RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

प्रश्‍न - सध्या तुम्ही देशभर प्रचार करत आहात. काँग्रेस मतदारांसमोर कोणते मुद्दे घेऊन जात आहे. पक्षाच्या जाहीरनाम्याविषयी काय सांगाल? तो कसा तयार करण्यात आला?
उत्तर -
 जाहीरनाम्याची तयारी सुरू केली तेव्हा पहिल्यांदाच मी पक्षातील विचारवंत, तज्ज्ञ आणि वेगवेगळ्या व्यावसायिक गटांमधल्या सदस्यांना स्पष्टच सांगितले, की तुम्हाला काय अपेक्षित आहे, हे मला माहीत आहे. त्यात मला रस नाही. देशातील सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे, यात मला स्वारस्य आहे. त्यातून तयार होणारा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा म्हणून प्रसिद्ध होणार असला तरी, प्रत्यक्षात तो देशाचाच जाहीरनामा असायला हवा; काही मूठभरांनी तयार केलेला नको. छत्तीसगडमध्ये आम्ही एक प्रयोग केला. हजारो लोकांशी आम्ही पद्धतशीररीत्या संवाद साधला. 

थेट समाजातील संबंधित घटकांपर्यंत पोचून त्यांची यादी तयार करण्यास मी आमच्या टीमला सांगितले. मी त्यांना असेही सांगितले, की प्रथमदर्शनी अव्यवहार्य वाटणाऱ्या कल्पना कोणाकडून आल्या तरी त्या झिडकारू नका, मला त्या कल्पना हव्या आहेत. 

एखाद्या शेतकऱ्याने जर काही अगदी अशक्‍य वाटणारी गोष्ट सुचविली तरी मला ती हवी आहे. त्याच्या मनात काय आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. सर्व माहिती, कल्पना, सूचनांचे संकलन झाल्यानंतर आपण ठरवूयात की त्यातील काय घ्यायचे ते. आमचा जाहीरनामा हा अशा लोकसहभागाच्या प्रक्रियेतून तयार झाला आहे. तो पारंपरिक पद्धतीचा 
जाहीरनामा नाही.

प्रश्‍न - अशा प्रकारचा हा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे का?
उत्तर -
 हो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असा प्रयोग जगात पहिल्यांदाच झाला आहे. सुमार दर्जाच्या सूचना येतील की काय अशी सुरवातीला काळजी वाटत होती. पण आश्‍चर्याची बाब अशी, की प्रत्यक्षात खूपच चांगल्या कल्पना पुढे आल्या. 

स्वतंत्र मत्स्योद्योग मंत्रालय स्थापन करावे, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करावा, या त्यापैकी काही उत्तम कल्पना. ‘न्याय’ ही योजनादेखील अशा संवादातूनच आली. हेच काम जर काही ठराविक लोकांनी एका खोलीत बसून केले असते, तर त्यात अशा गोष्टी आल्या नसत्या.

प्रश्‍न - म्हणजे ‘न्याय’ ही योजना या प्रक्रियेतून पुढे आली आहे?
उत्तर -
 अर्थातच! पारदर्शी पद्धतीने गरिबातील गरिबाला थेट आर्थिक साह्य करणे ही ‘न्याय’मागील गाभ्याची कल्पना आहे. पण त्याचबरोबर या योजनेमागचा आणखी एक पैलू आहे. नोटाबंदी आणि वस्तू-सेवाकराची (जीएसटी) सदोष अंमलबजावणी, यामुळे लहान व मध्यम उद्योजकांवर आधीच संकट कोसळले आहे. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेलाच फटका बसला आहे. इंधनच नसल्याने अर्थव्यवस्थेचा गाडा रुतल्यासारखा झाला आहे. त्यामुळे त्यात कशा रीतीने जीव आणता येईल, हे पाहायला हवे.

