पुराच्या भीषण काळोखात जनजीवन विस्कळीत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

 

 

 

 

 

कोल्हापूर-सांगली पट्ट्यात सर्व नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याची बातमी कानावर येतच होती, तोवर असाईनमेंटचा कॉल आला, तातडीने पूरग्रस्त भागात कव्हरेजसाठी निघायचं आहे. हातातली असाईनमेंट तातडीनं उरकून निघायच्या तयारीला लागलो. नुकत्याच ज्वाईन झालेल्या सुमित भोसले या सहकारी कॅमेरामनला कॉल करुन निघण्यासंदर्भात माहिती दिली. तोही लगेचच एकापायावर तयार झाला. पुण्यातून बाहेर पडेपर्यंत सूर्य मावळतीला होता. सगळीकडे फक्त पाऊस, पाऊस आणि पाऊसच. पुढच्या प्रवासासाठी ठिकठिकाणच्या 'सकाळ' प्रतिनिधींना कॉल करत राहिलो. जाण्यासाठी कुणाकडूनही परिस्थिती अनुकूल असल्याचा प्रतिसाद आला नाही. तरीही जिथवर जाता येईल, तिथवर जाऊ, असं मनोमन ठरवत प्रवास सुरू केला. पाऊस उघडायचं नावच घेत नव्हता. घड्याळाचा काटा झरझर पुढं सरकत होता. सातारा पार करेपर्यंत ना मोठ्या गाड्या दिसल्या, ना कोणतीही कार. त्यामुळे रात्रीच्या शांततेत ही शांतता पुढं काहीतरी दिव्य आहे, याची चाहूल देत होती.

 

बघता-बघता कराडही ओलांडलं. पुढे वाठारनजीक पोलिसांनी बॅरिकेट्सने रस्ता अडवल्याचं लक्षात आलं. स्थानिक पोलिसांशी चर्चा केल्यावर समजलं, की १०० मीटरपर्यंत दीड-दोन फूट पाणी आहे. आमची कार यातून जाणार नाही, असं पोलिस सांगू लागले. आम्ही मात्र जाण्याच्या निर्णयावर ठाम होतो. कसंबसं पोलिसांना मनवण्यात आम्हाला यश आलं. पुढे एक बोलेरो जीप आणि मागे आमची गाडी, असं ढोबळ नियोजन ठरलं. बोलेरो पुढं जात राहिली, आम्ही तोच मार्ग पकडत रस्ता धरला. प्रत्यक्ष पाणी सुरू झाल्यावर मात्र आमची कार काहीशी लोडवर आली. पाणी फारसं वाहतं नव्हतं, पण सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन गाडी जागेवर बंद पडण्याचा धोका होता. ते असं ठिकाण होतं, जिथं ना गॅरेज, ना मॅकेनिक. तरीही पहिल्याच गियरवर जोराची रेस करून गाडी काढायला सांगितली. सुदैवाने कोणतीही अडचण आली आणि पुढील प्रवासासाठी निघालो.

 

पुढचा प्रवास सुरु करताना नेमकं कुठं जायचं? याचं कोणतंही नियोजन नव्हतं. कारण कोणता भाग पाण्याखाली आणि कोणता मोकळा, याची फारशी कल्पना त्यावेळी नव्हती. हा विचार करेपर्यंत आम्ही पेठनाका गाठलं. पहाटेची चाहूल लागल्याने आम्ही इस्लामपूरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. पण तिथं बहुतांश लॉज शोधल्यावर एक जण रुम देण्यासाठी कसाबसा तयार झाला आणि चार-दोन तासांसाठी आम्ही विसावलो.

दिवस जसा उजडायला लागला, तसं नेमकं कुठं जायला हवं? त्याची चाचपणी केली. इस्लामपूरपासून दहाएक किलोमीटर असलेल्या खरातवाडी परिसरात जायचं ठरवलं. प्रवास सुरु केला, तसं सात-आठ किलोमीटर पासूनच रस्त्यावर पाणी दिसायला लागलं. लोकं समोरून चालत येत होती. कुणाच्या खांद्यावर लेकरं-बाळं तर कुणाकडे घरातलं साहित्य. काही जण तर मोठ्या जनावरांना घेऊन, वाट काढत सुरक्षित ठिकाण शोधत होते. महापुराची दाहकता सांगायला डोळ्यावर पडलेलं हे पहिलंच चित्र बोलकं होतं. गाडी सुरक्षित स्थळी लावून आम्ही चालत पुढच्या प्रवासाला लागलो. वाटेत मिळेल ते बातम्यांचे एलिमेंट्स करायचे आणि शक्य तितकं पुढं जात राहायचं ठरलं. चालता चालता पाणी गुडघ्याच्याही वर गेलं.

