कोण आहेत योगी आदित्यनाथ?

UP Diwas, Yogi Adityanath,Uttar Pradesh

उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (वय 44) यांची भाजपमधील प्रखर, परखड आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळख आहे. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी 1998 मध्ये लोकसभेवर निवडून गेल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मागे वळून पाहिलेले नाही.

उत्तर प्रदेशमधील भाजपच्या या जहाल नेत्याच्या वडिलांचे नाव कै. महंत अवैद्यनाथ हेदेखील जहाल हिंदुत्ववादी होते. व्यवसायाने शिक्षक असलेले महंत अवैद्यनाथ गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून तब्बल चारवेळा निवडून गेले होते. गोरखपूरच्या प्रसिद्ध गोरखनाथ मंदिराचे ते महंत होते. त्यांच्या निधनानंतर त्याच जागेवर योगी आदित्यनाथ यांची नियुक्ती झाली आणि गोरखपूर मतदारसंघातून ते पाचवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

योगी आदित्यनाथ हे विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत. उत्तराखंडमधील गढवाल विद्यापीठातून त्यांनी गणितामध्ये पदवी संपादन केली आहे. अविवाहित असलेले योगी आदित्यनाथ धार्मिक पुस्तकांचे लेखकही आहेत. ‘योगिक शाक्तकर्म’, ‘हटयोग : स्वरप एवं साधना’, ‘हिंदू राष्ट्र नेपाळ : अतीत, वर्तमान एवं भविष्य’ आणि ‘राजयोग : स्वरूप एवं साधना’ ही त्यांची पुस्तके. ‘हिंदू वीकली’ आणि ‘योगवाणी’ या मासिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

योग, हिंदू धर्म यामध्ये रुची असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी उत्तर भारतात गोरक्षा आंदोलन चालविले होते. राष्ट्र रक्षा अभियान या नावाने त्यांनी देशाच्या उत्तर भारतातील सीमांच्या संरक्षणाची मागणी सातत्याने केली आहे. गोरखनाथ मंदिराच्या विविध शिक्षण संस्थांसह विश्व हिंदू महासंघ, गो रक्षा समिती आदी संस्थांचे ते अध्यक्ष आहेत.

योगी आदित्यनाथ सातत्याने कडव्या भाषणांमुळे चर्चेत राहिले आहेत. 2005 मध्ये ख्रिश्चनांना ‘शुद्धिकरण’ करून हिंदू धर्मात प्रवेश देण्याच्या त्यांच्या कृतीमुळे योगी आदित्यनाथ देशभर चर्चेत आले. ‘जे योगाला विरोध करतात, त्यांनी देशातून चालते व्हावे,’ असे विधान त्यांनी 2015 मध्ये केले. बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान याची तुलना पाकिस्तानी दहशतवादी हफिज सईदशी केली होती आणि शाहरूखला पाकिस्तानात जायचा सल्लाही दिला होता.

सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले मनोज सिन्हा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यापेक्षा सोशल मीडियावर आदित्यनाथ यांना जास्त फॉलोअर्स आहेत.

image_print
Total Views : 322

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड