सुट्टीत घराला कुलूप लावून गावाला जाताना घ्या 'ही' काळजी

सुट्टीत घराला कुलूप लावून गावाला जाताना घ्या 'ही' काळजी

सोलापूर  : चोरांना काय आपलेच घर दिसणार आहे का..?, आजवर आमच्या भागात कधीच चोरी झाली नाही..! असे म्हणत लोक बिनधास्त घर बंद करून सुटीत गावाला निघून जातात. उन्हाळ्याच्या सुटीत कॉलनी, सोसायटी, अपार्टमेंटमध्ये दोन-चार घरे बंद दिसतातच. अशाच घरांवर लक्ष ठेवून चोरटे संधी साधतात. चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून प्रत्येकाने दक्ष असण्याची आवश्‍यकता आहे. 

मे-जून महिन्यात उन्हाळ्याच्या दिवसांत दुष्काळी स्थितीमुळे चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांत वाढ होते. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून संशयित चोरट्यांवर वॉच ठेवण्यात आला आहे. नागरिकांनीही दक्ष राहण्याची आवश्‍यकता आहे. गावाला जाण्यापूर्वी घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवावी. शक्‍य असेल तर घरात आवाज येण्यासाठी सायरन सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. अपार्टमेंट, कॉलनीत सुरक्षा रक्षक नेमावेत. काहीही काम नसलेली तरुण मुले, व्यक्ती नवीन कपडे, बाईक, मोबाईल घेऊन फिरत असतील तर अशांवर लक्ष ठेवून पोलिसांना माहिती द्यायला हवी, अशी मंडळी चोरी करून ऐश करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

बाहेर जाताना घरातील आणि बाहेरील लाइट चालू ठेवावेत. कारण, घरात कोण आहे किंवा नाही, याचा चोरास अंदाज येत नाही. अलीकडे काही चोरीच्या घटनांत सीसीटीव्ही कॅमेरा बंद करणे, कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेणे अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी लावण्यात यावेत, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांनी सांगितले आहे. 

ही घ्या खबरदारी... 
- गावी जात असाल तर घरात सोने, रोकड ठेवू नका. 
- दागिने, रोकड बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवावी. 
- घराला उत्तम दर्जाचे दरवाजे, सुरक्षा यंत्रणा बसवावी. 
- संशयित हालचाली दिसल्या तर पोलिसांना तत्काळ कळवा. 
- रात्रीच्या वेळी बाहेर जाणार असाल तर घरातील आणि बाहेरील लाइट चालू ठेवावी. 
- घरात आणि घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत. 
- सीसीटीव्ही कॅमऱ्याचे डीव्हीआर सुरक्षित राहील याची काळजी घ्या. 

फेसबुक चेकइन धोक्‍याचे 
अलीकडे बहुतांश मंडळी गावाला गेल्यानंतर फेसबुकसह अन्य सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात. चेकइन करून आपण कोठे आणि कोणासोबत आहोत, हे फेसबुकवर शेअर करतात. आपल्या घरात कोणी नाही, हे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लोकांना सहज समजते. चोरी करण्याच्या उद्देशाने लक्ष ठेवून असलेल्यांना ही आयती संधी असते. सोशल मीडियावरचे अपडेट पाहून चोरी केल्याच्या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

तुम्ही कुटुंबासह गावाला जाणार असाल तर संबंधित पोलिस ठाण्याला कळवा. विश्‍वासू शेजारी आणि नातेवाइकांनाही कल्पना द्या. घराकडे लक्ष असू द्या असे त्यांना सांगा. घरात मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड ठेवू नका. आजवर काही झाले नाही म्हणून बिनधास्त जाणे धोक्‍याचे आहे. चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेतच, नागरिकांनीही दक्ष राहायला हवे. 
- अभय डोंगरे, सहायक पोलिस आयुक्त

Web Title: care for thief incident in Solapur

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com