज्येष्ठ नागरिक दारे-खिडक्‍या लावून घरात बसले होते. रस्त्यांवरील वाहतूक रोडावली होती. अत्यंत तुरळक वाहने धावताना दिसत होती, तर कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी चेहऱ्यावर रुमाल, डोक्‍यावर टोपी, डोळ्यावर गॉगल घातल्याचे दिसत होते.

१२२ वर्षांपूर्वी  पुणे @४३.३ 
पुण्यात ३० एप्रिल १८९७ रोजी म्हणजे १२२ वर्षांपूर्वी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्यात आहे. त्यानंतर आतापर्यंत एवढे तापमान एप्रिलमध्ये नोंदले गेले नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 
 

Web Title: Pune records highest temperature in a decades on Friday

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com