वाटेत एक माणूस स्वतः सोबत एकाला पोहत घेऊन येताना दिसला. दुरून नेमकं काय आहे? ते कळायला तयार नव्हतं. तो माणूस जसा जवळ आला, तेव्हा त्या प्रकारचा उलगडा झाला. त्या व्यक्तीनं मोठं-मोठे दुधी भोपळे एकमेकांना बांधून सांगड तयार केली होती. त्यावर एकाला सहज आणणं शक्य होतं. ही 'आयडियाची कल्पना' बचावकार्यात खारीचा वाटा उलचत होती. थोडं पुढं गेलो आणि पाणी कमरेच्याही वरपर्यंत यायला सुरुवात झाली. पुढं जायचं की नाही, याबाबत द्विधा मनस्थिती झाली. गावकरी गाव सोडून येताना दिसत होते. त्यांच्यापर्यंत सरकारकडून कोणतीही मदत पोहोचली नव्हती. त्यामुळे पुन्हा गावात जाणाऱ्या लोकांना सोबत घेऊन आम्ही गावात जायचंच असं ठरवलं. जपून-जपून पावलं टाकत प्रवास सुरू झाला, तोवर आणखी एक 'आयडियाची कल्पना' दिसली. प्लॅस्टिकचे चार बॅरल आडवे करून त्याला वर बसायला हलक्या वजनाची कॉट बांधली होती. त्यावर चारएक वृद्ध पुरुष-महिलांना बाहेर आणण्यात येत होतं. चालता-चालताच एका बाबांचा आवाज ऐकला, '१९७६ आणि २००५ दोन्ही पूर पाहिले, पण एवढं पाणी कधीच नव्हतं आलं. धीर सुटलेला तो आवाज कानी पडला आणि परिस्थिती काय असेल? याची आणखी तीव्र जाणीव झाली.

जीव मुठीत घेऊन आम्ही गावच्या मुख्य चौकात आलो. नजरेस लगेचच बहे गावचं ग्रामपंचायत कार्यालय पडलं. ग्रामपंचायतीच्या अगदी दाराला पाणी लागलं होतं. समोर असलेल्या आणि नव्याने बांधलेल्या हनुमान मंदिराच्या पारावर गावची जुनी जाणती मंडळी बसली होती. हातातला बुम आणि कॅमेरा पाहून त्यांनी आजवरच्या पुराच्या पाण्याची कहाणीच सांगायला सुरुवात केली. ते जिथं बसलेले होते, अगदी त्या पायरीला पुराचं पाणी लागलं होतं. पण ही मंडळी निर्धास्त होती. 'यापेक्षा आणखी किती पाणी येणार'? असं म्हणून त्यांनी गावातच राहायचा निर्णय घेतला होता. गावगप्पांच्या कट्ट्यावरून आम्ही आणखी पुढे जात राहिलो, पुढे गाव चढावर असल्याने पाणी नव्हतं. बहे गावाचं सर्वात उंच ठिकाण गाठलं. तिथून 'संथ वाहणाऱ्या...' कृष्णेचे रौद्ररूप पाहायला मिळेल, ही आशा होती.

Image may contain: sky, cloud, outdoor and water

तिथंच मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः परत आलेले पासष्टीत असलेले अनिल सिताराम बडवे, साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या सुमन अनिल बडवे आणि विशीतली नात मोहिनी कुलकर्णी, हे तीन जीव आम्हाला भेटले, जे रामलिंग बेटावर तीन दिवस अडकलेले होते. रामलिंग बेट असं ठिकाण आहे, ज्याच्या दोन्ही बाजूने कृष्णेचा मुख्य प्रवाह होता. कृष्णेचं पाणी इतकं वर आलं होतं, की बेटावर असलेल्या राम मंदिरात पाणी पोहोचलं होतं. पाण्यासोबत मंदिरात आलेल्या साप आणि नागांनी तिघांची धडकी भरवली होती. शेवटी तिघांनाही मंदिराच्या वर जाऊन बसावं लागलं. हे सगळं ऐकतानाही अंगावर अक्षरशः काटा उभा राहत होता.

