विक्रम  लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू

विक्रम  लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू

बेंगळुरू : चांद्रयान २ मधील विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून आघाती अवतरणानंतर ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर कोसळले असले तरी, त्याचे तुकडे झालेले नाहीत, ते सुस्थितीत आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी स्पष्ट केले.

विक्रम लँडरमध्ये प्रज्ञान ही बग्गीसारखी गाडी आहे. चांद्रयानापासून २ सप्टेंबरला वेगळ्या झालेल्या विक्रम लँडरला अलगदपणे चांद्रभूमीवर उतरवण्याचा प्रयोग ७ सप्टेंबरला करण्यात आला. तो सुरुवातीला व्यवस्थित पार  पडला; पण अखेरच्या टप्प्यात लँडर चांद्रभूमीपासून दोन कि.मी. उंचीवर असताना त्याचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी व पृथ्वीवरील भूकेंद्रांशी संपर्क तुटला. जेथे हे विक्रम लँडर उतरणे अपेक्षित होते तेथेच त्याचे आघाती अवतरण झाले, असे ‘ऑर्बिटर’ने पाठवलेल्या छायाचित्रांतून दिसत आहे. लँडरचे तुकडे झालेले नाहीत, तर ते सुस्थितीत आहे. ते थोडे कललेल्या अवस्थेत आहे, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश आले तर नेमके काय घडले हे समजू शकेल. इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्रॅक)च्या चमूने या अवतरणात नेमके काय चुकले असावे याचा शोध सुरू केला आहे. चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम), रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग होते. लँडर आणि रोव्हरचा कार्यकाल एक चांद्र दिवस म्हणजे पृथ्वीवरील चौदा दिवसांइतका होता. चौदा दिवसांत लँडरशी संपर्क प्रस्थापित करणे आवश्यक आहे, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष शिवन यांनी सांगितले. लँडर सुरक्षित असेल तरच पुन्हा संपर्क प्रस्थापित करता येऊ शकतो. अलगद अवतरण होऊन लँडर सुरक्षित असेल तर संपर्क प्रस्थापित होण्याची आशा आहे, पण तशी शक्यता खूप कमी आहे, असे ‘इस्रो’च्या एका अधिकाऱ्याने रविवारी म्हटले होते. लँडर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता अन्य काही वैज्ञानिकांनी व्यक्त केली होती.

पुन्हा संपर्क अवघड?

चंद्रावर आधीच लँडरचे अवतरण झाले आहे. आता त्याला फिरवू शकत नाही. त्याचे अँटेना भूकेंद्राच्या दिशेने नाहीत किंवा ऑर्बिटरच्या दिशेलाही नाहीत, त्यामुळे त्याच्याशी संपर्क होणे कठीण आहे. पण अँटेना वळवता आले तर संपर्क शक्य आहे. लँडरवर सौर बॅटरी आहेत, त्या फारसा वापरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे विजेचा प्रश्न नाही. तरीही हे सर्व अवघड आहे, असे सांगण्यात येत आहे.


Web Title: Isro Locates Lander Vikram On Moon Hopes To Make Contact
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com