खुन झाला मात्र खुनाची नोंद नाही..पोलीसांचा बेजबाबदारपणा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मे 2019

कोल्हापूर - कौटुंबिक वादातून जवळच्या नातेवाइकाने ‘त्याच्या’ डोक्‍यात काठी मारली. रक्तबंबाळ अवस्थेत तो पोलिस ठाण्यात आला. मात्र, त्याची साधी दखलही न घेता पोलिसांनी त्याला हुसकावून लावले. काही वेळाने पोलिस ठाण्याच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या ‘त्याचा’ उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा सरळ सरळ खुनाचा प्रकार असताना त्याची नोंदही पोलिस ठाण्यात झाली नसल्याची चर्चा रंगली आहे. 

या मागे ‘अर्थपूर्ण’ घडामोडी झाल्याची चर्चाही आता दबक्‍या आवाजात सुरू झाली आहे. सदर बाजारमधील ‘ही’ व्यक्ती ८ मे रोजी दुपारच्या सुमारास पोलिस ठाण्यात आली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याने डायरीला असलेल्या ‘डे ऑफिसर’ला व्यथा सांगितली. परंतु, या अधिकाऱ्याने त्याची दखल घेण्याऐवजी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तो ऐकत नाही म्हटल्यावर काही कर्मचाऱ्यांना बोलावून घेत ‘त्याला’ गेटबाहेर घालवण्याचे ‘फर्मान’ अधिकाऱ्याने सोडले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ हा आदेश पाळला. तक्रार घ्या, अशी याचना करणारा ‘तो’ इसम तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडला.

काही वेळाने काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्याला सीपीआरमध्ये दाखल करून त्याची बेवारस अशी नोंद करण्यात आली. उपचार सुरू असताना ‘त्याचा’ दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. पोलिसांनी घाईगडबडीने त्याच्या नातेवाइकांना शोधून काढले व पुढील सोपस्कार पार पाडले. डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने ‘त्याचा’ मृत्यू झाल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यामुळे या ‘मृत्यू’ची ‘खून’ म्हणून नोंद होणे अपेक्षित होते; पण संबंधित पोलिस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनी ‘लाख’मोलाच्या ‘अर्थपूर्ण’ घडामोडी करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता दबक्‍या आवाजात सुरू झाली आहे.

सौजन्याची एैसीतैशी
एकीकडे तक्रारदाराला सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख करत आहेत; तर दुसऱ्या बाजूला रक्तबंबाळ तक्रारदाराची दखल घेण्याचे सौजन्यही पोलिस ठाण्यातील अधिकारी दाखवत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. खुनासारखा प्रकार घडूनही त्याची नोंद न होणे, हा त्याहूनही गंभीर प्रकार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Web Title: murder case not filed in police station

संबंधित बातम्या

Saam TV Live