एकट्या नागपूर जिल्ह्यात २० आमदार! नागपूर ठरला सर्वाधिक आमदारांचा जिल्हा 

साम टीव्ही
मंगळवार, 12 मे 2020
  • एकट्या नागपूर जिल्ह्यात २० आमदार ! 
  • नागपूर ठरला सर्वाधिक आमदारांचा जिल्हा 
  • विधिमंडळात नागपूरचा दबदबा 

नागपूर... राज्याची उपराजधानी.... याच नागपूर जिल्ह्याचा राज्याच्या राजकारणातला दबदबा आणखी वाढलाय. एकट्या नागपूर जिल्ह्यात तब्बल २० आमदार आहेत. प्रवीण दटकेंच्या रुपानं एक तरुण तडफदार आमदार नागपूर जिल्ह्याला मिळालाय. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्यानं दटकेंची आमदारकी निश्चित आहे. 
नागपूर जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. याशिवाय जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी विधानपरिषदेची एक जागा आहे. सध्या गिरीश व्यास या विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार आहेत. 
याशिवाय, पदवीधर मतदारसंघावरही अनेक वर्षांपासून नागपूरचाच दबदबा आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राजकीय कारकीर्द याच मतदारसंघामुळे बहरलीय. सध्या या पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व अनिल सोले करतायत. 
शिक्षक मतदारसंघावरही अनेक वर्षांपासून नागपूरचंच वर्चस्व आहे. नागोराव गाणार दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी भंडारा गोंदिया विधानपरिषद मतदारसंघात नागपूरच्या परिणय फुकेंना पाठवलं होतं. अतिशय अवघड वाटणारी निवडणूक फुकेंनी जिंकली होती. प्रफुल्ल पटेल यांचं वर्चस्व या निवडणुकीत फुकेंनी संपुष्टात आणलं होतं. फुकेंना राज्यमंत्रिपदही मिळालं होतं. 
नागपूरच्या राजकारणातला महत्त्वाचा आणखी एक चेहरा म्हणजे जोगेंद्र कवाडे... 
कवाडे अनेक वर्षांपासून विधानपरिषदेत नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करतायत. खैरलांजी हत्याकांडानंतर कवाडेंनी विधानपरिषदेचा राजीनामा दिला होता. त्या दरम्यान, त्यांचा उर्वरित काळ वनराईचे गिरीश गांधी यांनी पूर्ण केला होता. कवाडे यांना त्यानंतर काँग्रेसनं विधानपरिषदेत संधी दिली. 
 

प्रकाश गजभिये यांनाही याच दरम्यान विधानपरिषदेची लॉटरी लागली. त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ जून महिन्यात पूर्ण होतोय. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. 
याशिवाय, नागपूरचेच रहिवासी असलेल्या रामदास आंबटकर यांना चंद्रपूर यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर भाजपनं पाठवलं. आंबटकर यांनी अनेक वर्षं भाजपात संघटनमंत्री म्हणून काम केलंय. 
आता प्रवीण दटकेंच्या रुपानं नागपूर जिल्ह्याला २० वा आमदार मिळालाय. त्यामुळे नागपूर जिल्ह्याचं राज्याच्या राजकारणातलं स्थान आणखी वरचढ झाल्याची चर्चा आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live