कुणी काही जरी वावड्या उठवल्या तरी सरकार हे युतीचेच : धनंजय महाडिक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

महाडिक पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री फडणवीस व मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. अनेक सवलती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असून, साखरेचा हमीभाव, एफआरपी सारखा शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा, यासह पंतप्रधान किसान सन्मान योजना यासारख्या सर्वसामान्यांचे हित जोपासणारे निर्णय फडणवीस सरकारने घेतले, त्यामुळे कुणी काही जरी वावड्या उठवल्या तरी सरकार हे युतीचेच होणार असल्याचा पुनरुच्चार महाडिक यांनी केला

मोहोळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी आरूढ होतील त्यांच्या समवेत पाच मंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भीमा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी दिली. टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखाना सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर कारखान्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष महाडिक आले होते, त्यावेळी ते माहिती देत होते.

महाडिक पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री फडणवीस व मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. अनेक सवलती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असून, साखरेचा हमीभाव, एफआरपी सारखा शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा, यासह पंतप्रधान किसान सन्मान योजना यासारख्या सर्वसामान्यांचे हित जोपासणारे निर्णय फडणवीस सरकारने घेतले, त्यामुळे कुणी काही जरी वावड्या उठवल्या तरी सरकार हे युतीचेच होणार असल्याचा पुनरुच्चार महाडिक यांनी केला.

कारखान्याबाबत बोलताना अध्यक्ष महाडिक म्हणाले, चालू गळीत हंगामासाठी कारखान्याकडे 3 लाख मेट्रिक टन उसाची उपलब्धता आहे,  तेवढ्याने भागणार नाही, आणखी लागणाऱ्या उसाची  व्यवस्था करण्यासाठी कारखान्याचा शेती विभाग कामाला लागला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे कारखाना वेळेत सुरू होणार आहे. कारखान्याने दोनशे ट्रॅक्टर, दीडशे बैलगाड्या यांच्याशी ऊस वाहतुकीसाठी करार केला आहे. अद्याप ही करार सुरूच आहेत.  

दरम्यान, दररोज पाच हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. सध्या कारखाना सुरू होण्यापूर्वी करावयाची  किरकोळ कामे युद्धपातळीवर सुरू असून, सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व खाते प्रमुख त्यांच्या त्यांच्या विभागाचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्यात व्यस्त आहेत. कारखान्याचे विस्तारीकरण झाल्याने आता अतिरिक्त उसाचा प्रश्न निकाली निघाला आहे. यावेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक प्रदीप रणनवरे, शेती अधिकारी माणिक पाटील, संचालक दिलीप रणदिवे, तुषार चव्हाण, दादासाहेब शिंदे, तानाजी गुंड उपस्थित होते.
 

Web Title: former mp dhanjay mahadik criticize opposition leader
 


संबंधित बातम्या

Saam TV Live