‘सकाळ’ हेच महाराष्ट्रातील अव्वल खपाचे दैनिक

 ‘सकाळ’ हेच महाराष्ट्रातील अव्वल खपाचे दैनिक

पुणे - महाराष्ट्राची खरी पसंती ‘सकाळ’ हीच असल्याची मोहोर लाखो वाचकांनी पुन्हा एकदा उमटवली आहे. ‘सकाळ’ हेच महाराष्ट्रातील अव्वल खपाचे दैनिक असल्याचे सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे.

‘ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन’ने (एबीसी) जुलै ते डिसेंबर २०१८ या काळात प्रत्यक्ष विक्री झालेल्या प्रतींच्या आधारे केलेल्या अहवालानुसार ‘सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांचा एकत्रित खप महाराष्ट्रात अन्य दैनिकांच्या तुलनेत अधिक आहे. मुद्रित माध्यमांच्या संदर्भात जाहिरात आणि प्रकाशन क्षेत्रामध्ये ‘एबीसी’चे निष्कर्ष आणि आकडेवारी विश्‍वासार्ह आणि अधिकृत मानली जाते. 

‘सकाळ’ने १२ लाख ९२ हजार १३४ प्रतींचा खप नोंदविला आहे. सकारात्मक परिवर्तनाचा वसा जपत राज्यात अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या विश्‍वासार्हतेवर या अहवालाने लोकमान्यतेचीच मोहोर उमटवली आहे. या अधिकृत सर्वेक्षणापासून दूर राहणारे काही दैनिक खपाचे पोकळ दावे करीत असल्याचे या सर्वेक्षणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

‘एबीसी’च्या आकडेवारीनुसार ‘सकाळ’च्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक-जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, सातारा आणि नगर या आवृत्त्यांचा एकूण खप राज्यात अव्वल आहे. ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचा दररोजचा खप पाच लाख ७८ हजारांपेक्षा अधिक आहे. पुणे आणि मुंबई या महानगरांमधील ‘सकाळ’चा खप दररोज सात लाखांच्या पुढे आहे. राज्यातील उदयोन्मुख शहरांमध्ये वाचकांनी ‘सकाळ’वरच विश्‍वास व्यक्त केल्याचे ‘एबीसी’च्या अहवालातून समोर आले आहे. 

वृत्तपत्राच्या क्षेत्रात नवनवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या ‘सकाळ’ने केवळ माहिती पुरविण्याचे काम न करता सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविले आहेत. डिजिटल माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवून सर्वसामान्य वाचकांचा आवाज म्हणून व्यवस्थेकडून अपेक्षित बदल घडवून आणले आहेत. प्रयोगशीलता जपणारे, बदल घडवून आणणाऱ्या सकारात्मक कामास नेहमीच प्रोत्साहन दिले. ‘एपी ग्लोबाले’, ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’, ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’, महिलांना सशक्‍त व्यासपीठ देणारे ‘तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान’, तरुणाईला नेतृत्व देणारे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’, ग्रामविकासाला चालना देणारी ‘सरपंच परिषद’ आदी माध्यमांतून ‘सकाळ’ राज्यातील जनतेसोबत एकरूप झाला आहे. ‘सकाळ’ची ही उपक्रमशीलता आणि समाजबदलासाठीचे प्रामाणिक प्रयत्न, यामुळेच ‘सकाळ’ने महाराष्ट्रातील आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. 

Web Title: Sakal Number One in readership survey from Audit Bureau of Circulation

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com