शिवसेना @ 52 ; यापुढे शिवसेनाच म्हणत सेनचा भाजपवर निशाणा !

शिवसेना @ 52 ; यापुढे शिवसेनाच म्हणत सेनचा भाजपवर निशाणा !

शिवसेनेचा आज ५२ वा वर्धापन दिन आहे..गोरेगावातल्या नेस्को संकुल इथे होणाऱ्या या सोहळ्यात शिवसेनेचे सगळे नेते तसंच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार असून यावेळी ते देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थिती आणि भाजपचा युतीचा प्रस्ताव यावर काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, यानिमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सामनाच्या संपादकीयमध्ये पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. धुळीचे लोट शंभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळय़ात आणि श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. तसंच महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल असा उल्लेखही सामनात करण्यात आलाय.


संपूर्ण अग्रलेख : 

धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळय़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही. शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्या डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तेवढा आत्मविश्वास आमच्यात नक्कीच आहे.

शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. अर्थात तो नेहमीप्रमाणे दणक्यातच साजरा होईल. ५२ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना एका प्रतिकूल परिस्थितीत झाली. त्यानंतरही असंख्य खाचखळग्यातून, काटय़ाकुटय़ांतून शिवसेनेचा प्रवास झाला आणि त्यावर यशस्वी मात करीत शिवसेना आजच्या शिखरावर पोहोचली आहे. तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. कोणत्याही धनदांडग्यांच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेने भगव्याचे तेज विश्वभरात झळाळून सोडले. ‘भगवा’ हाच हिंदुत्वाचा रक्षक यावर आता कुणाचेही दुमत नाही. तो ‘भगवा’ म्हणजे भेसळीचा नसून शिवरायांचा म्हणजेच शिवसेनेचा, यावर देशाने मोहोर उठवली आहे. शिवसेना नक्की काय व कसे करणार? असे प्रश्न तेव्हा ज्यांना पडले आहेत त्यांच्या गोवऱ्या स्मशानात गेल्या, पण शिवसेनेचा वेलू आजही गगनावर का जात आहे, याचा अभ्यास आमच्या विरोधकांनी करायचा आहे. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा किती तरी लोक म्हणाले की, ‘‘इकडे मोगलांचे राज्य आहे. ते केवढे विराट आहे. दक्षिणेकडील राष्ट्रे किती मोठी आहेत. त्यांच्याजवळ पैसा आहे. साम्राज्य आहे. या शिवाजीजवळ पगार द्यायला पैसा नाही, हा कसली स्वराज्याची स्थापना करतो. याच्यामागे कोण जाणार?’’ असे शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील जागीरदार, सरदार, सुभेदार म्हणत होते आणि तरीही शिवाजी महाराजांनी आपले काम केले. याचे कारण आपल्या पश्चात शिवसेना उभी राहणार आहे यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच जो विरोध शिवाजी महाराजांना झाला, तो शिवसेनाप्रमुखांना त्यांच्या वाटचालीत झाला. मात्र अशा प्रकारचा

विरोध पत्करूनही

जो सत्कार्यावर विश्वास ठेवतो तो कार्य तर निश्चितपणे तडीस नेतोच, पण जयस्तंभ आणि मानस्तंभ देऊन पुढे चालतो. असे ऐतिहासिक कार्य शिवसेना करीत आहे.

‘मराठी माझी भाषा आहे

महाराष्ट्र माझा देश आहे

मराठी माणसं माझी माणसं आहेत!’

असे म्हणण्यामध्ये कोणतीही तत्त्वच्युती नाही. मराठी माणूस हा जगाचा एक घटक आहे. हिंदुस्थानचा तो अभिमानी आहे. हिंदुत्व आणि हिंदू संस्कृतीशी तो द्रोह करणार नाही, असे व्यापक तत्त्वज्ञान स्वीकारून मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी मंडळी शिवसैनिक आहेत. म्हणून तर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून हिमालयापर्यंत प्रत्येक राज्य शिवसेनेकडे मोठय़ा अपेक्षेने पाहत आहे. कालच आसाम गण परिषदेचे सर्व प्रमुख लोक आम्हाला ‘मातोश्री’वर येऊन भेटले. देशभरातील प्रादेशिक पक्ष मजबुतीने एकत्र यावेत व त्यांचे नेतृत्व शिवसेनेने करावे असा विचार या मंडळींनी मांडला. हे लोक आसामात भाजपबरोबर सत्तेत सहभागी आहेत, पण आसामची संस्कृती, भाषा, अस्तित्व आणि ‘भूगोल’ संकटात येत असताना सत्ता म्हणून तेथे सगळेच मिठाच्या गुळण्या घेऊन बसले आहेत. नव्हे तथाकथित हिंदू म्हणून परकीय लोकसंख्या घुसवून भूमिपुत्र आसामींच्या हक्क आणि संस्कृतीवर आक्रमण करणारा काळा कायदा केंद्र सरकार आणत आहे. आसामच्या अस्मितेसाठी जो संघर्ष तेव्हाच्या विद्यार्थी संघटनांनी केला त्यात ९०० लोकांनी हौतात्म्य पत्करले होते. त्यांचे हौतात्म्य पायदळी तुडविणारा कायदा कोणी आणत असेल तर त्यास विरोध करावाच लागेल. प्रत्येक प्रांताला स्वतःची एक अस्मिता आहे म्हणूनच घटनेनुसार भाषावार प्रांतरचना निर्माण केली गेली. मग तो प. बंगाल असेल, आंध्र असेल, दक्षिणेकडील राज्ये असतील. महाराष्ट्र तर आहेच. स्वतःच्या घरामध्ये शिरणे म्हणजे आभाळाशी वैर नव्हे. तसे महाराष्ट्रावर प्रेम करणे म्हणजे हिंदुस्थानचा द्रोह नव्हे. कारण महाराष्ट्र हे हिंदुस्थानचे सगुण रूप आहे, पण महाराष्ट्रावरही आघात सुरू आहेत. पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचे रूप बदलू पाहत आहे.

मुंबई नासवण्याचे कारस्थान

रचले आहे. ‘बॉम्बे’चे मुंबई केले याची पोटदुखी असणाऱ्यांनी मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावे परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा व शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावाने ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावे बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलून यावे. शिवसेना हे सर्व कार्य एका निष्ठsने करीत आली आहे. देशाचे वातावरण बदलत आहे. २०१४ चा राजकीय अपघात २०१९ सालात होणार नाही. सत्तेचा माज आम्हाला कधी चढला नाही आणि पुढेही आम्ही तो चढू देणार नाही. देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालविणे मुश्कील होईल. धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळय़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही. शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्या डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तेवढा आत्मविश्वास आमच्यात नक्कीच आहे.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com