पश्चिम रेल्वेवर १६ हजार किलो कचरा

पश्चिम रेल्वेवर १६ हजार किलो कचरा

मुंबई:चर्चगेट ते विरार पट्ट्यात वांद्रे आणि दादर स्थानकादरम्यान दोन हजार किलो, मुंबई सेंट्रल-नालासोपरा आणि विरार स्थानकादरम्यान तीन हजार किलो, बोरिवली स्थानक परिसरातून एक हजार ५०० किलो, वसई स्थानक परिसरातून एक हजार किलो आणि अंधेरी स्थानकातून एक हजार किलो प्लास्टिकयुक्त कचरा गोळा केला.

रेल्वे रुळांच्या परिसरात साचलेल्या कचऱ्यांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होत नाही. पाणी साचल्याने चर्चगेट-विरार मार्गावरील लोकल फेऱ्यांवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार चर्चगेट ते विरारदरम्यान १६ हजार किलो कचरा गोळा करण्यात आला असून, यात सर्वाधिक प्रमाण प्लास्टिक कचऱ्याचे आहे. स्वच्छता मोहिमेंतर्गत ३० हजार स्वच्छता दूतांनी सहभाग घेतला. यात रेल्वे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांचा समावेश आहे.

सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांमध्ये प्लास्टिक कचरा अडकल्यामुळे गटारे तुंबतात. यामुळे गटारांमधील पाणी रुळांवर येते. ४ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. लोकल रद्द, रस्त्यांवर खड्डे आणि मेट्रोचे सुरू असलेले काम, यांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. या धर्तीवर पश्चिम रेल्वेने स्वच्छता अभियान सुरू केले आहे.

मध्य रेल्वेवर 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानक, रेल्वे कार्यालय, मोटरमन रनिंग रूम, प्रतीक्षालय, स्थानकातील स्वच्छतागृह, रेल्वे कर्मचारी वसाहत या ठिकाणी स्वच्छता राखण्यात येत आहे. प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी स्थानकातील स्टॉलधारकांना प्लॅस्टिक वस्तू न वापरण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि रायगड परिसराला आज, गुरुवारी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे मुसळधार पाऊस कोसळल्यास रेल्वे रुळांदरम्यान असलेल्या नाल्यांमधून सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरू करण्यात आलेला स्वच्छता उपक्रम ३० सप्टेंबरपर्यंत राबवला जाणार आहे.

WebTittle: 16,000 kg of waste on Western Railway

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com