तिघे अडकल्याची माहिती कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही लागली. ते बहे गावात व्हाईट आर्मीला घेऊन पोहोचले. बहे गावाच्या अलिकडूनच कृष्णेच्या पात्रात घुसून रामलिंग बेट गाठायचं, असं त्यांनी ठरवलं होतं. सदाभाऊ स्वतः बोटीत होते. मुख्य प्रवाहाच्या उलट्या दिशेने बोट नेऊन ते बेटावर पोहोचले आणि आणि तिघांना घेऊन परत आले. धडकी भरवणारं हे धाडस वाढीवच होतं, पण हेच धाडस तिघांचा जीव वाचावायला कामी आलं. डोळ्यात पाणी टिपकत असताना ही कहाणी तिघेही भरभरून सांगत होते. हा थरारक अनुभव ऐकतच आम्ही माघारी फिरलो. बातम्या पाठवण्यासाठी आम्हाला  इस्लामपुरात येणं गरजेचं होतं.

Image may contain: 4 people, people sitting, outdoor and water

माध्यमातून जशा बातम्या यायला लागल्या, तशी महापुराची दाहकता समजत गेली आणि सुस्त असणारी सरकारी यंत्रणा हालायला लागली. पण यंत्रणा इतकी अपुरी होती की कुठंच पुरेशी मदत पुरवणं शक्य होतं नव्हतं. हा अंदाज आल्यावर आणि दाहकता समजल्यावर राजकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांनी स्वतःची यंत्रणा वापरायला सुरुवात केली. त्यात इस्लामपूर पट्ट्यात शैलजा जयंत पाटील यांनी राबवलेली यंत्रणा लाजवाब होती. यंत्रणेसोबत त्या स्वतःही प्रत्यक्षात काम करताना पाहायला मिळाल्या.

महापुराची तीव्रता लक्षात आल्यावर त्यातील वेगवेगळ्या बाजू समोर आणणे गरजेचे होते, म्हणूनच आम्ही जास्तीस्त जास्त प्रभावित गावात पोहचून तिथली परिस्थिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करायचं ठरवलं. आष्ट्याच्या पुढे असणाऱ्या डिग्रस गावात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही पोहोचेपर्यंत कोणतीही सरकारी बोट तिथं पोहोचलेली नव्हती. स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरूच होते, अर्थात ते तोकडे पडत राहिले. आम्ही पोहोचलो तेव्हा तिथं सदाभाऊ दिसले. सोबत एनडीआरएफची एक तुकडीही पोहोचली होती. डिग्रस नावाची तिथं दोन गावं. एक कृष्णेच्या अलीकडे कसबे आणि दुसरं मौजे पलीकडे. आधी अलीकडच्या गावातून पाहणी करायची आणि लोक सुरक्षित आहेत, याची खातरजमा झाल्यावर नदी पलीकडे असलेल्या मौजेत जायचं असं निश्चित झालं. कसबेच्या काही अंतरावर गेल्यावर बोटीला ओढून नेणारं इंजिन बंद पडलं. पण पुन्हा सुरू करायला गेल्यावर इंजिन सुरु करताना खेचली जाणारी दोरी तुटून आतल्या बाजूला गेली. आता मात्र काय करायचं? हा प्रश्न होता. त्यातच बोट भरकटू नये म्हणून एका जवानाने थेट पाण्यात उडी घेतली आणि जनावरं खुट्टीला बांधतात असं बोट टेलिफोनच्या खांबाला नेऊन बांधली.

इंजिन सुरू करायचं म्हटल्यावर त्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे पान्हे आवश्यक होते. सुदैवाने सुरक्षित स्थळी थांबलेल्या एका गावकऱ्याने पान्हा मिळेल, अशी व्यवस्था केली. सगळी जोडाजोड करण्यात पाऊण तास गेला. त्यावेळी आम्ही अलिकडच्याच गावात म्हणजे कसबेमध्येच होतो. इंजिन दुरुस्त करत असतानाच गावकरी सदाभाऊंसमोर सरकारवर तोंडसुख घेत होते. त्यांचा रागही स्वाभाविक होता, कारण तीन दिवस अख्खं गाव शासकीय पातळीवर दुर्लक्षित होतं.

