13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकले

सरकारनामा
बुधवार, 11 मार्च 2020

राज्यातील 13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. आगामी दोन महिन्यांत ही रक्‍कम न मिळाल्यास त्याचा परिणाम खरीप हंगामातील कर्जवाटपावर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

औरंगाबाद- येस बँकेत शेतकऱ्यांची खाती सहसा नसतात तरीही येस बँकेमुळे शेतकरी कसा अडचणीत आलाय. खातेदारांना आरटीजीएस, एनईएफटीची सेवा पुरविण्यासाठी बहूतांश जिल्हा बॅंका 'येस बॅंके'कडून सब-मेंबरशीप घेतली. सोलापूर, पुणे, अकोला, बीड, औरंगाबाद, नाशिक, यवतमाळ, अकोला, नागपूर, बुलडाणासह राज्यातील 13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. आगामी दोन महिन्यांत ही रक्‍कम न मिळाल्यास त्याचा परिणाम खरीप हंगामातील कर्जवाटपावर होऊ शकतो, असे बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

खातेदारांच्या सोयीसाठी त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात सब-मेंबरशिप बदलली आहे. तर रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार येस बॅंकेच्या माध्यमातून काही बॅंकांचे एनईएफटी, आरटीजीएस व चेक क्‍लेअरिंगचे काम सुरु करण्यात आल्याचे को-ऑपरेटिव्ह बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर बॅंकेचा रुपयाही येस बॅंकेत अडकला नसल्याचे बॅंकेचे अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

देशातील 110 बॅंकांची सब-मेंबरशिप असलेल्या येस बॅंकेद्वारे आरटीजीएस व एनईएफटीचे ऑनलाइन व्यवहार सुरु होते. त्यामध्ये विशेषत: महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बॅंका, नागरी व व्यापारी बॅंका, को-ऑपरेटिव्ह बॅंकांचा समावेश आहे. या बॅंकांनी ऑनलाइन सेवांसाठी येस बॅंकेकडे डिपॉझिट म्हणून जमा केलेली अनामत रक्‍कम आता बॅंक अडचणीत सापडल्याने अडकून पडली आहे. दरम्यान, येस बॅंक बंद पडल्यानंतर बहुतांश बॅंकांनी सब-मेंबरशिप बदलली असून काही बॅंकांनी आयसीआयसीआय तर काही बॅंकांनी एचडीएफसी बॅंकांकडे धाव घेतली आहे. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची आरटीजीएस व एनईएफटीची सेवा येस बॅंकेच्या माध्यमातून सुरु होती. मात्र, बॅंक बंद पडल्यानंतर काही तासांतच जिल्हा बॅंकेने आयसीआयसीआय बॅंकेच्या माध्यमातून ही सेवा ग्राहकांना दिली जात आहे - शैलेश कोथमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यतर्वी बॅंक, सोलापूर

आता RBI येस बॅंक चालविणार ?

येस बॅंकेत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे 49 टक्‍के शेअर आहेत. येस बॅंक अडचणीत सापडल्याने बॅंकेच्या खातेदारांची मोठी पंचाईत झाली आहे. देशातील 110 बॅंका येस बॅंकेच्या सबमेंबरशिपमध्ये आहेत. या बॅंकांची रक्‍कमही अडकून पडल्याने खातेदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंक आता ही बॅंक चालविणार असल्याने अडकलेली रक्‍कम दोन महिन्यांत मिळेल, असा विश्‍वास काही बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला.

 WEB TITLE- 370 crore stuck in 'Yes Bank' of district banks


संबंधित बातम्या

Saam TV Live