कोरोना विषाणूचे दशावतार! पाहा कोणते आहेत कोरोनाचे हे प्रकार?

साम टीव्ही
बुधवार, 29 एप्रिल 2020
  • कोरोना विषाणूचे दशावतार 
  • कोरोनाच्या विषाणूचं १० प्रकारांत रुपांतर 
  • कोरोना विषाणूचा A2a अवतार मानवाच्या मुळावर 

भारतासह सगळ्या जगाची डोकेदुखी ठरलेल्या कोरोना विषाणूचा नवा अवतार आता समोर आलाय. मूळ कोरोना विषाणूपेक्षा त्याचा हा अवतार येत्या काळात अधिक घातक ठरू शकतो.

कोरोना विषाणूच्या राक्षसानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा विषाणू सापडला. त्यानंतर या कोरोना विषाणूचं १० वेगवेगळ्या प्रकारांत रुपांतर झालंय. त्यातलाच एक म्हणजे A2a.... कोरोनाचा हाच अवतार सध्या संपूर्ण मानव जातीसाठी घातक ठरतोय. या A2a प्रकारानं संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतल्याचं एका अभ्यासातून निष्पन्न झालंय. पश्चिम बंगालमधल्या कल्याणीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनॉमिक्सचे निधान बिश्वास आणि पार्थ मुजूमदार यांनी हे संशोधन केलंय. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये हे महत्त्वपूर्ण संशोधन लवकरच प्रकाशित होणार आहे.  
कोरोना विषाणूचं A2a या प्रकारात झालेलं रुपांतर माणसासाठी सर्वात जास्त घातक आहे. हा A2a माणसाच्या फुप्फुसात घुसून हल्ला करू शकतो. या आधीच्या सार्स CoV या विषाणूपेक्षा A2a हा नवा अवतार अधिक भयंकर ठरेल, असं या संशोधनातून समोर आलंय. 
कोरोनाचं मूळ असलेल्या O या प्रकारातूनच हे नवे १० प्रकार गेल्या ४ महिन्यांत जन्माला आलेले आहेत. त्यातल्या A2a या प्रकारानं मार्च अखेरीपर्यंत संपूर्ण जगात आपला फैलाव केलाय. डिसेंबर २०१९ ते ६ एप्रिल २०२० या कालावधीतील ५५ देशांमधील ३ हजार ६०० कोरोना विषाणूचे नमुने या अभ्यासासाठी वापरण्यात आलेयत. त्यात भारतातले फक्त ३५ नमुने होते. या कोरोना विषाणूचे जे अनेक प्रकार आहेत, त्यात O, A2, A2a, A3, B, B1 आणि या सारख्या काही प्रकारांचा समावेश होतो.  
कोरोना विषाणू सगळ्यात पहिल्यांदा रुग्णाच्या घशावर हल्ला करतो, त्यानंतर तो रुग्णाच्या फुप्फुसात आणि इतर अवयवात शिरकाव करतो. त्यामुळे रुग्णाला श्वास घेताना त्रास होतो. कोरोना विषाणूच्या A2a या प्रकारातल्या रुपांतरामुळे या विषाणूला थेट फुप्फुसात शिरकाव करणं सहज शक्य होतं, असं या संशोधनात स्पष्ट करण्यात आलंय. 
विशेष म्हणजे A2a ची लक्षणं असलेल्या भारतातल्या रुग्णांनी भारताबाहेर इतर देशात प्रवास केल्याचा कोणताही इतिहास नाही. मात्र, असं असलं तरी भारतात A2a प्रभावशाली आहे किंवा नाही या निष्कर्षाप्रत येण्यासाठी आणखी जास्त नमुन्यांचा अभ्यास करणं आवश्यक असल्याचं या अभ्यासकांनी म्हटलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live