हो, नाही म्हणता-म्हणता इंजिन व्यवस्थित सुरु झालंय, याची खात्री केली आणि कृष्णेचं मुख्य पात्र ओलांडायला सुरुवात केली. गावकुसाबाहेर येताना ४४० व्होल्टेजच्या बंद असलेल्या तारांमधून वाट काढत आम्ही एका गावकऱ्यांच्या मदतीने पुढे जात राहिलो. गाव संपलं, तीनेक मजले उंच असलेल्या स्मशानभूमीचे पत्रे नजरेस पडले. वाहता प्रवाह तिथून खरा सुरू झाला होता. 'संथ वाहणारी' कृष्णामाई किती खवळलेली आहे, याची 'याची देही याची डोळा' अनुभूती आली. नजरेस पडणारं दृश्य तर अक्षरशः मती गुंग करणारं होतं, मन पुढे जायला तयार होत नव्हतं. तसं सदाभाऊंना बोलूनही दाखवलं, पण ते काही ऐकायला तयार होत नव्हते. सुरक्षितच पलीकडे पोहचू, असं त्यांचं म्हणणं होतं. आणखी काही पुढे गेल्यावर पाण्याच्या प्रवाहाच्या ताकदीची जाणीव एनडीआरएफच्या जवानांनाही झाली. त्याचवेळी त्यांनीही पुढे जायला नकार दिला. कारण नदीच्या वाहत्या प्रवाहाला मागे टाकून पुढे जाणं शक्य नव्हतं. अर्थात तसं केलं असतं, तर आमचं हे धाडस वेडेपणाचं ठरलं असतं.

बोट परतीच्या प्रवासाला लागल्यावर माझ्यातला बातमीदार जागा झाला. परतेपर्यंत चार न्यूज एलिमेंट्स करुन घेतले. परताना आम्ही गावातच उतरलो आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. काय अवस्था आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अनेकांनी तर २००५ चा पूर हाच अंतिम आहे, असं गृहीत धरुन घरातच बसणं पसंत केलं होतं. लोकं मोठ्या प्रमाणात अडकून पडण्याचं हेही मोठं कारण होतं. कारण २००५ पेक्षा यंदा परिस्थिती कैक पटीनं गंभीर आणि अधिक तीव्रतेची होती. घरात असलेले बहुतांश लोक सुरक्षित होते, मात्र अडचण होती पिण्याच्या पाण्याची आणि दुधाची. शिवाय परिस्थिती इतकी भीषण होईल, याची थोडीही जाणीव प्रशासनाला झाली नव्हती. किंबहुना पडलेल्या पावसाचा अंदाज घेऊन नियोजन केलं असतं, तरी परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. पण काय शेवटी ते 'सरकारी' कामच !

Image may contain: 2 people, people smiling, sky, outdoor, nature and water

अडचणीच्या गावांचा शोध घेत आम्ही सांगलवाडीला जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथंही प्रशासकीय पातळीवर कोणीही पोहोचलेलं नव्हतं. हा भाग इतका प्रभावित होता, की लोक सामूहिकरित्या छतांवर आश्रयाला आहेत, इतकंच कानावर येत होतं. डिग्रस फाट्यावरून दोन किलोमीटर पुढे गेल्यावरच रस्त्यात पाणी दिसलं. काही खासगी बोटी आणि एनडीआरएफचं एक पथक नुकतंच तिथं पोहोचलं होतं. अलीकडच्या बाजूला असलेले गावकरी प्रचंड आक्रमक होते. त्यांना शांत करत एक-एक बोट मदत घेऊन सांगलवाडीच्या दिशेने जायला सुरुवात झाली. त्यात फक्त तीन जवान, पाणी, बिस्कीट आणि दूध होतं. जास्तीत जास्त खाद्य वाडीत पोहोचावं आणि परतताना शक्य तितक्या लोकांना परत घेऊन यावं, हे प्राथमिक नियोजन होतं. त्यामुळे आम्हीही जास्तीत जास्त मदत पोहोचावी, यासाठी दोन तास वाट पाहात थांबलो. त्यातच काही खासगी बोट चालक बोटी घेऊन पोहोचले. त्यात सांगलवाडी गाठायची असं ठरवलं.