बॅंकिंगच्या मार्फत हे सध्या तरी शक्‍य नसल्याने ‘न्याय’ हेच त्यावर उत्तर आहे. लोकांच्या हातात थेट पैसा पोचला तर ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च करतील. त्यातून मागणी वाढू शकेल. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा (नरेगा) अनुभव होताच. २००४ ते २००९ या काळात विकासाला जी गती मिळाली, त्याचे कारण ‘नरेगा’ हे होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यामुळे पैसा आला. अशा प्रकारे थेट आर्थिक साह्य करून अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा वेगाने फिरू लागावीत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याविषयीचा अभ्यास आम्ही केला आहे. गणित मांडले आहे. काँग्रेस पक्षाच्या लोकांनी हे केले आणि मला दाखवले; पण तेवढ्यावर मी समाधानी नव्हतो. जगभरातील तज्ज्ञांनाही ते दाखवले. त्यानंतर ते पुन्हापुन्हा तपासून घेतले आहे. एकदा, दोनदा नव्हे तर तीनतीनदा तपासून घेतले आहे. ‘न्याय’साठी आम्ही मध्यमवर्गीयांच्या खिशातून पैसा काढणार, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. परंतु आम्ही तसे अजिबात करणार नाही. प्राप्तिकरात वाढ केली जाणार नाही. व्यवस्थेत पैसा आहेच. तो ‘न्याय’मार्फत वितरित केला, की संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी ते उपकारक ठरेल.

प्रश्‍न - रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यांसारख्या मुद्द्यांचे काय?
उत्तर -
 हे पाहा. सध्या भारताला तीन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. रोजगाराचे संकट, शेतीतील संकट आणि अर्थव्यवस्थेपुढील संकट. हे तीनही प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले आहेत. आपल्या व्यवस्थेकडे समग्र दृष्टीने पाहिले पाहिजे. स्टार्टअपसाठी धोरण आखले आणि त्यात शेतीचा समावेश केलाच नाही, तर ते अयोग्य होईल. तुम्ही रोजगार निर्माण कसे करणार? तो शेतीतूनच निर्माण होईल. बांधकाम क्षेत्रातून तयार होईल. त्यामुळेच या सगळ्यांचा समग्र विचार आवश्‍यक आहे. मोदी हे लक्षात घेत नाहीत आणि हीच त्यांची समस्या आहे.  

ते तुकड्या-तुकड्याने या सगळ्यांचा विचार करतात. ते आधी एका गोष्टीवर भर देतात, मग दुसरी गोष्ट विचारात घेतात, त्यानंतर तिसऱ्या गोष्टीकडे वळतात. ही पद्धतच फार चुकीची आहे. नोटाबंदी हे याचे उदाहरण.

काश्‍मीरविषयक धोरण आणि जीएसटी हेदेखील याच शैलीचे उदाहरण. भारतीय अर्थव्यवस्था नावाच्या ‘जिगसॉ पझल’मधील सगळे तुकडे नीट जुळण्याच्या दृष्टीने धोरणात्मक व्यूह ठरवणे आवश्‍यक आहे. आम्ही काय साध्य करू इच्छितो आणि किती वेळात, याचा नीट विचार केला तर रोजगाराचा प्रश्‍न सुटू शकतो. शेतीची समस्याही सुटू शकते. आपल्या धोरणांचा परिणाम ज्यांच्यावर होणार आहे, त्या समाजातील व्यक्तींशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय यशस्वी धोरणे आखता येत नाहीत. भारतीय समाजाच्या अंगभूत जाणतेपणाबद्दल काँग्रेस पक्षाला विश्‍वास आहे. आम्ही लोकांसाठी काम करतो, लोकांचे ऐकतो, त्यांच्याकडून शिकतो. मोदी, भाजप आणि काँग्रेस पक्ष यात हाच मूलभूत फरक आहे.

