‘येस’वरील निर्बंधांची १२५ बॅंकांना झळ

‘येस’वरील निर्बंधांची १२५ बॅंकांना झळ


पुणे - रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादल्याची झळ नागरी सहकारी बॅंकांनाही पोचली आहे. महाराष्ट्रातील ७२ आणि अन्य राज्यांमधील ५८ अशा १३० नागरी सहकारी बॅंकांचे आरटीजीएस, धनादेश वटणावळ (चेक क्‍लीअरिंग) आणि एनईएफटीचे व्यवहार बंद पडले आहेत. त्यामुळे येस बॅंकेचे व्यवहार सुरळीत होईपर्यंत ग्राहकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेवर अनियमिततेमुळे आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे येस बॅंकेच्या खातेदारांना ५० हजार रुपयांपर्यंतच रक्‍कम मिळणार आहे. या आर्थिक निर्बंधांमुळे बॅंकेच्या विविध शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी खातेदारांच्या रांगा लागल्या आहेत.

दुसरीकडे, राज्यातील ७२ आणि परराज्यांमधील ५८ नागरी सहकारी बॅंकांकडून आरटीजीएस, चेक क्‍लीअरिंग आणि एनईएफटीचे व्यवहार येस बॅंकेमार्फत केले जातात. या आर्थिक व्यवहारांसाठी सहकारी बॅंकांची येस बॅंकेत खाती आहेत. संबंधित सहकारी बॅंकांना व्यवहारासाठी येस बॅंकेचा कोड क्रमांक दिला जातो. तो कोड वापरून येस बॅंकेतील चेक क्‍लीअरिंग हाउसमधूनच धनादेश वटविण्यात येतात. परंतु, या आर्थिक निर्बंधांचा परिणाम सहकारी बॅंकांच्या ग्राहकांना काही दिवस सोसावा लागणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत चेक क्‍लीअरिंग, आरटीजीएस आणि एनईएफटीची सुविधा अन्य बॅंकेमार्फत सुरू करणार आहे. त्यामुळे संबंधित सहकारी बॅंक किंवा ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. ही सुविधा पूर्ववत सुरू होईल.
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्‍स फेडरेशन

येस बॅंकेवरील निर्बंधांमुळे काही सहकारी बॅंकांना सध्या आर्थिक व्यवहारात अडचण येत आहे. काही सहकारी बॅंकांनी अन्य बॅंकांमार्फत आरटीजीएस सुविधा सुरू केली आहे. परंतु, चेक क्‍लीअरिंगसाठी आरबीआयची परवानगी घ्यावी लागते. सोशल मीडियावर काही बॅंकांबाबत अफवा पसरविण्यात येत असून, नागरिकांनी त्यावर विश्‍वास ठेवू नये.
सुभाष मोहिते, अध्यक्ष, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशन

राणा कपूर यांची ‘ईडी’कडून चौकशी
मुंबई - येस बॅंकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांच्या वरळीतील घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापा घालत त्यांची चौकशी केली; तर शनिवारी (ता. ७) कपूर यांना पुन्हा ‘ईडी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात  चौकशीसाठी आणण्यात आले होते.

येस बॅंक प्रकरणात महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यासाठी ‘ईडी’ने कपूर यांच्या वरळीतील ‘समुद्र महल’ या घरावर शुक्रवारी छापा घातला. या वेळी कपूर यांची चौकशी करण्यात आली. या छाप्यात ‘ईडी’कडून कागदपत्रे आणि चित्रफितीचा दस्तऐवज जप्त करत, आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असेपर्यंत कपूर यांना देश सोडण्यासही ‘ईडी’ने मज्जाव केला आहे. दरम्यान अनियमिततेचे कारण पुढे करून रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेवर निर्बंध आणले आहेत. यानुसार खातेदारांना महिनाभरात फक्त पन्नास हजार रुपये काढता येणार आहेत. तसेच, येस बॅंकेचे संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले आहे. येस बॅंकेतून अनियमित कर्ज वितरित करण्यात आले होते. त्यात बांधकाम व फायनान्स विभागातील महत्त्वाच्या समूहाचे नाव पुढे येत आहे. हे कर्ज बुडाल्यामुळे येस बॅंकेतील अनियमितता पुढे आली होती, त्यामुळे कपूर यांच्या कुटुंबीयांच्या बॅंक खात्यांसंबंधीही ईडीने या वेळी चौकशी केली. दरम्यान, कपूर यांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी ईडीकडून केली जात आहे.

कुटुंबातील सदस्याला फायदा
बॅंकेकडून देण्यात आलेले कर्ज व त्यातून कपूर यांच्या कुटुंबातील सदस्याला फायदा झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, त्यामुळे त्या खात्याचीही पडताळणी ‘ईडी’ कडून करण्यात येत आहे. त्यात जमा झालेल्या रकमेचा नेमका स्रोत व व्यवहार जाणण्यासाठी कपूर यांची चौकशी सुरू असल्याचे ‘ईडी’च्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: 125 Banks face restrictions by Yes bank
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com