शंभर दिवसांपासून काश्‍मीरमधील इंटरनेट सेवा विस्कळीतच

शंभर दिवसांपासून काश्‍मीरमधील इंटरनेट सेवा विस्कळीतच

श्रीनगर : विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद करण्यात आलेली इंटरनेटसेवा आजही 101व्या दिवशी स्थगित होती. दरम्यान, इंटरनेटसेवा बहाल करण्याबाबत माध्यम क्षेत्रातून जोरदार मागणी होत असताना प्रशासनाकडून यासंदर्भात अद्याप हालचाली होताना दिसून येत नाही.
काश्‍मीर खोऱ्यात इंटरनेटसेवा पूर्ववत करण्यासाठी विविध पत्रकारांच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. पाच ऑगस्टला काश्‍मीर खोऱ्यातून कलम 370 काढल्यानंतर लॅंडलाइन, मोबाईल फोन आणि इंटरनेटसेवा बंद केली गेली. यादरम्यान लॅंडलाइन आणि पोस्टपेडची सेवा सुरू झाली. परंतु, प्रीपेड मोबाईल आणि इंटरनेटसेवा मात्र सुरू होऊ शकली नाही. इंटरनेटसेवा सुरू केल्यास काश्‍मीर खोऱ्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्‍यात येऊ शकते. चुकीचे संदेश, फोटो सोशल मीडियावरून प्रसारित होऊ शकतात. त्यामुळे इंटरनेटवरील बंदी कायम ठेवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. परिस्थिती निवळल्यानंतर इंटरनेटसेवा टप्प्याटप्प्याने सुरू होईल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.


काश्‍मीर खोऱ्यात बाजाराने नवीन पद्धत अवलंबली आहे. सकाळी खुली होणारी बाजारपेठ दुपारनंतर बंद होते. त्यानंतर व्यापारी केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या मोर्चात सहभागी होतात. हाच प्रकार बुधवारीदेखील पाहावयास मिळाला. दहशतवाद्यांकडून व्यापाऱ्यांना, दुकानदारांना धमकावले जात असून, दुकाने बंद ठेवण्यासाठी भाग पाडले जात आहे. सार्वजनिक वाहतूक तुरळक प्रमाणात दिसत असून, मिनी बसही रस्त्यावर दिसत आहेत. जिल्हांतर्गत ऑटो रिक्षा आणि कॅबदेखील सुरू असून, खासगी वाहनेही दिसत आहेत.

Web Title: 100 days of internet gag in Kashmir

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com