शिमग्याची बोंब की मंत्रीपदाची पुरणपोळी? राणेंका शिमग्याक काय मिळतला?

शिमग्याची बोंब की मंत्रीपदाची पुरणपोळी? राणेंका शिमग्याक काय मिळतला?

नारायण राणे... आपल्या सडेतोड भूमिकांसाठी चर्चेत असलेला महाराष्ट्रातील वादळी राजकीय नेता..एकेकाळचे मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरेंच्या जवळची व्यक्ती, काँग्रेसमध्ये आल्यावर उद्योगमंत्री...कोणत्याही पदावर असताना आपल्या आक्रमक भूमिकेमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. पण राणेंबद्दलची हीच चर्चा हल्ली अगदी विरोधी असते. ही चर्चा असते राणेंच्या तडजोडीची..

नारायण राणेंची बुधवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याघरी बंद दाराआड चर्चा झाली. आणि चर्चेला उधाण आलं. नारायण राणेंना राज्यात मंत्रीपद न देता राज्यसभेत खासदार म्हणून बोळवण करण्याचा भाजपचा डाव असल्याचे समोर आले. पण राणे मात्र या बैठकीनंतर हसत-हसत बाहेर पडले. राणेंच्या या हास्यानंतर त्यांच्या पदाचे गूढ आणखीनचं वाढले..पण राणेंनी मात्र आपल्या राजकीय शैलीत असे काहीच न झाल्याचे स्पष्ट केलेय.

राणेंने जरी जरी काहीही म्हटले असले तरी परिस्थिती जनतेच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे राणेंची ही बोळवण स्पष्टच दिसते. पण छोटे राणे म्हणजे नितेश राणेंबद्दलची चर्चा मात्र तार्किक वाटत नाही. राणेंचा राज्यसभेवर खासदारकी व नितेश राणेंनी राज्यमंत्रीपद, अशी ऑफर असल्याचीही चर्चादेखील आहे. पण त्यात काही तार्किक दिसत नाही. काँग्रेसचे आमदारपद सोडल्याशिवाय ते शक्य नाही आणि त्यासाठी निवडणुकीची वाट पहावी लागेल... म्हणूनच हा अंदाज खोटा ठरु शकतो.

राणेंची आपल्या पुत्रांसाठीची धडपड स्पष्ट दिसते. नितेश राणे भाजपसोबतच्या बैठकांना नेहमी त्यांच्यासोबत असतात. मग मागची गुजरातची बैठक असो वा बुधवारची दिल्लीतली बैठक.

शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राणे काँग्रेसमध्ये आले खरे. तिथूनही मुख्यमंत्रीपद न दिल्याचे कारण सांगत त्यांनी ‘हात’ दाखवला आणि स्वताचा ‘स्वाभिमान पक्ष’ स्थापन केला. एनडीएला पाठिंबा दिला. पण त्या बदल्यात काहीही मिळवताना राणेंची हतबलता स्पष्ट दिसत आहे. या अधिवेशनात आपण मंत्री असू असे राणेंचे विधान खोटे ठरले. मंत्रीपद तर सोडाचं पण विधानपरिषदेचे सदस्यत्वही प्रसाद लाडांना देऊन राणेंना लांब ठेवण्यात आलं. पण सरकारचा एका वर्षाचा कालावधी शिल्लक असताना आतातरी राणेंना काही मिळणार आहे का? नाही मिळाल्यास राणे गप्प बसतील की ‘प्रहार’ करतील हे पहावं लागेल. त्यांच्या कोकणी भाषेत सांगायचं म्हटलं तर राणेंका शिमग्याक काय मिळतला? शिमग्याची बोंब की मंत्रीपदाची पुरणपोळी? हे पहाव लागेल.
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com