ऑनलाइन बुकिंग करताय, तर मग जरा जपून! पर्यटनाच्या नावाखाली तुमचा खिसा होऊ शकतो रिकामा

ऑनलाइन बुकिंग करताय, तर मग जरा जपून! पर्यटनाच्या नावाखाली तुमचा खिसा होऊ शकतो रिकामा

पुणे - मुलांना उन्हाळ्याची सुटी लागल्याने अनेकांना आता फिरायला जाण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग करताय, तर मग जरा जपून! कारण स्वस्तात पर्यटन, कमी किमतीत भरपूर ठिकाणे, विमान प्रवास व पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय इत्यादी आमिषे दाखवून पर्यटनाच्या नावाखाली तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. 

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेकजण कुटुंबीयांसमवेत फिरायला जातात. त्यासाठी ऑनलाइन किंवा एखाद्या वेबसाइटवरून पर्यटन कंपनीचा क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यानंतर समोरील व्यक्तीकडून ‘लवकर निर्णय घ्या, मोजक्‍याच जागा शिल्लक आहेत’, असे सांगितले जाते. आलेली संधी हुकायला नको म्हणून नागरिकदेखील तातडीने त्यांनी सांगितलेल्या खात्यांवर पैसे भरून मोकळे होतात. मात्र काही दिवसांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला साधल्यानंतर समोरून प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिक पोलिसांकडे धाव घेतात.

सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक संघातील काही जणांनी तीर्थक्षेत्रांना भेटी देत पर्यटन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘कमी पैशांत तीर्थक्षेत्र दर्शन’ अशी जाहिरात त्यांच्या वाचनात आली. त्यावरील क्रमांकावर त्यांनी संपर्क केला. त्या वेळी त्यांना तीर्थक्षेत्रासह अन्य पर्यटनस्थळांसाठी विशेष पॅकेज उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी सर्वांनी साडे सहा लाख रुपये भरले. त्यानंतर हे पैसे घेतलेली व्यक्तीच पळून गेली. अखेर ज्येष्ठांनी फिर्याद दिल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या.

फसवणूक करणाऱ्यांकडून वृद्ध नागरिक, आयटी कंपन्यांमधील नोकरदार व महिलांना लक्ष्य केले जाते. त्यांना कमी किमतीमध्ये भरपूर पर्यटन ठिकाणे, भारतानजीकच्या देशांची सफर, पंचतारांकित हॉटेल्समध्ये वास्तव्य, विमानप्रवास अशी प्रलोभने दाखविली जातात. मागील तीन महिन्यांत शहरात पर्यटनाच्या नावाखाली फसवणुकीचे तेवीसपेक्षा अधिक प्रकार घडले आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पोलिस ठाणे किंवा सायबर पोलिसांकडे याबाबतच्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

अशी घ्या काळजी 
  पर्यटनासाठी अनुभवी ट्रॅव्हल्स कंपनीचीच निवड करण्यास प्राधान्य द्या
  ऑनलाइन बुकिंगपेक्षा प्रत्यक्षात टुर्स-ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयास भेट द्या
  ऑनलाइन आर्थिक व्यवहार टाळा 
  वेबसाइटवर बुकिंग करताना त्याची सत्यता पडताळून घ्या

पर्यटनाच्या नावाखाली प्रवाशांना विविध आमिषे दाखविले जाते. नागरिकही अधिक विचार न करता त्यावर विश्‍वास ठेवून आर्थिक व्यवहार करतात. मात्र, कालांतराने त्यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहेत. हे टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यटनाला जाण्यापूर्वी बुकिंगबाबत योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. 
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

पर्यटनाच्या नावाने सुरू असलेली अनेक संकेतस्थळे, जाहिराती, संपर्क क्रमांक खोटे असतात. त्यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होते. त्यामुळे नागरिकांनी थेट ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थित चौकशी करून नंतर नोंदणी करावी. 
- विवेक गोळे, पर्यटन व्यावसायिक

Web Title: Your pocket can be emptied under the name of tourism

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com