अजित पवारांसह बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

 

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आज गुन्हा दाखल केला. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. नेते व अधिकारी मिळून ३००हून अधिक व्यक्तींविरोधात ही तक्रार देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या ७६ नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आज गुन्हा दाखल केला. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. नेते व अधिकारी मिळून ३००हून अधिक व्यक्तींविरोधात ही तक्रार देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या ७६ नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अजित पवारांसह आनंदराव अडसूळ आदींसह ७६ बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचा लाभार्थी म्हणून मूळ तक्रारीत उल्लेख करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. राजकीय नेत्यांनी नियमाचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल होऊनही गुन्हे न दाखल केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, शिखर बॅंकेच्या ४६ संचालकांसह ३४ जिल्हा बॅंकांच्या संचालकांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केली. राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था-व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्जे दिल्याने बॅंक अडचणीत सापडली आणि त्यावर प्रशासक नेमणे रिझर्व्ह बॅंकेला भाग पडले. या संदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही गुन्हा नोंदवण्यात आला नाही, त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती. याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी महिन्यात अरोरा यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र, त्यानंतर कोणतीच कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला जाब विचारला होता. तेव्हा अरोरा यांच्या तक्रारीत तथ्य आढळले नसल्याने गुन्हा नोंदवण्यात आला नाही, असे उत्तर आर्थिक गुन्हे शाखेने दिले होते. त्यानंतर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने याचिकादारांची विनंती मान्य करत पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) सह लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३(१) अ व १३(१) क अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्थिक गुन्हे शाखेकडून पडताळणी
कथित गुन्हा १५ वर्षांपूर्वी घडला असून, त्यानुसार आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे तत्कालीन संचालक अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे तत्कालीन संचालक, पेण अर्बन सहकारी बॅंकेचे तत्कालीन संचालक, पदाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच इतर लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आर्थिक गुन्हे शाखा तक्रारातील आरोपांची पडताळणी करणार आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली.

यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल
माणिकराव पाटील, नीलेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, दिलीपराव देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, शिवराम जाधव, गुलाबराव शेळके, माधवराव पाटील, सिद्रामप्पा अल्लुरे, विलासराव पाटील, रवींद्र दुरगकर, अरविंद पोरेड्डीवार, सदाशिवराव मंडलिक, यशवंतराव गडाख, लीलावती जाधव, मधुकरराव जुंजाळ, प्रसाद तनपुरे, आनंदराव चव्हाण, सरकार जितेंद्रसिंह रावळ, बाळासाहेब वसदे, नरेशचंद्र ठाकरे, नितीन पाटील, किरण देशमुख, तानाजीराव चोरगे, दत्तात्रय पाटील, राजेंद्र जैन, तुकाराम दिघोळे, मीनाक्षी पाटील, रवींद्र शेट्ये, पृथ्वीराज देशमुख, आनंदराव अडसूळ, राजेंद्र पाटील, अंकुश पोळ, नंदकुमार धोटे, जगन्नाथ पाटील, सुरेश देशमुख, उषाताई चौधरी, संतोषकुमार कोरपे, जयंत पाटील, देविदास पिंगळे, एन. डी. कांबळे, राजवर्धन कदमबांडे, गंगाधरराव देशमुख, रामप्रसाद कदम, धनंजय दलाल, जयंतराव आवळे, वसंतराव शिंदे, डी. एम. मोहोळ, पांडुरंग फुंडकर, ईश्वरलाल जैन, वसंतराव पवार, राजन तेली, दिलीपराव सोपल, चंद्रशेखर घुले पाटील, विलासराव जगताप, अमरसिंह पंडित, योगेश पाटील, शेखर निकम, श्रीनिवास देशमुख, डी. एम. रवींद्र देशमुख, विश्वासराव शिंदे, यशवंत पाटील, बबनराव तायवडे, अविनाश अरिंगळे, रजनीताई पाटील, लक्ष्मणराव पाटील, माणिकराव कोकाटे, राहुल मोठे, शिवाजीराव नलावडे, सुनील फुंडे, शैलजा मोरे.

धागेदोरे पवारांपर्यंत असल्याचा वकिलांचा दावा
‘तत्कालीन कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अशी सुमारे ३०० जणांची नावे येतील,’ असा दावा तक्रारदाराच्या वकील माधवी अय्यपन यांनी केला. शरद पवार कृषिमंत्री असताना सहकारी कारखान्यांना नियमबाह्य पद्धतीने निधी देण्यात आला होता. त्यामुळे धागेदोरे शरद पवारांपर्यंत पोचतील, असेही त्यांनी सांगितले.

अपप्रचार सुरू
निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार सुरू असल्याचा आरोप मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. तर, शरद पवार या बॅंकेशी संबंधित नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

 

Web Title: FIR filed in co-operative bank transaction


संबंधित बातम्या

Saam TV Live