Image may contain: 1 person, sitting, beard and outdoor

सुमितला सोबत घेत आम्ही पुढे निघालो. रस्त्यावर पाणी असलेला हा साधारण अडीच-तीन किलोमीटरचा पट्टा होता. काही भागात साचलेले पाणी तर साधारण एक किलोमीटरपर्यंत पाण्याचा प्रवाह होता. आमची बोट सुरु होऊन प्रवाह असलेल्या भागात आली. मात्र बोटीला अवघ्या आठ एचपीचं इंजिन असल्याने बोटीने आखलेला रस्ता सोडला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत जाऊ लागली. पूर्ण क्षमतेने इंजिनची रेस करूनही बोट काहीच प्रतिसाद देत नव्हती. 'दिवसा तारे दिसतात', ती वेळ भर दुपारी अनुभवली. चालकाने अनेक प्रयत्न केले, मात्र प्रवाहाबाहेर येणं शक्यच नव्हतं. त्यातच आम्हाला एक पाण्यात बुडालेल्या टेम्पोचा टफ दिसला. बोट त्या ठिकाणी काही वेळ थांबवली. इथं त्यावेळी बोटीतले सगळे जण 'तज्ञ' झाले होती. बोट कशी काढायची? हे चालकाला सांगत होते. पण उपयोग शून्य होता, कारण या प्रवाहाचा सामना करु शकेल, एवढ्या ताकदीचे इंजिन बोटीला नाही, याची जाणीव चालकाला होती.

Image may contain: sky, ocean, cloud, outdoor, nature and water

टेम्पोच्या टफाला धरून काही काळ थांबल्यानंतर एनडीआरएफची एक बोट जाताना दिसली. त्यांना हाक मारली, पण पाण्याचा 'करंट' (प्रवाह) मोठा आहे, असं सांगून त्यांनी थांबायला नकार दिला. त्यामुळे काळजीचा अंधार आणखी घट्ट झाला. मग बोटीतलं वजन कमी करायचा निर्णय घेतला. आहे त्या पाणी बाटल्यांचे बॉक्स टेम्पोच्या टफावर ठेवले. बोटीतलं काही वजन कमी झालं, तरीही बोट प्रवाहातून बाहेर निघायला तयार नव्हती. शेवटी चालकाने सर्वांना मागच्या बाजुला बसवलं. पुढचा भार सगळा मोकळा केला आणि फुल रेस करत बोट काढण्याचा प्रयत्न केला, तरीही यश आलं नाही. मात्र असे प्रयत्न सुरूच ठेवले आणि कसंबसं प्रवाहाबाहेर पडलो. कुणाचंही काही ऐकून न घेता, मी बोट पुन्हा आलो त्याच दिशेने घ्यायला लावली आणि आम्ही सर्व सुखरूप पोहोचलो.

सांगलवाडीत पोहोचण्याची अस्वस्थता स्वस्थ बसू देत नव्हती. तोवर काही लोकांना घेऊन एनडीआरएफची एक बोट माघारी आली होती. त्या टीमच्या प्रमुखाशी बोलल्यावर लक्षात आलं, अशा प्रवाहात कमीत कमी पंचवीस एचपी असणारी मशीन हवी आणि आम्ही आठ अश्वशक्तीच्या मशीननं प्रवाह ओलांडण्याचं वेडसर धाडस करत होतो. त्यानंतर पुन्हा खासगी बोटीत बसायचं नाही, हा निर्णय घेतला.

एनडीआरएफच्या बोटीतून आम्ही सुरक्षित सांगलवाडीत पोहोचलो. इथं इतर माध्यमांचे कोणीही पोहोचलेले नव्हते. चित्र विदारक होतं, लोक पाणी आणि दुधासाठी मदत मागत होतं. संपूर्ण गाव पाण्याखाली आणि सगळीकडून पाण्याचा वेढा अशी परिस्थिती गावची झाली होती. ज्यांची पक्की घरं नाहीत, अशी दोन-तीन हजार लोकं भारती विद्यापीठाच्या इमारतीत राहायला लागली होती.  मदत वेळेत न मिळाल्याने लोकांच्या संयमाचा बांध अक्षरशः फुटत होता. डोळ्यातही पाणी आणि चारही बाजूला पाणी अशी परिस्थिती या भागाची होती. शाळेत जाण्याआधी आम्ही गावचा काही भाग पाहायला सुरुवात केली. पाणी माझ्याही कमरेच्या वर होतं. तिथं महिलांशी संवाद साधून न्यूज एलिमेंट्स मोबाईल वरूनच पाठवत राहिलो. नदीच्या पलीकडच्या बाजुला सांगली शहर असल्याने मोबाईलला फोर-जी रेंज मिळत होती. एकीकडं लोकं हालकीच्या परिस्थितीत होती मात्र माझं बातम्या पाठवण्याचं काम सोपं झालं होतं.

