राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान

राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील 58 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल-मेमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे या जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. देशातील 16 राज्यातील राज्यसभेच्या 58 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे... यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारिख 12 मार्च आहे.

राज्यसभेच्या 58 जागांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. या 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजनी सुद्धा होणार आहे. 6 वर्षांचा कार्यकाळ असलेल्या राज्यसभेच्या 16 राज्यांमधील एकूण 58 सदस्यांचा एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपतोय. त्याआधी या निवडणुका पार पडणार आहेत. सर्वात जास्त जागा अर्थात उत्तर प्रदेशातून आहेत. 

कोणत्या राज्यात किती जागा?

उत्तर प्रदेश - 10
बिहार - 6
महाराष्ट्र - 6
पश्चिम बंगाल - 5
मध्य प्रदेश - 5
गुजरात - 4
कर्नाटक - 4
आंध्र प्रदेश - 3
तेलंगणा - 3
ओदिशा - 3
राजस्थान - 3
झारखंड - 2
छत्तीसगड - 1
हरियाणा - 1
हिमाचल प्रदेश - 1
उत्तराखंड - 1

यावेळी भाजपचे अरुण जेटली, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह एकूण 17 खासदारांचा कार्यकाळ संपतोय. काँग्रेसचे 12 आणि समाजवादी पक्षाचे 6 खासदारांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर सचिन तेंडुलकर, जया बच्चन, रेखा आणि चिरंजीवी नामवंतांचाही कार्यकाळ संपतोय. त्याचबरोबर महाराष्ट्रातील राष्टवादीच्या वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि राजीव शुक्ला, भाजपचे अजय संचेती आणि शिवसेनेच्या अनिल देसाई यांचाही कार्यकाळ संपतोय.  
 
राज्यसभेत बहुमतात येण्यासाठी भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची अशीच म्हणावी लागेल. देशातील 19 राज्यांमध्ये सत्तेत असलेलं भाजप राज्यसभेत बहुमत मिळवण्यासाठी आग्रही आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. एकट्या यूपीतूनच भाजपला 8-9 जागा मिळू शकतात, तर महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यातील संख्याबळानुसार राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही भाजपचीच सत्ता असल्यानं याचाही मोठा फायदा भाजपला होईल. एकूण 58 जागांपैकी 25 जागांवर भाजपच्या उमेदवारांची वर्णी लागू शकते. त्यामुळे राज्यसभेत भाजपचा बहुमताचा मार्ग ब-यापैकी मोकळा होऊ शकतो. 

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राज्यसभेत आता भाजप 58 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे तर काँग्रेसच्या पारड्यात 54 जागा आहेत. काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच दिसून येईल. भाजप अंकूश लावण्यासाठी काँग्रेस सर्वोतपरी प्रयत्न करेल यात शंका नाही. त्यामुळे गुजरात निवडणुकीत जो उहापोह झाला तोच पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com