शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब

 शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज (सोमवार) भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करतील.  

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज 'मातोश्री'वर येत आहेत. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकीपासून शिवसेनेने या जागेची मागणी केल्याने भाजपने पालघरच्या जागेवरही पाणी सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय विधानसभेच्या जागावाटपावरही बोलणी झाल्याचे समजते. विधानसभेसाठी शिवसेनेची 50-50 च्या फॉर्म्युलाची मागणीही मान्य झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेची निवडणूक प्रत्येकी 144-144 जागांवर लढणार आहेत.

शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेच्या नेत्यांनी सोडली नाही. युतीबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंपासून सर्वच शिवसेना नेत्यांनी आगामी निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा दिला होता. मात्र भाजप नेत्यांनीही युती होणार असा विश्‍वास वारंवार व्यक्त केला होता. त्यामुळे युतीची घोषणा होत असल्याने युतीबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यापासून युतीवर शिक्‍कामोर्तब झाल्याचे मानण्यात येत होते अखेर यावर शिक्कामोर्तब झाले. 

लोकसभेसाठी 
भाजप : 25 
शिवसेना : 23 

विधानसभेसाठी 
भाजप : 144 
शिवसेना : 144 

Web Title: Shivsena BJP alliance confirmed in Maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com