प्रश्‍न - ही सगळी प्रक्रिया तुम्ही सातत्याने कशी सुरू ठेवणार? त्यादृष्टीने लोकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची सातत्यपूर्ण प्रक्रिया तुम्ही राबविणार का? एकदाच काही घडले आणि नंतर एकदम दहा वर्षांनी... असे व्हायला नको...
उत्तर -
 जाहीनाम्याचा मसुदा हा एक सातत्यपूर्ण दस्तावेज आहे. आम्ही सातत्याने लोकांच्या संपर्कात राहू आणि त्यांचा प्रतिसाद जाणून घेऊ. त्यातून स्वतःमध्ये अधिकाधिक सुधारणा करत राहू. समाजातील वेगवेगळ्या घटकांशी बोलत राहणार आहोत. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांच्या कायम संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊ. शेतीचा पेचप्रसंग सोडविण्यासाठी आमच्याकडे जादूची कांडी आहे, असे मी मानत नाही; पण या देशातील शेतकऱ्यांना जर वाटले की सरकार आपले आहे, आपल्या प्रश्‍नांविषयी संवेदनशील आहे आणि संकटाच्या प्रसंगी आपली विचारपूस करणारे आहे, तर सरकारवर त्यांचा विश्‍वास बसतो. अशा प्रकारे विश्‍वास संपादन करणे ही फार महत्त्वाची आणि सामर्थ्य देणारी बाब आहे. सर्व भारतीयांनी एकत्र येऊन काम केले, शेतकरी, स्त्रिया, लघू उद्योजक अशा विविध घटकांना आपण एकटे नाही, याची जाणीव झाली तर असे कोणतेही आव्हान नाही, की ज्यावर आपण मात करू शकत नाही, असा माझा ठाम विश्‍वास आहे.

प्रश्‍न - ‘आप’ने काहीतरी योग्य करून दाखवले आहे, आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे, लोकांमध्ये जाऊन, त्यांना जाणून घेतले पाहिजे, असे तुम्ही २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर म्हणाल्याचे मला आठवते आहे. २०१४ नंतर राहुल गांधी म्हणून तुम्ही काय शिकलात? काही तज्ज्ञांची मते जाणून घेण्यापेक्षा थेट लोकांमध्ये जाऊन त्यांचे मत जाणून घ्यावे, हेच तुम्ही कार्यकर्त्यांना सांगत आहात काय?
उत्तर -
 शिकणं म्हणाल तर, २०१४ ही चांगली बाब आहे. माझ्या दृष्टीने ती अतिशय प्रभावी घटना होती. अनेक गोष्टींबाबत या घटनेने मला विचार करायला भाग पाडले. लोकांमध्ये जाण्यास भाग पाडले. तुम्हाला आठवत असेल तर, नरेंद्र मोदी खूप मताधिक्‍याने सत्तेवर आले. प्रत्येक जण असंच सांगत होता, की नरेंद्र मोदी दीर्घकाळ पंतप्रधान पदावर राहतील; पण आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला. सत्य बाहेर आणले. जे नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेवर आले होते ते आता तसे राहिलेले नाहीत. दोन कोटी रोजगार? अपयश. शेती? अपयश. भ्रष्टाचारमुक्ती? अपयश. त्यांचे सर्व प्रकारचे मुखवटे आम्ही दूर केलेत, ते आज तुम्ही त्यांच्या चेहेऱ्यावरूनही अनुभवत असाल. सध्याच्या निवडणुकीत, त्यांच्याकडे सांगण्यासारखं खरंच काहीही नाहीये. भारताच्या या पंतप्रधानांनी व्यासपीठावर उभं राहून सांगावं, की त्यांनी किती रोजगारांची निर्मिती केली. व्यासपीठावरून त्यांनी सांगावं शेतकऱ्यांसाठी काय केलं ते? ते काहीही सांगतच नाहीत. त्यांच्या जाहीरनाम्याकडे पाहा, उभ्या देशाला भेडसावणाऱ्या रोजगाराच्या प्रश्‍नावर त्यात मौन बाळगलं आहे. पंतप्रधान मौन बाळगून आहेत. नोटाबंदी का केली, याचेही स्पष्टीकरण ते जनतेला देत नाहीत. जीएसटी ही एक आपत्ती ठरली आहे, त्याबाबत काही समस्या आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत, हेही पंतप्रधान जनतेला सांगत नाहीत.

