व्होट फॉर तनिष्का !!!

#VoteForTanishka, tanishka election, women, tanishka, nagpur, vidarbha

पुणे – तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीचा अनुभव आम्हा सगळ्यांसाठी वेगळा, नवीन आहे… नवरात्रात जणू स्त्रीशक्तीचे दर्शन समाजाला होत आहे. या आहेत, राज्यातील वेगवेगळ्या भागातील तनिष्का सदस्यांच्या प्रतिक्रिया. तनिष्का निवडणुकीचे वातावरण एव्हाना चांगलेच रंगायला लागले आहे. तनिष्का उमेदवार प्रचारासाठी महिलांच्या गाठीभेठी आवर्जून घ्यायला लागल्या आहेत. उमेदवारासोबतचा तनिष्कांचा गटही त्यात सामील होताना आढळत आहे. “व्होट फॉर तनिष्का‘, अशी मोहीमच राज्यात जणू सुरू झाली आहे.

निवडणुकीच्या या प्रक्रियेकडे काही तनिष्का सदस्या कशा बघत आहेत, हे सांगणाऱ्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया…
तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांना मोठी संधी मिळाली आहे. त्यांचा आत्मविश्‍वास वाढण्यास याद्वारे मदत होईल. महिलांना समाजासाठी काम करण्याची इच्छा असते. मात्र राजकीय पातळीवर ते प्रत्येकीला शक्‍य होत नाही. नेतृत्व विकास कार्यक्रम, अशा महिलांसाठी नक्कीच मदतीचा ठरेल. जनसंपर्क वाढविण्यासोबत तळागाळापर्यंत महिलांना काम करता येणार आहे.
गायत्री घुले, मांजरी

महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळालेलेच आहे, आता नेतृत्वविकासाची संधी मिळाली आहे. या माध्यमातून तनिष्का सदस्यांची ताकद एकत्रित होऊन समाजामध्ये नक्कीच विधायक बदल होण्यास मदत होईल.
- कल्याणी कड, खांदवेनगर

महिला सक्षमीकरणाचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. मुळातच स्त्रियांच्या अंगी नेतृत्वगुण असतात. तरीहि समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीचा आवाज क्षीण झाला होता; पण तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा आवाज बुलंद होणार आहे. सर्वच महिलांना माझी विनंती आहे की, या संधीच्या जरुर लाभ घ्यावा व भविष्यकाळात स्त्रीच्या रूपाने एक खंबीर नेतृत्व समाजाला द्यावे.
- प्रणीता पवार, सांगली

तनिष्काच्या कार्यातून व नेतृत्वाच्या संधी निर्माण करून महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होण्यास मदत झाली. यातून महिलांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊ लागला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष सामाजिक प्रश्‍नात सहभागाची संधी मिळत आहे. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.
डॉ. सुवर्णा माळी, इस्लामपूर

या नवरात्रीत आज खऱ्या अर्थाने नारीशक्तीचं प्रदर्शन होतंय, निवडणुकीनंतर परिवर्तनाचेच बिगूल वाजणार हे निश्‍चित. आजपर्यंत ज्या महिला राजकारणापासून दूर होत्या त्यांना आज खरी ओळख निर्माण करण्यासाठी किंवा आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल.
- सुलोचना कोल्हे, हिंगणा, नागपूर

निवडणूक हा आमच्यासाठी नवीनच विषय; पण सगळ्यांमध्ये उत्साहाचा संचार झाला आहे. आमच्या कामाची पावती आता खऱ्या अर्थाने अनेकांपर्यंत पोचणार आहे. सध्या सामाजिक कामे करताना येणाऱ्या अडचणी सोडवताना आता इतर लोकांचा पाठिंबा मिळणार आहे. चांगली कामे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतील असे चित्र दिसते आहे.
ज्योती योगेश निकम, दाभा, नागपूर

या निवडणुकीच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग करणाऱ्या महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवराज चौकातील महामार्गावरील वाहतूक कोंडी व उड्डाण पुलाची कामे व्यवस्थित होण्यासाठी आमच्या गटातील तनिष्का उमेदवार प्रयत्न करतील. सामान्य महिलांच्या प्रश्‍नाची सोडवणूकही करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.
-उज्ज्वला निंबाळकर, संभाजीनगर, सातारा

ही निवडणूक महिलांचे सामाजिक वातावरणात वावरण्याचे धाडस वाढविणारी आहे. त्या माध्यमातून महिलांची छेडछाड असो किंवा सरकारच्या पातळीवर होणारी हेळसांड थांबविण्यास तनिष्का व्यासपीठ ही चांगली संधी आहे. त्याचा वापर करून अनेक छोटे प्रश्‍न लगेच सुटत आहेत.
- सुनीता बर्गे, कोरेगाव, सातारा

स्त्रियांची क्षमता मोजली जाईल. महिलांच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक समस्या समजावून घेऊन त्या धोरणकर्त्यांपर्यंत पोचविण्याचा आणि त्या सोडविण्याचा हा प्रयत्न होत आहे. स्त्रियांची ताकद यातून लक्षात येणार आहे. महिलांचा हक्काचा आधार म्हणून निवडून आलेली तनिष्का असेल, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. एस. एस. चोले, बीड

माझ्यासारख्या तनिष्का सदस्याची निवडणूक लढविण्याची इच्छा असूनही काही अडचणींमुळे उभी राहू शकत नाही. मात्र आमच्या गटातून ज्या सदस्या निवडणूक रिंगणात आहेत, त्यांच्यासाठी मी काम करणार आहे. या निवडणुकीत सामान्य महिला मतदान करणार असल्याने त्यांचे सामाजिक, आर्थिक प्रश्न लक्षात येतील स्वतःबरोबर समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे, हे लक्षात येईल. निर्णयक्षमता वाढल्याने तिच्या घरातील लोकही तिचे अनुकरण करतील. खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणास गती येईल. या प्रवाहात सर्व महिलांनी सहभागी व्हावे.
- सुहासिनी देशमुख, बीड

image_print
Total Views : 1969

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड