तिन्ही जागा टिकविण्याचे मोठे आव्हान दोन्हीही काँग्रेससमोर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

 

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतून मताधिक्‍य मिळाल्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबादेत घेतलेल्या संवाद मेळाव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळालंय. गेल्या वेळी जिल्ह्यातील या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला दोन, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येक एका जागेवर विजय मिळाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या तिन्ही जागा टिकविण्याचे मोठे आव्हान दोन्हीही काँग्रेससमोर आहे.

 

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतून मताधिक्‍य मिळाल्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबादेत घेतलेल्या संवाद मेळाव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळालंय. गेल्या वेळी जिल्ह्यातील या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला दोन, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येक एका जागेवर विजय मिळाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या तिन्ही जागा टिकविण्याचे मोठे आव्हान दोन्हीही काँग्रेससमोर आहे.

जिल्ह्यातील चारही आमदार रिंगणात आहेत. २०१४ मधील निवडणुकीत चारपैकी तीन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्या टिकविण्यासाठी आघाडीला प्रयत्न करावे लागतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदललीत. वंचित बहुजन आघाडीचीही जोरदार तयारी आहे. तुळजापूरमध्ये दोन आमदारांमध्ये चुरस आहे.

जिल्ह्यात आघाडीतून चारपैकी उस्मानाबाद, परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर तुळजापूर व उमरगा काँग्रेसकडे आहेत. युतीमधून उस्मानाबाद, परंडा आणि उमरगा मतदारसंघ शिवसेनेकडे, तर तुळजापूर भाजपकडे आहे. उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, एसपी शुगरचे अध्यक्ष सुरेश पाटील, उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्या नावांची राष्ट्रवादीकडून चर्चा आहे. येथे शिवसेनेकडून उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, जिल्हा उपप्रमुख अजित पिंगळे इच्छुक होते. मात्र शिवसेनेने जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. इच्छुक असूनही उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज असलेल्यांची भूमिका काय, याची उत्सुकता आहे. संभाजी ब्रिगेडकडून डॉ. संदीप तांबारेंनी अर्ज दाखल केलाय. वंचित बहुजन आघाडीकडून धनंजय शिंगाडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तुळजापूरमध्ये काँग्रेसचे प्राबल्य आहे. १९९९ पासून २०१४ पर्यंतच्या निवडणुकीत येथून काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाणांनी सलग विजय मिळवलाय. त्यामुळेच काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेशलेल्या माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटलांना येथून उमेदवारी मिळाली आहे.

तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे हेही भाजपकडून इच्छुक होते. पक्षश्रेष्ठींचा आदेश मानत रोचकरी यांनी माघार घेऊन राणाजगजितसिंह यांना पाठिंबा दिलाय. नळदुर्गचे उद्योजक अशोक जगदाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र धुरगुडे दोन वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीत आहेत. जगदाळे हे वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात असण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशांत नवगिरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे चौरंगी लढतीची शक्‍यता आहे.

उमरग्यावर २००४ पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. आमदार ज्ञानराज चौगुलेंनी सलग दोनदा विजय मिळवलाय. या वेळीही तेच शिवसेनेचे उमेदवार आहेत. लोकसभेवेळी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही. त्याचे पडसाद येथे उमटलेत. तेव्हापासून शिवसेनेतील एक गट चौगुलेंविरोधात सक्रिय आहे. त्याच्याशी जुळवून घेण्याचे आव्हान चौगुलेंसमोर आहे. काँग्रेसकडून दिलीप भालेराव, जालिंदर कोकणेंच्या नावाची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीकडून रमाकांत गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटेंनी सलग तीन निवडणुकीत विजय मिळवलाय. यंदा त्यांच्यासमोर शिवसेनेचे जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आव्हान असेल. परंडा, भूम आणि वाशी असे तीन तालुके मतदारसंघात आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडेंनी तिन्ही तालुकाध्यक्षांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आमदार मोटेंना परिश्रम घ्यावे लागतील.

शिवसेनेकडून उमेदवारीसाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख शंकर बोरकर, भूम तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांचेही प्रयत्न होते. या मतदारसंघात शिवसेनेत बंडखोरीची शक्‍यता आहे.

Web Title: Maharashtra VidhanSabha 2019 Osmanabad District Aghadi Yuti Politic


संबंधित बातम्या

Saam TV Live