बातम्या करता-करता आम्ही 'शिवेच्छा' या बंगल्याबाजुला काही वेळ थांबलो. ज्या घराजवळ होतो तिथल्या टेरेसवर काही पुरुष मंडळी होती. त्यांनी वरूनच आत येणाच्या विनंती केली. पार्किंगमध्ये उभी असलेली कार पाण्याखाली बुडालेली होती. आम्हीही मग थेट टेरेस गाठलं आणि गावच्या स्थितीची संपूर्ण माहिती ते देत राहिले, तेवढ्यात सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचा आवाज कानावर आला. खाद्य घेऊन ते हेलिकॉप्टर महाविद्यालयात थांबलेल्या लोकांच्या मदतीसाठी आलं होतं. हेलिकॉप्टरमधून खाली बॅग्स टाकल्या जात होत्या. लोकं टेरेसवर आशेने हात करत होती. अशा दोन-तीन चकरा हेलिकॉप्टरच्या झाल्या, पण आम्ही उभ्या असलेल्या टेरेसवर हेलिकॉप्टर काही आलंच नाही.

Image may contain: one or more people, sky, tree and outdoor

आम्ही पुढच्या प्रवासाला निघायला लागतो, तोच त्यानी काहीतरी खाऊनच जा अशी विनंती केली. खरं तर त्यांचीच अवस्था पाहून आम्हाला भरून येत होतं, पण त्यांनी इतका आग्रह केला की आम्हाला दोन घास खावेच लागले. त्यावेळी मिळालेल्या एक चपाती आणि उसळीची तुलना कशाशीच नाही. खाताना गप्पा झाल्या आणि त्यावेळी आमचे अन्नदाते अभियांत्रिकी प्राध्यापक असल्याचं समजलं, सुनील पाटील असं त्यांचं नाव.

सांगलवाडीचा संपूर्ण भाग कमरेभर पाण्यात पिंजून काढला, बातम्यांचे अनेक कंगोरे मिळवले. कढईतून लोकांची ने आन असो की सिंटेक्सच्या टाकीतून. लोक सगळं काही विसरून एकमेकांना मदत करत होते. इथं माणूस म्हणून आम्हाला बरंच काही शिकायला मिळत होतं. परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा मंत्री गिरीश महाजन वाटेत भेटले. वादग्रस्त जीआर, सेल्फी, मदतकार्य अशा अनेक विषयांवर त्यांना बोलतं केलं. बोटीचा शोध घेत असतानाच आम्हाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही भेटले. त्यांच्याशीही २००५ चा पूर, त्यावेळचं मदतकार्य अशा विषयांवर बोलणं झालं. स्वार्थ आणि परमार्थ असं सगळं साधून आम्ही परतीच्या वाटेने आधी दिग्रस फाटा आणि मग इस्लामपुरात पोहोचलो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या कराडला येताहेत याच बातमीने उद्या कराडला असं  ठरवून आम्ही झोपी गेलो.

Image may contain: 17 people, people sitting and indoor

कराडला थेट शासकीय विश्रामगृह गाठलं. पवार आले आणि थेट पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांना घेऊन बसले. सर्व परिस्थितीची बारकाईने माहिती घेतली आणि मगच प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात करायला ते निघाले. त्यांच्याच ताफ्यात आम्ही आमची गाडी घालून प्रवास सुरू केला. अगदी टुमदार पण पुराचा जबर फटका बसलेल्या कृष्णाकाठच्या तांबवे गावात ताफा पोहोचला. पवारांनी थेट गावचं पार गाठलं. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. पण त्यावेळीही ना पवार हटले ना गावकरी, संवाद सुरूच राहिला. घायकुतीला येऊन महिला, ज्येष्ठ मंडळी 'आप बिती' सांगत राहिले. पवार बोलायला उठवल्यावर त्यांच्या व्हायरल होत असलेल्या किल्लारी भूकंपाच्या मदत कार्यातील क्लिप आठवली. मांडणी संपूर्ण तीच होती आणि त्याच आदबीने पवार बोलत होते. दोन्ही पायांना सूज असून पाराजवळ उभा राहून ते बोलत राहिले. लोकांना त्यांचं बोलणं मोठा आधार वाटत होता. पण त्यांचं भाषण संपण्याच्या आधीच मुख्यमंत्री अचानक सांगलीला आल्याची बातमी आली. आम्हाला आहे त्या परिस्थितीत तिथून निघावं लागलं.

