शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ परराज्यातही घुसणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अन्य राज्यांत पक्षविस्तार करण्याची रणनिती शिवसेनेने आखली असून, याद्वारे प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली ओळख पुसण्यावर शिवसेना नेतृत्वाने भर दिला आहे. यासाठीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे राजस्थान आणि तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अन्य राज्यांत पक्षविस्तार करण्याची रणनिती शिवसेनेने आखली असून, याद्वारे प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली ओळख पुसण्यावर शिवसेना नेतृत्वाने भर दिला आहे. यासाठीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे राजस्थान आणि तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते.

शिवसेनेची स्थापना झाल्यापासून पक्षनेतृत्वाने महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांकडे लक्ष दिले नव्हते. उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली आणि जम्मू काश्‍मीरसारख्या राज्यात शिवसेनेच्या शाखा आहेत. तेथील विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवार देण्यात येतात. मात्र, प्रचारासाठी अन्य नेत्यांना पाठवून नेतृत्वाने कधीही प्रचारासाठी वेळ दिलेला नाही; परंतु सध्याच्या बदलल्या राजकीय परिस्थितीत पक्षाचा अन्य राज्यांत विस्तार करण्याचा निर्णय नेतृत्वाने घेतल्याचे एका शिवसेना नेत्याने सांगितले.

शिवसेना महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष असल्याची नेहमीच टीका होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा पायाही महाराष्ट्रातच आहे. मात्र अन्य राज्यांतील एक दोन खासदार आणि एकआकडी आमदाराच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्याची सल शिवसेना नेतृत्वाला सतावत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडून आणत शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळविण्याचा नेतृत्वाचा प्रयत्न आहे. राममंदिराचा मुद्दा भाजपच्या हातातून खेचून ठाकरे कुटुबीयांनी २५ नोव्हेंबर रोजी प्रथमच अयोध्येचा दौरा केला. तेथे मिळालेल्या प्रतिसादामुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे. सध्या आदित्य ठाकरे राजस्थान विधानसभा प्रचार दौऱ्यात होते. तेथे शिवसेनेने ४९ उमेदवार दिले आहेत. तेलंगण विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचे ४० उमेदवार रिंगणात असून, आदित्य ठाकरे यांनी प्रचाराचा दौरा पूर्ण केला आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना-भाजप युती होण्याचे दोन्ही पक्षांकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांतील काही जागा भाजपकडून मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला यश आल्यास शिवसेनेला सहजपणे राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळू शकते, यावर नेतृत्वाने भर दिल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

Web Title: Shivsena will also enter the other state


संबंधित बातम्या

Saam TV Live