शेतकऱ्यांना तब्बल 225 कोटींचा फटका 

साम टीव्ही
बुधवार, 20 मे 2020
  • कोरोनाचा फटका ढोबळी मिरचीला
  • शेतकऱ्यांना तब्बल २२५ कोटींचा फटका 
  • उत्पादन खर्च वसूल करणंही झालं कठीण 

कोरोनाचा मोठा फटका ढोबळी मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय... गेल्या २ महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यात शेतकऱ्यांना तब्बल २२५ कोटींचा फटका बसलाय.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातल्या ढोबळी मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. कारण ढोबळी मिरचीला मागणी असलेली मोठमोठ्या शहरांमधली हॉटेल्स, रेस्टॉरंट गेल्या २ महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे ढोबळी मिरचीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही मागणी घटल्यानं उत्पादन खर्चही मिळेनासा झालाय. एरवी ७० ते ८० रुपये किलो या दरानं विकली जाणारी ढोबळी मिरची सध्या अक्षरशः २० ते २५ रुपयांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवायला सुरुवात केलीय. 
नाशिक जिल्ह्यात जवळपास ३०० एकरावर ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. या ढोबळी मिरचीला साधारणपणे ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. तर याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो १८ ते २५ रुपये इतका असतो. मात्र, सध्या ढोबळी मिरचीला अवघा १५ ते २० रुपये प्रतिकिलो इतका दर मिळतोय. सुमारे ३० ते ४० रुपये इतकी प्रतिकिलो दरातली तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी सुमारे ४ लाख रुपयांचं नुकसान सोसावं लागतंय. 
नाशिक जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरत लाखो रूपये कर्ज काढून पॉलिहाऊस आणि शेडनेटमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचं उत्पादन घ्यायला सुरूवात केलीय. शहरांमधील फास्ट फुड, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल संस्कृतीमुळे मागणीत झालेली वाढ आणि मिळणारा चांगला दर यामुळे जिल्ह्यातील कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, दिंडोरीसह अन्य तालुक्यांमधले शेतकरीही ढोबळी मिरचीच्या उत्पादनाकडे वळलेत. मात्र देशात कोरोना आला आणि लॉकडाऊन झालं. मोठमोठ्या शहरांमधली मिरचीची मागणी आणि पुरवठा बिघडला, निर्यातही घटली. त्यामुळे मागणीअभावी व्यापारीही निम्म्याहून कमी भावात ढोबळीची खरेदी करू लागलेयत. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live