एसटी महामंडळाकडून खासगी कंपन्यांच्या एजंटांना तिकीट विक्रीची परवानगी

एसटी महामंडळाकडून खासगी कंपन्यांच्या एजंटांना तिकीट विक्रीची परवानगी

कोल्हापूर - एसटी महामंडळाच्या खासगीकरणाची चर्चा सुरू असताना एसटी महामंडळाने खासगी कंपन्यांच्या एजंटांना तिकीट विक्रीची परवानगी दिली आहे. कोल्हापूर-सांगली व इचलकरंजी मार्गावर ही सेवा सुरू होत आहे. यातून प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळेल, असा दावा एसटी महामंडळाने केला आहे; मात्र एसटी वाहकांना सोडून खासगी एजंटांची नियुक्ती करणे हे एसटीच्या खासगीकरणाचे पाऊल असल्याबद्दल कामगारांत नाराजी आहे. 

महामंडळाच्या निर्णयानुसार राज्यभर अंमलबजावणी होत आहे. त्यासाठी ट्रायमॅक्‍स या खासगी कंपनीला ठेका दिला आहे. त्यांचे प्रतिनिधी एसटी व शिवशाही गाड्या ज्या मार्गावर धावतात, त्या मार्गावर चौकात किंवा गावाबाहेर प्रवासी गोळा करून त्यांना एसटीची तिकिटे देतील. त्याची सुरुवात पुणे, मुंबई, लातूर, औरंगाबाद, नाशिकसह कोल्हापुरातही झाली आहे.

कोल्हापुरातून शिवशाही बस सुटली, की पेठ नाका, तावडे हॉटेल येथे शिवशाहीने पुढे जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट देण्यासाठी खासगी एजंट बसवले आहेत. त्यांच्याकडून तिकिटे घेऊन प्रवाशांना पुढील प्रवास शिवशाहीने करता येतो अशी ही सेवा आहे.  त्याच धर्तीवर कोल्हापूर-सांगली व इचलकरंजी मार्गावर विनावाहक एसटी बससेवा आहे.

मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांना तिकीट देऊन गाडीत बसविले, की गाडी थेट सांगली, इचलकरंजीत प्रवाशांना सोडते. याच गाड्यांसाठी आता तावडे हॉटेल येथे अन्य एका ठिकाणी खासगी एजंट तेथून पुढे प्रवास करणाऱ्यांना तिकिटे देईल, ते प्रवासी पुढील प्रवास करतील. या एजंटांना तिकीट विक्रीवर कमिशन देण्यात येणार आहे. म्हणजे एसटीच्या महसुलातील काही वाटा खासगी एजंटांकडे जाणार असल्याने एजंट नियुक्ती केल्याबद्दल नाराजी व्यक्‍त होत आहे.  

९ ते १० लाख खासगी कंपनीला द्यावे लागणार
राज्यभरात पहिल्या टप्प्यात दीडशेवर खासगी एजंटांची नियुक्ती झाली, तर प्रत्येकासाठी दिवसाला दोनशे रुपये कमिशन गेले, तरी महिन्याकाठी ९ ते १० लाख रुपये खासगी कंपनीला द्यावे लागणार आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Web Title: ST corporation give permission to sell tickets by private corporate agents

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com