प्रश्‍न - मग तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल?
उत्तर -
 निश्‍चितच! जीएसटी बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी आहे. आपल्याला एक कर हवाय, कमी कर हवाय आणि सुटसुटीत कर हवाय. त्याच्या नोंदी ठेवणे, अहवाल देणे सोपे असावे. कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता सामान्य व्यक्तीही आपल्या कराची विवरणपत्रे स्वतः दाखल करू शकेल, एवढी सुटसुटीत प्रणाली हवी. त्यादृष्टीने आम्ही आमचा गृहपाठही केलेला आहे. जीएसटीमध्ये बदल केला पाहिजे, एवढेच मी म्हणत नाही, आम्ही जीएसटी बदलाच्या प्रक्रियेबाबत आभ्यासही केलेला आहे. त्याचे गणित आम्हीही मांडलेले आहे. देशाला एकच जीएसटी हवा या कल्पनेची चाचणीदेखील आम्ही घेतलेली आहे.

प्रश्‍न - काँग्रेसच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याविषयी तुम्ही चर्चा करत आहात. अनेक तज्ज्ञांशी तुम्ही सातत्याने सल्लामसलत करत असता, त्याचबरोबर तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोचण्याचा तुमचा प्रयत्न आहे का?
उत्तर -
 जेव्हा भारत एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तो ती करतोच. तुम्ही हरितक्रांती पाहा. पुढाकार कोणाचाही असो, अखेर ते संपूर्ण भारताचे यश आहे. जेव्हा तुम्ही आयटी क्षेत्रातील क्रांतीकडे पाहता, तेव्हा ते भारताने करून दाखवलेले दिसते. जेव्हा श्‍वेतक्रांतीकडे पाहतो तेव्हाही लक्षात येते भारताने ते करून दाखवले आहे. माझ्या मनात कोणताही गोंधळ नाही. हे सगळे एका व्यक्तीने केले आहे, असे अजिबात नाही. ‘‘सत्तर साल से हाथी सो रहा है’’ असे म्हणून मी कधीच भारतीयांचा अपमान करणार नाही. हाथी कभी नहीं सोता. खरे तर, हाथी कभी सो नही सकता! मोकळेपणानेच सांगायचे तर, हिंदुस्थान हाथी नही है, शेर है! 

हा पूर्णतः वेगळाच दृष्टिकोन आहे. मी स्वतःकडे गोष्टी घडवून आणणारा, त्यासाठी इतरांना सक्षम करणारा अशा दृष्टीने पाहतो, मी लोकांचे ऐकून घेतो, त्यांची टीकाही सहन करतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या भूमिका समजून घेतो. नरेंद्र मोदी स्वतःला देशाच्या केंद्रस्थानी मानतात. नाही, या देशाच्या केंद्रस्थानी कोणीही नाही. हा देश खूप मोठा आहे, खूप हुशार आहे, खूप शक्तिमान आहे, एकच एक व्यक्ती या देशाच्या केंद्रस्थानी असू शकत नाही.

प्रश्‍न - मोदी घराणेशाहीवर बोलतात... तुम्हांला जर काँग्रेसमधील घराणेशाही, गुणवत्ताशाहीबाबत विचारलं, तर तुम्ही काय सांगाल?
उत्तर -
 प्रथमतः मी लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आहे. मी लोकसभेच्या तीन निवडणुका जिंकलोय. लोकांचे प्रतिनिधित्व करायला मी योग्य आहे की नाही, हे लोकच ठरवतील ना! नंतर मला माझ्या गुणवत्तेवर तपासा. मी जी राजकीय लढाई लढतोय, त्यावर माझे मूल्यमापन करा. कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता मी पाच वर्षे मोदींशी लढतोय! काँग्रेसने मुखवट्यामागचे मोदी दाखवून दिले आहेत. अखंड भारतभर एकच स्लोगन गाजते आहे - चौकीदार चोर है! रस्तोरस्तो हीच स्लोगन आहे. ते त्यांना आवडत नाही, पण तेच खरे आहे. म्हणून माझे गुणवत्तेवर मूल्यमापन करा. मी कसा लढा देतोय त्यावर माझे मूल्यमापन करा. मी भूमिका काय घेतो, त्यावर मूल्यमापन करा. शेतकरी, युवक, महिला, छोटे व्यावसायिक यांच्यासाठी काय करतो, त्यावर माझे मूल्यमापन करा. मी त्यांच्यासाठी काय केले ते पाहा. या सर्व बाबींवर माझे मूल्यमापन करा.

नेत्यांची मुले म्हणून काँग्रेस पक्षात काही प्रमाणात वारसा आहे. पण हे केवळ काँग्रेसमध्येच आहे, असे नव्हे. सर्वच राजकीय पक्षांत हे आहे. तथापि, या तरुणवर्गात मोठमोठ्या क्षमता आहेत. ते सक्षम आहेत. त्यामुळेच राजकारण्यांच्या या वारसदारांवर आपण पूर्णतः बंदी नाही आणू शकत. सर्व बुद्धिमान व्यक्तींसाठी आमचे दरवाजे खुले आहेत आणि येथे आल्यानंतर क्षमतेनुसार त्यांच्या वाढीला वाव आहे, याची मात्र आम्ही खात्री दिली पाहिजे.

प्रश्‍न - जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार?
उत्तर -
 मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन प्रमुख समस्यांना तोंड देत आहे. येथे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत, रोजगाराची समस्या आहे, आर्थिक पेच आहेत. हे तिन्हीही एकमेकांत गुंतलेले आहेत. ज्या पंतप्रधानांनी पदावर पाच वर्षे काढताना केवळ टोलवाटोलवीच केली, या समस्यांवर तोडगाच काढला नाही, त्यांनी विचार करावा, हे का घडले? गेल्या ४५ वर्षांत आपल्याकडे रोजगार का घटला? याचे तरी जनतेला उत्तर द्यावे. छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांची वाढ का खुंटली? देशात एकमेकांविरोधात एवढे टोकाचे ध्रुवीकरण का झाले? जम्मू-काश्‍मीरमध्ये लोक एवढ्या मोठ्या संख्येने मृत्युमुखी का पडत आहेत, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी द्यावीत.

प्रश्‍न - काश्‍मीर प्रश्‍नाबाबत तुमची भूमिका काय आहे? नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे?
उत्तर -
 २०१४ मध्ये आम्ही जेव्हा सत्तेवरून दूर झालो तेव्हा तसे पाहिले तर जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वार्थाने शांतता होती. त्यावर आम्ही नऊ वर्षे काम केले आहे. जम्मू-काश्‍मिरातील लोकांशी दृढसंबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. मी तेथे उद्योग नेले. महिलांचे स्वयंसाह्यता गट तयार केले. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले. तेथे आम्ही शांततेत पंचायत निवडणुका घेतल्या. सर्वार्थाने तेथे शांतता नांदून तेथील दहशतवादाचे कंबरडे मोडले.

श्रीनगरला दररोज विमानांच्या पंधरा फेऱ्या होत होत्या. पर्यटनवाढीला लागले होते. अर्थकारणाला चालना मिळाली होती. नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी ‘पीडीपी’शी संधिसाधू आघाडी केली, त्याने भारताच्या व्यूहरचनात्मक बाबींत मोठा गोंधळ निर्माण केला. त्यांनी दहशतवाद्यांना काश्‍मीरचा दरवाजाचा खुला करून दिला. त्याची त्यांनी उत्तरे दिली पाहिजेत.

सीआरपीएफचे जवान मारले गेले. पाकिस्तानला जे पाहिजे ते त्यांनी केले, पण नरेंद्र मोदी यांची ही जबाबदारी होती की त्यापासून सर्वांचे रक्षण करणे. पण चर्चा काहीच झाली नाही. उलट जो कोणी याबाबत प्रश्‍न विचारेल त्याला देशविरोधी समजले गेले.

मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला होत होता, इमारतींच्या आत लोक मारले जात होते, तेव्हा नरेंद्र मोदी बाहेर स्वतःच्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमात मग्न होते, याचीही मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. तिथे उभे राहून ते हॉटेलच्या आत सुरू असलेल्या हिंसाचाराचा पूर्ण फायदा उठवत होते, पत्रकार परिषदा घेत होते. सगळ्यांनाच हे आठवते. अशा रीतीने दहशतवादी हल्ल्यांचा राजकीय फायदाही उठवता येऊ शकतो. पुलवामाचा हल्ला झाला त्या वेळची माझी भूमिका अत्यंत सुस्पष्ट होती. मी म्हणालो, काँग्रेस याविषयी एक शब्दही बोलणार नाही. विषय संपला. यापुढे चर्चा नाही; पण तो हल्ला झाल्यापासून प्रत्येक दिवशी नरेंद्र मोदी त्या हल्ल्याचा राजकीय उपयोग करीत आहेत. आपल्या जवानांना राजकारणासाठी वापरण्याला माझा विरोध आहे. जेव्हा ते एखादी कारवाई करतात, तेव्हा त्या कारवाईचे पूर्ण श्रेय त्यांचे असते; राजकीय नेत्यांचे किंवा राजकीय पक्षांचे नाही. लष्कराकडून कारवाई केली जाते, त्यांच्याबद्दल अभिमान आहे, ते सक्षम आहेत, कारवाईचे श्रेय त्यांचेच आहे आणि ते त्यांनाच मिळाले पाहिजे.

प्रश्‍न - मोदी राष्ट्रवादावर भर देत आहेत, त्याबद्दल आपल्याला काय वाटते?
उत्तर -
 आपल्या देशात नोकऱ्या निर्माण करण्यापेक्षा मोठा राष्ट्रवाद काय असू शकतो? आपल्या शेतकऱ्यांचे रक्षण करणे, तरुणांना नोकऱ्या देणे हाच सर्वोत्तम राष्ट्रवाद आहे. त्यांनी (मोदी यांनी) या संदर्भात काय केले आहे? बेरोजगारांची गेल्या ४५ वर्षांतली सर्वाधिक संख्या त्यांच्या सरकारच्या काळात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण आधी कधीच नव्हते एवढे आहे, असे त्यांचेच सरकार म्हणत आहे. याची सगळ्यांनाच कल्पना आहे.

माझ्या मते भारतासमोरचे महत्त्वाचे प्रश्‍न म्हणजे शेतीचा प्रश्‍न, अर्थव्यवस्थेचा प्रश्‍न आणि बेरोजगारी. आणि राष्ट्रवादी असणाऱ्या प्रत्येकाने हे प्रश्‍न सोडवण्यासाठी त्याच्याकडून होतील ते प्रयत्न करायला हवेत आणि ते (मोदी) जर हे करू शकत नसतील, तर त्यांना अपयश का आले, हे त्यांनी संपूर्ण देशाला सांगायला हवे. भारत जर तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नसेल, आज देशात रोज २७ हजार नोकऱ्या जात आहेत, आणि चीन रोज ५० हजार नोकऱ्या नव्याने निर्माण करत आहे. भारत हा प्रश्‍न सोडवू शकला नाही, तर भारतासमोर एक मोठे संकट उभे राहील. राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्तींसमोर आज रोजगारनिर्मिती एवढे दुसरे कोणतेही महत्त्वाचे काम नाही. इथे मोदी पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत, अत्यंत वाईट, अपमानास्पद रीतीने अयशस्वी ठरले आहेत. अशा स्थितीत त्यांना राष्ट्रवादी म्हणता येणार नाही.

