काय आहे नातं आहे दिवाळी पाडवा आणि बारामतीतील गोविंदबागेचं

काय आहे नातं आहे दिवाळी पाडवा आणि बारामतीतील गोविंदबागेचं

.


बारामती शहर : दिवाळीचा पाडवा आणि बारामती त्यातही दिवाळीचा पाडवा आणि बारामतीतील गोविंदबाग हे अतिशय वेगळे समीकरण आहे. गेल्या काही वर्षांपासून बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने भेटायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. केवळ बारामतीच नाही तर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक अतिशय उत्स्फूर्तपणे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी गोविंद बागेत येत असतात. ही परंपरा गेल्या काही वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. सत्ता असो वा नसो पण पवार साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे त्यांची भेट घेणे, त्यांचा आशीर्वाद घेणे हा या मागचा उद्देश असतो.

पवार कुटुंबात सध्या कोण काय करतंय?

कोणी सुरू केली परंपरा
खरं तर शरद पवार यांचे थोरले बंधू स्वर्गीय अप्पासाहेब पवार यांनी पवार कुटुंबीयांनी दिवाळीत एकत्र जमावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. वर्षभर वेगवेगळ्या कामानिमित्त जगभरात फिरणारे पवार कुटुंबीय चार दिवस तरी एकत्र यावेत ही आप्पासाहेब पवार यांची इच्छा असायची. त्यानुसार त्यांनी सर्वांना वडीलकीच्या नात्याने आदेश देत सर्वांनी एकत्र यावे असे सुचवले अन त्यांच्या काळापासूनच पवार कुटुंबीय दिवाळीत एकत्र येतात ही प्रथा सुरू झाली. दिवाळीत पाडवा आणि शरद पवार यांची भेट हे अनेकांचे अतूट समीकरण असते. काहीही काम नसते पण फक्त दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी पवार साहेबांना बघून अनेकांना समाधान वाटते. अनेकांना ज्येष्ठ नेते शरद पवार हे ओळखतही नसतात. पण, लोकांच्या मनामध्ये पवार साहेबांविषयी असलेली आस्था व प्रेम हे या निमित्ताने दिसून येते.

गोविंद बागेत आवाज राष्ट्रवादीचा; हजारो कार्यकर्ते पवारांच्या भेटीला

सत्ता असो वा नसो
कितीही गर्दी असली तरीही रांगेत दीड-दोन किलोमीटर थांबून लोक शरद पवार यांना भेटत असतात. गैरसोय झाली तरी इथे कुणीही तक्रार करत नाही, अनेकदा पोलिसांना देखील ही गर्दी आवरताना प्रचंड यातायात करावी लागते. मात्र पाडव्याच्या दिवशी गोविंद बागेतलं वातावरण काही वेगळं असत. आमदार, खासदार, मंत्री असो वा सामान्य नागरिक सर्वजण फक्त एकाच ओढीने येतात. वर्षातील 365 दिवसांतील वातावरण वेगळे आणि पाडव्याच्या दिवशी बारामतीचे गोविंद बागेतील वातावरण वेगळे. दिवाळीच्या परस्परांना शुभेच्छा देत लोक याठिकाणी एकत्र येतात, ते केवळ पवार कुटुंबियांना भेटण्याच्या ओढीने सत्ता असो वा नसो शरद पवार यांचे वलय वेगळेच आहे. त्यातही दिवाळीच्या पाडव्याला त्यांना भेटणे हा अनेकांच्या दृष्टीने एक वेगळा क्षण असतो.

राष्ट्रवादीला पंक्चर गाडी म्हणणाऱ्यांना, खासदार अमोल कोल्हेंचे सणसणीत उत्तर

यंदा अभूतपूर्व गर्दी
गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीत पवार कुटुंबीय एकत्र येतात चार दिवस वर्षभरात घडलेल्या नवीन घडामोडींची माहिती एकमेकांना देतात आणि भविष्यकाळातल्या काही योजना करायच्या असतील तर, त्याची चर्चा या कुटुंबीयांमध्ये होते. मात्र, त्यातही वेगळेपण असे असते की पाडव्याच्या दिवशी राज्यभरातून येणाऱ्या लोकांना न कंटाळता भेटणे. यंदाच्या पाडव्याला इतकी प्रचंड गर्दी झाली की पोलिसांचे कडे तोडून लोक शरद पवार यांना भेटण्यासाठी धावून गेले. पोलिसांनाही गर्दी आवरताना अनेकदा कसरत करावी लागली. या गर्दीतून मार्गक्रमण करत शरद पवारांपर्यंत पोचणे अनेकांना मुश्कील होऊन बसले होते. आमदार-खासदारांनाही या गर्दीमुळे पवारांपर्यंत पोहोचायला बराच वेळ गेला.

आबांचा वारसदार पहिल्यांदाच बारामतीच्या गोविंदबागेत

बारामती आणि शरद पवार जिव्हाळ्याचे नाते
शरद पवार आणि बारामतीकर यांचे वेगळे समीकरण आहे 1967 पासून शरद पवारांनी बारामती वर निर्विवाद वर्चस्व गाजविले राजकारणापेक्षा ही पवार यांचे बारामतीतील प्रत्येक कुटुंबासोबत असलेले जिव्हाळ्याचे व घनिष्ठ संबंध हा या मागचा खरा दुवा आहे. पवार कुटुंबीयांनी बारामतीकरांशी वेगळे ऋणानुबंध जोडले आणि याचा फायदा त्यांना प्रत्येक निवडणुकीत मिळतो. किती लाटा आल्या गेल्या , पण पवारांच्या बारामतीत कधी परिवर्तन होऊ शकले नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवार राज्यात सर्वात जास्त मतांनी विजयी झाले. विरोधी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याची किमया अजित पवार यांनी घडवून दाखविली, ती बारामतीकरांच्या प्रेमाच्या जोरावरच. शरद पवार यांनी या वयात केलेला झंझावाती प्रचार , सातार मधील पावसात भिजत त्यांनी केलेली सभा आणि एकूणच त्यांच्याविषयी तरुणाईमध्ये निर्माण झालेली एक वेगळी लाट, याचा फायदा राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना मिळाला . यंदा शरद पवार यांना केवळ बघण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने गोविंद बागेत आलेली होती.

काही क्षणच शरद पवारांना पाडव्याच्या दिवशी लोकांना पाहता येते इतकी प्रचंड गर्दी येथे असते, पण तरीही त्यांना पाहिल्याचे समाधान अनेकांना वेगळेच असते त्यामुळे लोक येथे गर्दी करतात. केवळ बारामतीच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या प्रेमापोटी लोक पाडव्याला बारामतीत आवर्जून येतात. घरची दिवाळी असली तरीसुद्धा पवार साहेबांना भेटणे हा त्याचा एक वेगळा उद्देश असतो. त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेणे ही ही अनेकांची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. यंदाही ही परंपरा कायमच राहिली पवारांशी असलेल एक वेगळं नातं या निमित्ताने आज पुन्हा एकदा अधोरेखित झालं.


Web Title: diwali padwa baramati govindbag tradition information in marathi sharad pawar family

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com