‘मातोश्री’ ते ‘वर्षा’... एक प्रवास

 A journey from Matoshree to Varsha
 A journey from Matoshree to Varsha

ठाकरे घराण्याच्या रिमोट कंट्रोलची परंपरा दूर सारत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दगड उचलून तो साहेब सांगतील त्या दिशेने फेकण्यात धन्यता मानणारे शिवसेनेचे रस्त्यावरचे राजकारण बदलून ते मध्यमवर्गीय तोंडवळ्याचे करण्याचे काम करणारे उद्धव हे बाळासाहेब ठाकरेंपेक्षा वेगळे. संयत स्वभावाचे उद्धव वडिलांसारखी ठाकरी भाषा बोलत नसले, तरी निर्णयांबाबत मात्र ते ठाम असतात. शिवसेनेने मराठीपणाची वेस सोडायला हवी. कारण, लोकसंख्येतला टक्‍का बदलतोय, हे लक्षात घेत ‘मी मुंबईकर’सारखा कार्यक्रम राबविणारे, शिवशक्‍ती-भीमशक्‍ती एकत्र आणण्यासाठी पावले टाकणारे उद्धव गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कमालीचे अस्वस्थ आहेत. मोदी-शहांच्या नेतृत्वातल्या भाजपच्या आक्रमकतेपुढे नमते न घेण्याचा निर्णय त्यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान घेऊन टाकला होता. पश्‍चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी, बिहारचे लालूप्रसाद यादव, दक्षिणेकडचे चंद्राबाबू, केसीआर, जगन रेड्डी यांचे राजकारण त्या त्या प्रदेशात विजयी ठरते, याकडे त्यांचे बारीक लक्ष होते. पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची बांधणी कशी आहे, हे पाहायला त्यांनी काही अभ्यासक वंगभूमीत पाठविले होते.

उत्तम फोटोग्राफर असल्याने प्रत्येक कोन तपासायचा, छायाचित्रात प्रत्येक तपशील परिपूर्ण कसा असेल, याकडे लक्ष देणे, हा त्यांचा स्वभाव. ओळखपरेडसाठी १६२ आमदार जमा झाले तेव्हा येथे ‘वाइड अँगल कॅमेरा’ हवा, असे ते म्हणाले त्यामुळेच. वन्यजीवनात रस असल्याने प्राणिजीवन कसे असते, सावज टप्प्यात केव्हा येते, याकडेही ते लक्ष ठेवून असतात.

वडिलांच्या मदतीसाठी...
एकेकाळी राजकारणात अजिबात रस नसणारे बाळासाहेबांचे हे सर्वांत धाकटे चिरंजीव शिवसेनेत सक्रिय झाले ते वडिलांना मदत व्हावी, या एकमेव कारणाने, असे जाणकार सांगतात. १९९५ मध्ये राज्यात स्थापन झालेल्या युती सरकारमधील अंतर्विरोध टोकाला गेले होते. बिंदुमाधवचा अपघाती मृत्यू, जयदेवचे वेगळे वर्तन, त्याची विभक्‍त झालेली पत्नी स्मिता, पुतण्या राज यांचा मंत्र्यांवर असलेला प्रभाव, या गोष्टी ‘मातोश्री’ला त्रासदायक ठरत असल्याने उद्धव यांनी सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा स्वत: बाळासाहेबांनीच व्यक्‍त केली होती. तोवर ‘सामना’ या दैनिकापर्यंत स्वत:ला मर्यादित ठेवणारे उद्धव कालांतराने २००३ मध्ये शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाले. त्यांच्या निवडीचा ठराव राज यांनीच मांडला होता. 

शिवसेनेच्या संघटनात्मक बाबी त्यांनी हाती घेतल्या अन्‌ सुभाष तसेच अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्या मदतीने पक्षाला नवे वळण द्यायला सुरुवात केली. राज यांच्या बंडानंतर ‘मनसे’ तळपू लागली तेव्हा त्या पक्षाला, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस जशी काँग्रेसवर वरचढ झाली तसे होऊ देणार नाही,’ असे उद्धव सांगत असत. भाजपबाबतही त्यांनी थेट तेच धोरण अवलंबण्याचा मार्ग स्वीकारला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार अस्वस्थ असल्याने ते सरकारमध्ये सामील झाले ते काहीशा नाराजीनेच. नंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, तसे केल्यास जेमतेम ४ ते ५ जण निवडून येतील, हे लक्षात आल्याने ते भाजपसमवेत राहिले. विधानसभेतही जेथे शक्‍य होईल तेथे परस्परांना आव्हान देण्याचा मार्ग भाजपप्रमाणे त्यांनीही स्वीकारला. निकालांनी भाजपला १०५ जागांवर मर्यादित ठेवले अन्‌ गणित बदलले. उद्धवजींना त्यांच्याच शब्दांनुसार भाजपने नाकारले, तर विरोधकांनी आपले मानले.

मोलाची साथ
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या पहिल्या ठाकरेंना पत्नीने दिलेली साथही मोलाची आहे. राज यांची बहीण जयजयवंती जीवन विम्याचे काम करताना त्यांची मैत्रीण. मग डोंबिवलीनिवासी रश्‍मी पाटणकरांची ठाकरे कुटुंबात ऊठबस सुरू झाली. या मध्यमवर्गीय देखण्या घरंदाज चेहऱ्याची त्यांनी मग जीवनसाथी म्हणून निवड केली. त्यांना उन्हापावसात साथ देणाऱ्या या वहिनी आदित्य, तेजस यांची आई ही भूमिका तर निभावतातच; पण शेकडो शिवसैनिक त्यांच्याकडे मन मोकळे करतात. काही वर्षांपूर्वी आजाराचा सामना करणाऱ्या उद्धव यांना ‘वर्षा’ या नव्या मुक्‍कामी पत्नीची भक्‍कम साथ मिळेल. तीन पक्षांचे राजकारण हाकताना त्यांना या आधाराचा उपयोग होईलच.

Web Title: A journey from Matoshree to Varsha

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com