बाप्पाच्या नवसाची मार्केटिंग कराल तर कारवाईला सामोरे जाल

बाप्पाच्या नवसाची मार्केटिंग कराल तर कारवाईला सामोरे जाल

मुंबई: ​  नवसाला पावणारा गणपती .. अशी जर तुम्ही मंडळाची प्रसिध्दी केली तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे...  भक्तांची गर्दी खेचण्यासाठी मंडळांनी खास 'नवसाचे' मार्केटिंग फंडे वापरणे नवीन नाही. मात्र, सार्वजनिक गणपतीसाठी 'नवसाला पावणारा', 'इच्छापूर्ती करणारा' अशा टॅगलाइन वापरून गणेशभक्तांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे वेड आता मोठ्या मंडळांसह लहान मंडळांतही झपाट्याने पसरताना दिसत आहे. मंडळांचे हे मार्केटिंग कौशल्य अंधश्रद्धेकडे झुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मंडळांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, नवसाच्या बहाण्याने कोणीही भक्ताने स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यास उद्युक्त केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची तरतूदही कायद्यात आहे. 

मागील काही वर्षात गणेश मंडळांमधील स्पर्धा वाढत राहिल्याने उत्सवातील लोकभावनांची गुंतवणूक पाहून अनेक मंडळांनी आपल्या बाप्पांना 'नवसाला पावणारा' असे बिरुद लावून भक्तांची गर्दी खेचण्याला सुरुवात केली. मात्र अनेक मंडळांकडून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा ओलांडली जात असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. छोट्या मंडळांमध्ये हा फंडा वेगाने पसरत असला तरी अनेक मोठी मंडळेही अशा 'नवसपूर्ण' जाहिराती करण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत, अशा चुकीच्या पद्धतीने जाहिराती करून पैसा उकळण्याचा वा कोणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास, तसेच नवसाच्या बहाण्याने एखाद्याला स्वतःच्या जीवास धोका निर्माण करण्यास भाग पाडल्यास कारवाई होऊ शकते. अनेक वर्षांपासून अद्याप तरी असा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसला तरी श्रद्धेवर मनमानीपणाची झालर ओढण्याचा प्रयत्न वाढत असल्याने कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन संस्था अनेक वर्षांपासून कार्य करते आहेच, मात्र शासनानेही यासाठी भरीव योगदान देण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: the possibility of action against ganpati mandals who spreading superstitions
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com