प्रश्‍न - नरेंद्र मोदी यांची एक विचारधारा आहे. इंदिरा गांधींची विचारधारा काँग्रेस पुढे नेत आहे. तुमच्यावर तुमच्या आजींच्या (इंदिरा गांधी यांचा) विचारांचा मोठा प्रभाव आहे. या विचारधारांकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर -
 प्रश्‍न राहुल गांधीच्या किंवा इंदीरा गांधींच्या विचारधारेचा नाही. काँग्रेसची विचारधारा ही भारताची विचारधारा आहे. 

प्रश्‍न - काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि देशाची विचारधारा एकच आहे, असे आपणास म्हणायचे आहे का?
उत्तर -
 एखादी व्यक्ती म्हणजे लोकांच्या आवाजाचे प्रतिबिंब असते. भारताचा विचार करताना कृपया इतिहास लक्षात घ्या; विनय, आदर आणि प्रेमाने पाहा. ही या देशाची पूर्वपीठिका आहे. मी गीता, उपनिषदे आणि वेद वाचले आहेत, पूर्ण नाही, पण बऱ्यापैकी वाचले आहेत. दुबळ्यांचे जीव घ्या किंवा तुमच्या गुरूचा अपमान करा किंवा लोकांचा तिरस्कार करा, त्यांच्याबरोबर कठोरपणे वागा, असे मी त्यात कुठेही वाचले नाही.

सर्वांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्व. इतरांच्या कल्पना ऐकणे. तुम्हाला इतरांच्या कल्पना पटत नसतील तरी त्यांच्याबद्दल मोकळेपणाने विचार करणे म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्व म्हणजे इंदिरा गांधी किंवा राहुल गांधी नव्हे. आपण कोणीच नाही. हा भारताचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्याने भारत या कल्पनेला आकार दिला आहे. भारत मुळातच विनयशील आहे. यशस्वी झालेले आपले सगळे नेते पाहा, तुम्हाला हजारो वर्षांची परंपरा दिसेल. सम्राट अशोक असतील किंवा महात्मा गांधी असतील. भारतातल्या नेत्याकडे असणारा एकमेव मोठा सद्‌गुण म्हणजे त्याची विनयशीलता आणि लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी. हे भारताचे नेतृत्व आहे. हा मुद्दा इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, राहुल गांधी किंवा कोण्या एका नेत्यापुरता मर्यादित नाहीये. तो संपूर्ण भारतातल्या लोकांशी संबंधित आहे.

प्रश्‍न - तुम्ही खूप तंदुरुस्त आहात, ब्लॅक बेल्टधारक आहात. मोदीजी योगासने करतात. तुम्ही योगा करता का?
उत्तर -
 मी अकिडो या जपानी मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्टधारक आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मी योगासने करायचो, पण आता नाही शक्‍य होत.

प्रश्‍न - सध्या तुमचा प्रचंड प्रवास सुरू आहे, तुम्ही सतत कामात बुडालेले असता. या सगळ्यासाठी वेळेचे नियोजन कसे करता?
उत्तर -
 व्यायामासाठी सध्या मी माझ्या पद्धतीने आवश्‍यक तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. पण साधारणपणे मी रोज एक तास नियमितपणे व्यायामासाठी देतो. याला खूप शिस्त लागते आणि एखाद्या दिवशी मलाही निश्‍चयाने वेळ काढावा लागतो. माझ्यासाठी हे खरेच खूप महत्त्वाचे आहे.

