विनायक मेटेंची  मंत्रीमंडळातील एन्ट्री पक्की ? 

विनायक मेटेंची  मंत्रीमंडळातील एन्ट्री पक्की ? 

बीड : मागच्या खेपेला सुरुवातीला हुलकावणी आणि नंतर ताकदीने विरोध यामुळे हक्क असूनही शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे पाच वर्षे मंत्रीपदाविनाच गेले. आता मात्र समर्थकांचा दणदणीत विजय आणि विरोध करणाऱ्यांचा पराभव यामुळे विनायक मेटे यांच्या मंत्रीपदाचा मार्ग सुकर मानला जात आहे. 

मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष महायुतीत सामिल झाला. सत्तेत वाटा देण्याच्या शब्दावर महायुतीत आलेल्या शिवसंग्रामला मागच्या निवडणुकीत तीन जागा मिळाल्या. परंतु, बीडमधून खुद्द मेटे यांचाच पराभव झाला. केवळ डॉ. लव्हेकर विजयी झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटेंसोबतची दोस्ती निभावत त्यांनी सुचविलेल्या कामांना भरघोस निधी दिला.  परंतु पंकजा मुंडे यांच्या प्रखर विरोधापुढे फडणवीस मेटेंच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ टाकू शकले नाही.

दरम्यान, यावेळी शिवसंग्रामने भाजपच्याच चिन्हावर तीन जागा लढविल्या आणि तीन्हीही जिंकल्या. तर, इकडे त्यांच्या मंत्रीपदला जोरदार विरोध करणाऱ्या पंकजा मुंडे यांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला असून त्यांच्या समर्थकांची संख्याही घटली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे विनायक मेटे यांना विरोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपले राजकीय सामर्थ्य  पुन्हा कसे वाढवायचे या प्रयत्नात असतील असा अंदाज बांधला जात आहे . त्यामुळे तीन समर्थक विजयी झाल्याने मंत्रीपदाची मागणी विनायक मेटे आता जोरदार करु शकतात. 

अगदी भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीच्या बैठकीतही मेटे हजर होते. तर, पराभूत असल्याने पंकजा मुंडेही आता मेटेंच्या मंत्रीपदाला ताकदीने विरोध करतील असे चित्र नाही. त्यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने विनायक मेटे यांच्या मंत्रीपदाचा मार्ग सुकर मानला जात आहे. एव्हाना त्यांचे नावही संभाव्य यादीत असल्याची सुत्रांची माहिती आहे.  
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com