राणेच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

राणेच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

वैभववाडी - स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेले दीड-दोन महिने सुरू आहे; मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचा गुंता अजूनही कायम आहे. त्यातच आता भाजपच्या जिल्ह्यातील जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना छुपा विरोध करण्यास सुरवात केली आहे. राणेंना पक्षात घेऊ नये, यासाठी भाजपचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते. 

वैभववाडी - स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेले दीड-दोन महिने सुरू आहे; मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचा गुंता अजूनही कायम आहे. त्यातच आता भाजपच्या जिल्ह्यातील जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना छुपा विरोध करण्यास सुरवात केली आहे. राणेंना पक्षात घेऊ नये, यासाठी भाजपचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीनीकरणासह नारायण राणे भाजपत प्रवेश करणार, अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात सुरू आहे. जिल्ह्यात लोकसभेला मोठ्या पराभवाला स्वाभिमान पक्षाला सामोरे जावे लागले असले, तरी जिल्ह्यात राणेंची ताकद निर्णायक आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण अजूनही त्यांच्याभोवताली फिरत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जिल्ह्यातील राजकारणदेखील अस्थिर बनले आहे. राणेंचा भाजप प्रवेश झाला, तर जिल्ह्यातील राजकीय गणिते पुन्हा बदलणार आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या अनेकांचे राणेंच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 

राणेंच्या भाजपप्रवेशाच्या आतापर्यंत सहा ते सात तारखा मागे पडल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंसारखा वजनदार नेता भाजपला हवा आहे; मात्र शिवसेनेला विश्‍वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राणेंच्या प्रवेशाबाबत पुन्हा चर्चेला सुरवात झाली आहे. आता तर काही खासगी वाहिन्यांनी एक सप्टेंबरला राणे भाजपत प्रवेश करतील, असे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. 
राणेंच्या भाजप प्रवेशावर जिल्ह्यातील अनेक राजकीय मातब्बरांची आणि राजकीय पक्षांची गणिते अवलंबून आहेत.

विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांसाठी राणेंचा निर्णय लवकरात लवकर झाला, तर त्यांना पुढचे पाऊल ठरवणे सोपे होणार आहे. आतापर्यंत या घडामोडींकडे बघ्याच्या भूमिकेतून पाहत असलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यानी राणेंच्या प्रवेशाला छुपा विरोध करण्यास सुरवात केली आहे. कणकवली तालुक्‍यात तर काही पत्रके वाटण्याचे प्रकार घडले आहेत.

आज भाजपच्या जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही घेण्यात आली.  या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार उशिरापर्यंत पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी राणेंच्या पक्षप्रवेशाबाबत उघड उघड विरोध करणार की पक्षश्रेष्ठींकडे छुपा विरोध करणार, याची चर्चा गेले चार दिवस रंगू लागली आहे; मात्र जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन विरोध दर्शविणार असल्याचे समजते. मागील काही वर्षांमध्ये स्वाभिमान आणि भाजपमध्ये काही ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठा संघर्ष झाला. याचे कथन हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांसमोर करणार आहेत. 

भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना राणे हवेत 
राणेंच्या भाजपप्रवेशावरून पक्षात दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांना राणे भाजपत हवे आहेत; परंतु कणकवली विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांना राणे नको आहेत; मात्र राणेंना विरोध करणारा वर्ग हा पक्षात मोठा आहे. असे असले तरी राणे राज्याच्या राजकारणातील वजनदार नाव आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यात स्वतःची व्होट बॅंक आहे. यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्याला वरिष्ठ स्तरावरून किती महत्त्व दिले जाईल, हा प्रश्‍न आहे. शिवसेनेचा राणेंना विरोध आहे. युती तुटणार असेल, तर राणेंचा भाजप प्रवेश सुकर असणार आहे. 

एक सप्टेंबरचा मुहूर्त टळणार 
राणेंचा भाजपप्रवेश आणि स्वाभिमान पक्षाचे भाजपत विलीनीकरण एक सप्टेंबरला होईल, असा अंदाज काहींनी व्यक्त केला होता; परंतु सद्यःस्थितीत या दिवशी राणेंचा भाजप प्रवेश होईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भाजपच्या काही मंत्र्यांनी तर आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना या मुहूर्तावर राणेंचा भाजपप्रवेश होणार नाही, अशी हमी दिली असल्याची चर्चा आहे. 

""मत मांडण्याचा अधिकार भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे; मग ते मत राणेंच्या विरोधात असेल किंवा समर्थनार्थ असेल. त्यांनी हे मत संभाव्य प्रवेशाआधी मुख्यमंत्र्यांकडे मांडावे. त्यानंतर मात्र पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार प्रत्येकाला काम करावे लागेल. भाजप हा शिस्तीने चालणारा पक्ष आहे.'' 
- प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष, भाजप 
 

Web Title: issue of Narayan Rane entry in BJP

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com