प्रश्‍न - तुम्ही जेव्हा शिवभक्त असे म्हणवता, त्याचा अर्थ काय?
उत्तर -
 ते तुम्हाला विस्ताराने सांगायचे म्हणजे मला किमान दोन तास लागतील. शिव म्हणजे सर्वकाही. म्हणून तुम्ही जेवढे विनयशील बनू शकाल; तेवढे -त्याहूनही जास्त विनयशील व्हा. आणि एवढेच पुरेसे नाही. स्वतःमधला सगळा अहंकार संपवण्याचा हा विषय आहे. हा एक प्रवास आहे. तुम्ही आयुष्यात जसे जसे पुढे जाता, तसे तसे तुम्ही अधिकाधिक इन्सिग्निफिकंट होत जाता. मग जी भावना प्रबळ होते ती विनयाची, दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची, दुसऱ्यांच्या दृष्टिकोनाचा आदर करणारी असते. मी नेहमी म्हणतो, मोदी माझ्यावर कितीही टीका करोत, पण माझ्या मनात त्यांच्याविषयी रागाची, द्वेषाची भावना नाही. ते एका व्यक्तिमत्त्वाची अभिव्यक्ती आहेत आणि ते जे म्हणतात ते या देशासाठी धोकादायक असल्याने मी त्यांच्याशी पूर्णपणे असहमत आहे. तसे असले तरी मी त्या अभिव्यक्तीचा आदर करतो. मला वाटते हे एका कमजोरीतून येते, आणि अशा कमजोरीतून देशाचे नेतृत्व व्हावे, हे मला कधीही आवडणार नाही. याविरुद्ध माझा लढा असेल, पण माझ्या मनात तिरस्कार मात्र नसेल.

मी अकिडो या जपानी मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्टधारक आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मी योगासने करायचो.

आमची सत्ता आल्यावर जीएसटीचा कायदा बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी आहे. आपल्याला एक कर हवाय, कमी कर हवाय आणि सुटसुटीत कर हवाय. त्याच्या नोंदी ठेवणे, अहवाल देणे सोपे असावे. कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता सामान्य व्यक्तीही आपल्या कराची विवरणपत्रे स्वतः दाखल करू शकेल, एवढी सुटसुटीत प्रणाली हवी.

राष्ट्रवादी विचाराच्या व्यक्तीसमोर आज रोजगारनिर्मिती एवढे दुसरे कोणतेही महत्त्वाचे काम नाही. इथे मोदी पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत, अत्यंत वाईट, अपमानास्पद रीतीने अयशस्वी ठरले आहेत. अशा स्थितीत त्यांना राष्ट्रवादी म्हणता येणार नाही.

जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा म्हणून प्रसिद्ध होणार असला, तरी प्रत्यक्षात तो देशाचाच जाहीरनामा असायला हवा; काही मूठभरांनी तयार केलेला नको.

आपल्या धोरणांचा परिणाम समाजातील ज्या व्यक्तींवर होणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय यशस्वी धोरणे आखता येत नाहीत. 

पुलवामाचा हल्ला झाला त्या वेळची माझी भूमिका अत्यंत सुस्पष्ट होती. मी म्हणालो, काँग्रेस याविषयी एक शब्दही बोलणार नाही. आपल्या जवानांचा राजकारणासाठी वापरण्याला माझा विरोध आहे. जेव्हा ते एखादी कारवाई करतात, तेव्हा त्या कारवाईचे पूर्ण श्रेय त्यांचे असते; राजकीय नेत्यांचे किंवा राजकीय पक्षांचे नाही.

आमचा जाहीरनामा लोकसहभागाच्या प्रक्रियेतून तयार झाला आहे. तो पारंपरिक पद्धतीचा जाहीरनामा नाही.

सर्वांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्व. इतरांच्या कल्पना ऐकणे. तुम्हाला इतरांच्या कल्पना पटत नसतील तरी त्यांच्याबद्दल मोकळेपणाने विचार करणे म्हणजे हिंदुत्व.

‘न्याय’साठी आम्ही मध्यमवर्गीयांच्या खिशातून पैसा काढणार, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. परंतु आम्ही तसे अजिबात करणार नाही. प्राप्तिकरात वाढ केली जाणार नाही. व्यवस्थेत पैसा आहेच. तो ‘न्याय’ योजनेमार्फत वितरित केला, की संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी ते उपकारक ठरेल.

मला माझ्या गुणवत्तेवर तपासा. मी जी राजकीय लढाई लढतोय, त्यावर माझे मूल्यमापन करा.

Web Title:  Marathi news exclusive interview of congress president rahul gandhi by sakal media group md abhiji pawar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com