कराड-कडेगाव-कडेपुर-पाचवा मैल आणि माधवनगर मार्गे आम्ही सांगलीत पोहोचलो. आम्ही पोहोचेपर्यंत मुख्यमंत्री दौरा आटोपून निघूनही गेले होते. पण पवार पाहणी करत करत संगलीलाच येणार असल्याचे नियोजन होते. पाहणीनंतर ते आमच्याशी बोलणार होते. त्यामुळे सांगलीत थांबण्याचा निर्णय घेतला. पवार रात्री सव्वा नऊपर्यंत ठिकठिकाणी लोकांना भेटत राहिले, लोकांना आधार देत राहिले. त्यानंतर पत्रकार परिषद झाली, पवार सविस्तर बोलले आणि मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर अलमट्टीतून विसर्ग वाढवल्याची माहिती त्यांनी दिली. मुक्कामाची सोय नसल्याने आम्हाला तासगावात पोहोचावं लागलं.

सकाळी पुन्हा सांगली शहर गाठलं आणि संपूर्ण शहर पाहून थक्क व्हायला झालं. कानावर पडलेली पूरस्थिती शब्दशः तशीच होती. मारुती चौकातून बोटीने आम्ही आयरीन पुलाजवळ पोहोचलो. पुलापालिकडे सांगलवाडी होती. पुराचं पाणी बऱ्यापैकी ओसरल्याचं दिसलं. पुलापासुन पायी चालताच आम्ही पुन्हा सुनील पाटील यांच्या घरी पोहोचलो. तिथून त्यांनी चहा घेतल्याशिवाय सोडलंच नाही. पूरस्थिती बऱ्यापैकी ओसरली असल्याने दोन किलोमीटर पायपीट करुन आम्ही डिग्रसचा मार्ग धरला. पण पाण्याचा गुडघाभर प्रवाह अजूनही शिल्लक होता. पाणी कमी असल्याने बोट चालवणं शक्य नव्हतं. अशात आम्हाला गावकऱ्यांनी एक ट्रॅक्टर गाठून दिला, जो मदत आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला चालला होता. त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून आम्ही दिग्रस गाठलं. तोवर सूर्य मावळीतला होता.

Image may contain: outdoor

वाळवा तालुक्यातील पाणी पूर्णपणे ओसरले होते, गावकरी पुन्हा घराची वाट धरत होते. आम्ही ज्या-ज्या गावात जाऊन आलो त्या-त्या गावात पूर ओसरल्यावर पुन्हा जाऊ लागलो.  पाणी उतरल्यानंतरची स्थिती सांगायला खरं तर शब्द कमी पडतील. ज्यांची पक्की घरं होती त्यांचं नुकसान आवाक्यातील होतं. पण हातावर पोट असणाऱ्या कुटूंबियांची अवस्था अस्वस्थ करणारी होती. कारण त्यांच्यासमोर पुराच्या पाण्याएवढेच प्रश्न उभे होते. रहातं घरं पाण्यात गेलं, संसार कृष्णामाई बुडवून गेली आणि मन घराच्या भिंतीप्रमाणे खचली होती. मदतकार्याचा ओघ प्रचंड वाढला होता, पण त्यालाही मर्यादा होत्या. पै-पै गोळा करुन उभा केलेला संसार असा डोळ्यासमोर विस्कटने अनेकांना पाहवत नव्हतं. तरीही जड अंतकरणाने ती परिस्थिती समोर आणत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

Image may contain: one or more people and outdoor

जाताना मनात जितकी भीती होती, त्याहूनही अधिक दुःख परतीच्या प्रवासात होतं. आठ दिवसांच्या मुक्कामानंतर घराची ओढ स्वाभाविक होतीच, पण दुसरीकडे पूरग्रस्तांच्या वेदनाही समोर दिसत होत्या. अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवलं होतं. आपत्तीशी दोन हात करण्यासाठी आपण किती तयार आहोत? आपली यंत्रणा इतकी अपुरी कशी असू शकते? पूर अलमट्टीमुळेच आला का? लोकांनी २००५ चाच पूर सर्वात मोठा हे का लक्षात ठेवलं? असे अनेक प्रश्न सतावत होते आणि तोवर कात्रजच्या नव्या बोगद्यात आमच्या गाडीने प्रवेश केला.


संबंधित बातम्या

Saam TV Live