भाजप-सेना युतीत फक्त मित्रपक्षांना दोन जागा

भाजप-सेना युतीत फक्त मित्रपक्षांना दोन जागा

विधानसभा 2019 : पुण्यातील आठही मतदारसंघ भाजपकडे असल्याने युतीतील मित्रपक्षांनी किमान दोन जागा सोडण्याबाबत दबाव वाढविला आहे. त्यातच भाजपमध्येही विद्यमान आमदारांना बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची जोरदार मागणी होत आहे. सर्व मतदारसंघ भाजपकडे ठेवल्यास, नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गणेशोत्सवानंतर भाजपला यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावाच लागेल. 

शहरातील शिवसेनेची ताकद पूर्वीच्या तुलनेत क्षीण झाली असली, तरी ती नगण्य झालेली नाही. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला प्रतिनिधीत्व हवे आहे. शिवसेनेच्या राजकारणात मुंबई, ठाण्याखालोखाल पुण्याला स्थान आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत शिवसेनेचे दोन्ही आमदार पराभूत झाले, अन्‌ नगरसेवकांनी संख्याही घटली. येत्या निवडणुकीत न लढण्यास, शिवसेनेची ताकद खूपच घटेल, याची जाणीव शिवसेना नेतृत्वाला आहे. 

शिवसेनेला कोणता मतदारसंघ? 
शिवसेनेने पुण्यातील जागा अद्याप मागितली नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच "ई सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांकडे किमान एक जागा असावी, अशा पद्धतीने शिवसेना पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांची मते आजमावली असल्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले. त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड, शिरूर लोकसभा मतदारसंघात हडपसर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला या तीन मतदारसंघांची मागणी पुण्यातून शिवसेनेच्या नेतृत्वाकडे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

शहरात शिवसेनाला आठपैकी किमान एकतरी मतदारसंघ द्यावा लागेल, अन्यथा शिवसेनेची साथ मिळविताना भाजपची दमछाक होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील चार मतदारसंघांत शिवसेना दुसऱ्या स्थानावर होती. त्यांची एकत्रित मते अडीच लाखाच्या आसपास आहेत. विद्यमान आमदार असल्याने सर्वच जागा युतीमध्ये भाजपकडे गेल्यास शिवसैनिकांची नाराजी सहन करावी लागणार आहे. 

आरपीआयकडे कॅन्टोन्मेंट
रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) राज्यात दहा जागांची मागणी केली आहे. मुंबईपाठोपाठ या पक्षाची पुणे जिल्ह्यात ताकद आहे. गेल्या वेळी रिपब्लिकन पक्षाला पिंपरी मतदारसंघात तिरंगी लढतीत निसटता पराभव पत्करावा लागला होता. पिंपरीत शिवसेनेचा आमदार असल्याने ती जागा यंदा रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला येण्याची शक्‍यता कमी आहे. 

पुण्यातील पक्षसंघटना टिकवून ठेवण्यासाठी रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाला किमान एक जागा हवी आहे. गेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत होता. त्यांनी आता पुण्यातील वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघाची मागणी केली आहे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघ राखीव असल्यामुळे भाजपने ती जागा द्यावी, अशी अपेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला सर्वांत कमी मताधिक्‍य मिळाले आहे. 

भाजपच्या अंतर्गतही काही आमदारांना बदलण्याची मागणी जोर धरीत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत थोडीफार नाराजीही निर्माण होणार आहे. युती होणार आहे की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सध्या जोरात सुरू आहे. युती केल्यानंतर सर्व जागा भाजपकडे राखल्यास, शिवसेना व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारीही भाजपच्या नेत्यांवर येऊन पडणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गणेशोत्सवानिमित्त पुण्यात येत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही पुण्यात कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याने, पुण्यातील राजकीय सद्यस्थितीची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर मित्रपक्षांना जागा द्यायची का नाही, या बाबत भाजपला ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. 

Web Title: vidhan sabha pune candidacy dispute between shivsena and bjp
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com