भाजपचे संख्याबळ124 वर; शिवसेनेच्या जवळपास दुप्पट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

भाजपने सत्तास्थापनेचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले असल्याने भाजपचा इतर कोणताही नेता शिष्टाई  करत नसल्याचे चित्र आहे.

मुंबई : राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतही आठ दिवस झाले, तरी ओढाताण वाढत असल्याने सत्तास्थापनेचा घोळ अद्याप सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकसभेवेळी भाजप व शिवसेनेत सत्तेचे सूत्र ठरले होते. मात्र यानुसार सत्ता स्थापन करण्यास भाजपचा नकार असून, शिवसेनादेखील यावरच अडून बसल्याने युतीतला बेबनाव समोर आला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याने सत्तास्थापनेला विलंब होत आहे.

दरम्यान, कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने "थांबा व पाहा'चे धोरण अवलंबल्याने युतीतला तणाव अधिकच वाढीस लागल्याचा दावा करण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार विजयी झाले आहेत; तर पंधरा अपक्ष, बहुजन विकास आघाडीचे 3, शेकाप 1 असे 124 आमदारांचे संख्याबळ झाले आहे. तर शिवसेनेने स्वत:चे 54 व अपक्ष व इतर मिळून 63 आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे.  यामुळे युतीकडे जवळपास 187 आमदारांचे खणखणीत बहुमत असतानाही सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करण्याचा मुहूर्त ठरत नसल्याने दोन्ही पक्षांत अस्वस्थता वाढली आहे.

शिवसेनेला सत्तेतला अर्धा वाटा हवा असताना काही महत्त्वाचे विभागदेखील हवे आहेत; तर दुसरीकडे, भाजप मागच्या वेळीपेक्षा अतिरिक्‍त वाटा देण्यास तयार नाही. त्यामुळे युतीत एकमत झालेले दिसत नाही. केंद्रीय भाजपने सत्तास्थापनेचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले असल्याने भाजपचा इतर कोणताही नेता शिष्टाई करण्यासाठी मध्यस्थी करत नसल्याचे चित्र आहे. तर शिवसेनेकडून केवळ उद्धव ठाकरे हेच सत्ता स्थापनेची चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीस व ठाकरे यांच्यातील मनोमिलनानंतरच सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो असे सांगण्यात येते.

भाजप शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी ओढाताण सुरू असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादीने तूर्तास तरी थांबा व पाहा अशीच भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण या प्रमुख नेत्यांनी दोन दिवस अनेक वेळा चर्चा केली. भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवायचे असेल तर शिवसेनेला पाठिंबा देणे शक्‍य आहे काय याबाबतची चाचपणी देखील या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सत्तेत जाण्याऐवजी विरोधी पक्ष म्हणूनच आघाडीने काम करावे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याऐवजी विरोधातच बसण्याचा सूर कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतल्या प्रमुख नेत्यांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

WebTittle: BJP's strength at 124; Nearly twice the strength of the Shiv Sena


 

संबंधित बातम्या

Saam TV Live