भारताला विश्वविजेतेपद; ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

भारताला विश्वविजेतेपद; ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : गोलंदाजांच्या चकमदार कामगिरीनंतर सलामीवीर मनज्योत कालराने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून धुव्वा उडवत विश्वविजेतेपद मिळविले. एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा चौथ्यांदा भारताला जिंकता आली आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ईशान पोरेलने या सामन्यातही आपल्या गोलंदाजीतील धार कायम ठेवताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन सांघा याला बाद करून नागरकोटीने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला. मर्लो आणि उप्पल यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 150 धावांपर्यंत पोचविला. या स्पर्धेत भारताच्या फिरकीपटूंची कामगिरी उत्तम झालेली आहे. या सामन्यातही हीच कामगिरी आपल्याला पहायला मिळाली. अखेरच्या फळीतील फलंदाजांना ठरावित अंतराने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या उभारण्याची इच्छा धुळीस मिळविली. मर्लोने अर्धशतक पूर्ण करत 76 धावांची खेळी केली. भारताकडून पोरेल, शिवासिंग, नागरकोटी आणि अभिषेक रॉय यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. तर, शिवम मावीने एक बळी मिळविला.

या आव्हानासमोर भारताच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी करत चांगली सुरवात केली. मनज्योत आणि कर्णधार पृथ्वी यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना करत यश मिळू दिले नाही. या दोघांनी 71 धावांची भागीदारी नोंदविल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. पृथ्वी 29 धावांवर सदरलँडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या गेल्या सामन्यातील शतकवीर शुभमन गीलने आक्रमक फटकेबाजी करत संघाला आणखी जवळ नेले. पण, तो 31 धावांच करू शकला. एकाबाजूने मनज्योतने शेवटपर्यंत फलंदाजी करत शतक पूर्ण केले आणि संघाचा विजय साजरा केला. त्याला हार्विक देसाईने चांगली साथ दिली. 

विजयी अश्‍व चौफेर उधळून अपराजित राहत चौथ्यांदा विश्‍वविजेतेपदाला कवेत घेण्याची संधी पृश्‍वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणारा आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला भारतीय संघाला मिळाली. भारताने आत्तापर्यंत महंमद कैफ (2002), विराट कोहली (2008) आणि उन्मुक्त चंद (2012) यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा भारताने विश्वकरंडक जिंकला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com