खासदार संजय पाटील यांच्यावर 'या' पाच विधानसभा मतदारसंघाची धुरा

खासदार संजय पाटील यांच्यावर  'या' पाच विधानसभा मतदारसंघाची धुरा

सांगली - खासदार संजय पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाची धुरा सोपवली आहे. या पाचही मतदारसंघांत कृष्णा खोरेचा प्रभाव असून पुढे 50 दिवसांत पाच वर्षांतील कामांचा ढोल पिटण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल. 

संजय पाटील यांचे होमपीच असलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघासह जत, खानापूर, पलूस-कडेगाव आणि मिरज या मतदारसंघांत तळ ठोकून पाटील यांच्याकडे पाचही उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी दिली आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकीवेळी दिलजमाई करताना याविषयी प्राथमिक चर्चा झाल्या होत्या. एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या होत्या. त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करत श्री. पाटील यांची जबाबदारी भाजपने वाढवली आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू व्हायला आता अवघे दोन महिने बाकी आहेत. त्यानंतर दीडएक महिन्यात निवडणुका होतील. म्हणजे उणेपुरे साडेतीन महिने बाकी आहेत. या काळात भाजपने युतीला 220 पेक्षा जास्त जागा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसा दावा केला आहे. त्यात सांगली जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे असलेल्या उरलेल्या तीनही जागा खेचून आणण्यासाठी भाजप 100 टक्के ताकद लावणार आहे. लोकसभेला सांगलीत सलग दुसऱ्यांदा आणि हातकणंगलेला शिवसेनेला विजय मिळाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. श्री. पाटील यांच्याकडे जबाबदारी असलेल्या मतदारसंघापैकी मिरज, जतमध्ये विद्यमान आमदार भाजपचे असून खानापूरचे आमदार शिवसेनेचे आहेत. 

आता पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ येथे टार्गेट महत्त्वाचे असेल. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत संजय पाटील यांनी टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ योजनांसाठी मोठी ताकद लावली. दीड वर्षांत त्यांच्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही होते. या काळात विस्तारित योजनांना मान्यता घेतानाच निधीही मंजूर झाला. आता कामांना गतीने सुरवात झाली आहे. या साऱ्या गोष्टींचा, विशेषतः शिवारात पोचलेल्या पाण्याचा आणि नियोजित कामांचा विधानसभा निवडणुकीत मतांच्या रूपाने फायदा उठवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याची जबाबदारीच संजयकाकांच्या गळ्यात टाकून मुख्यमंत्र्यांनी त्यांना दुष्काळी टापूत पुन्हा कमळ फुलवण्याचे आव्हान सोपवले आहे. 

उभ्या-आडव्या मांडणीचे आव्हान 
लोकसभा निवडणुकीने जिल्ह्याचे वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. उभ्या-आडव्या मांडणीचे परिणामही राजकीय पटलावर स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे विधानसभेला भाजप विरोधकांची मोट बांधताना तो हिशेब नक्कीच नजरेसमोर असेल. त्यामुळे भाजप-शिवसेनेलाही नव्याने मांडणी करावी लागणार आहे. त्यासाठी संजयकाकांशी साऱ्यांचे सूर जुळणे आवश्‍यक असल्याचे भाजपच्या वरिष्ठ केडरला पक्के ठावूक आहे. 

Web Title: Vidhansabha 2019 Five constituencies of Sangli responsibility on Sanjay Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com