पूर्वमोसमीच्या पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार

पूर्वमोसमीच्या पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार

पुणे : सूर्य तापल्याने तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेच्या लाटेत विदर्भ, मराठवाडा भाजून निघत आहे. यातच ढगाळ हवामान आणि पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहे. दोन दिवसांपूर्वी विदर्भात ४८.१ अंशांवर गेलेल्या ब्रह्मपुरी येथे तापमान ४४.६ अंशांपर्यंत घसरले आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. 

पूर्वमोसमीला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने चटका काहीसा कमी होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात कमाल तापमान ४० ते ४५ अंश, मराठवाड्यात ३९ ते ४१ अंश, मध्य महाराष्ट्रात ३२ ते ४४ अंश आणि कोकणात ३३ ते ३६ अंशांदरम्यान आहे. विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. 

रविवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.५ (५.८), जळगाव ४३.६ (२.८), कोल्हापूर ३२.६(१.०), महाबळेश्वर ३२.० (६.०), मालेगाव ४१.४ (४.१), नाशिक ३७.५ (१.५), सांगली ३३.२ (-१.०), सातारा ३९.५ (७.३), सोलापूर ३९.० (२.२), अलिबाग ३५.६ (२.०), डहाणू ३६.३ (२.०), सांताक्रूझ ३५.४ (२.२), रत्नागिरी ३३.५ (१.९), औरंगाबाद ४१.० (४.२), बीड ३९.९ (२.७), परभणी ३९.७ (०), नांदेड ३९.५ (०), अकोला ४२.० (२.०), अमरावती ४२.० (२.७), बुलडाणा ४०.० (३.८), ब्रह्मपुरी ४४.६ (४.१), चंद्रपूर ४४.६ (३.५), गोंदिया ४३.० (२.४), नागपूर ४३.२ (२.३), वाशीम ४३.०, वर्धा ४३.५ (३.२), यवतमाळ ४१.०(१.६). 

पुणे, साताऱ्याच्या दुष्काळी तालुक्यात पावसाची हजेरी 
सातारा आणि जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील तालुक्यांमध्ये रविवारी (ता. ९) पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, खंडाळा, फलटण, कोरेगाव, वाई, पाटण, सातारा तालुक्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटसह आलेल्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. माण तालुक्यातील खुटबाव येथे जनावरांच्या छावणीत पाणी साचले. फलटण तालुक्यातील सालपे येथील सर्व सिमेंट बंधारे तुडुंब भरून वाहिले आहे. खंडाळा, कोरेगाव, वाई, सातारा तालुक्यातही जोरदार पावसामुळे ओढे, नाल्यांना पाणी वाहू लागले, शेतातही पाणी साचले आहे. तर, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सोमेश्वरनगर आणि दौंड शहर व परिसरात रविवारी (ता.९) दुपारी अर्धा ते पाऊण तास वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, खरीपपूर्व कामांना गती येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com