बनावट स्वाक्षरीने 14 लाखांचा अपहार

बनावट स्वाक्षरीने 14  लाखांचा अपहार

उमरगा (जि. उस्मानाबाद) : नगरपालिकेतील गैरव्यवहाराने कळस गाठला आहे. चार टप्प्यांतील एक कोटी ६१ लाखांचा अपहार उघडकीस आल्यानंतर दलित वस्ती सुधार योजनेच्या खात्यातील चौदा लाखांची रक्कम धनादेशाद्वारे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने उचलल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आला आहे. 

उमरगा पालिकेत यापूर्वी उघडकीस आलेल्या प्रकरणात पाच आरोपी आहेत. इंटरनेट बँकिंग प्रकरणात एका ठेकेदारावर ठपका आहे. गुरुवारी (ता. पाच) चौकशी समितीचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, लेखापाल अंकुश माने, नगर अभियंता रवींद्र सोनवणे, हरीशकुमार दाडगे यांनी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पुरवणी चौकशी अहवाल दिला आहे. त्यात दलित वस्ती सुधार योजनेच्या खात्यावरील चौदा लाखांची रक्कम उचलण्यात आल्याचे म्हटले आहे. 

असा केला अपहार 
शासनाकडून दलित वस्ती सुधार योजनेसाठी प्राप्त झालेली चौदा लाख आठ हजार २९२ रुपये शहरातील शिवाजी चौकातील एसबीआयच्या शाखेत पालिकेच्या बँक खात्यावर जमा होती. चार सप्टेंबर २०१८ रोजी पालिकेतून नंदेशकुमार झांबरे यांच्या नावे धनादेश देण्यात आला. त्यावर तत्कालीन मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांची स्वाक्षरी दिसते. तो धनादेश पाच ऑक्टोबर २०१८ रोजी वटला. चौकशी समितीला बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही बाब निदर्शनास आली. २२ मार्च २०१८ रोजी तत्कालीन मुख्याधिकारी श्री. चव्हाण येथून बदलून रोहा (रायगड) पालिकेत गेले. त्यानंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये हा धनादेश श्री. चव्हाण यांच्या स्वाक्षरीने बँकेत कसा काय वटला? तत्कालीन लेखापाल श्री. वडदरे यांनी हा धनादेश परस्पर कसा दिला, त्या धनादेशावर अक्षरे कुणाची आहेत? ही बाब तपासात समोर यायला हवी.

दरम्यान, श्री. चव्हाण बदलून गेल्यानंतर उमाकांत गायकवाड यांच्याकडे मुख्याधिकारीपदाचा काही महिने पदभार होता. त्यानंतर प्रकाश पाटील यांनी पदभार घेतला. त्यांच्या काळात धनादेश वटला असला, तरी स्वाक्षरी तत्कालीन मुख्याधिकारी श्री. चव्हाण यांची आहे. श्री. चव्हाण यांच्यानंतर दोघे मुख्याधिकारी आले. त्यांच्या स्वाक्षरीने व्यवहार व्हायला हवेत; पण ही बाब बँकेच्या लक्षात का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

श्री. चव्हाण यांच्याकडून मागविला खुलासा 
धनादेशावर तत्कालीन मुख्याधिकारी चव्हाण यांची स्वाक्षरी असल्याने विद्यमान मुख्याधिकारी श्री. पाटील यांनी त्यांच्याकडे खुलासा मागविला आहे. याबाबत श्री. चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माझ्या बनावट स्वाक्षरीने हा प्रकार झाल्याचे सांगितले. मी पदभार सोडत्यानंतर आर्थिक व्यवहारावर स्वाक्षरीचा प्रश्न येतो कुठून? असा प्रश्न करून यात लेखापाल व बँकेची अक्षम चूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबतचा खुलासा आपण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

WEB TITLE- 14 lakh raised by fake signature

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com