बारामती मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडवून पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करा : सुप्रिया सुळे

बारामती मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडवून पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करा : सुप्रिया सुळे

पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. 

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते आणि अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यासमवेत सोमवारी पाणीप्रश्‍नावर बैठक झाली. या वेळी ही सूचना सुळे यांनी केली. पुरंदर तालुक्‍यातील नाझरे प्रकल्पावरील ५० गावे, जेजुरी एमआयडीसी, इंडियन सिमलेस कंपनी आणि धरणातील उपसा जलसिंचन योजनेच्या सुमारे एक हजार विद्युत मोटारी आहेत. परिणामी, लाभक्षेत्राच्या शेतीला पाणी मिळत नाही. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना द्यावे. जनाई-शिरसाई योजनेतून पाणी काही गावांतील लहान तलावांमध्ये सोडणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यात कुरकुंभ, जिरेगाव, मळद, कौठडी शिवेवरील तलावांमध्ये एक वेळ पाणी सोडल्यास तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तसेच, राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत कामे मंजूर झाली असून, निधीही उपलब्ध झाला आहे. ही कामे पूर्ण करून संबंधित गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, भोरचे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांच्यासह बारामती, पुरंदर, मुळशी आणि भोर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

बंद जलवाहिनीतून पाणी न्यावे 
नीरा देवघर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद जलवाहिनीमधून नेण्याबाबत सर्वेक्षण झालेले नाही. परंतु, ते लवकर पूर्ण केल्यास पाण्याची बचत होईल. त्यात मूळ प्रकल्पामध्ये समाविष्ट नसलेल्या म्हसर खुर्द, म्हसर बुद्रुक, करंजगाव, गोळेवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, वाठारहिमा, पिसावरे, महुडे बुद्रुक, भानुसदरा, महुडे खुर्द, माळवाडी, ब्राह्मणघर हिमा या गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी सुळे यांनी केली.

Web Title: Solve the water dispute in Baramati constituency says supriya sule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com