उत्तर भारतात थंडीची लाट

उत्तर भारतात थंडीची लाट

दिल्लीत आज (ता. ३०) ९.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानाचा हा मागील शंभर वर्षांतील नीचांक आहे.

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्‍याची थंडी पडली आहे. जम्मू-काश्‍मीर खोऱ्यातील बहुतांश भागांत सोमवारीदेखील उणे तापमानाची नोंद झालेली असताना राजधानीत दृश्‍यमानता कमी झाल्याने विमानसेवेवर परिणाम झाला.

दाट धुक्‍यामुळे विमान, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
नवी दिल्ली - राजधानी दिल्ली, उत्तर भारत, पंजाब, जम्मू-काश्‍मीर, ओडिशासह देशातील अनेक राज्ये थंडीच्या कडाक्‍याने गारठली आहेत. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात सोमवारी दाट धुके होते. दिल्लीत धुक्‍यामुळे दृश्‍यमानता कमी झाल्याने हवाई व रस्ते व रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी तर शून्य दृश्‍यमानता होती.

या हंगामात प्रथमच दिल्लीत दाट धुके पडल्याचे ‘स्कायमेट’ या हवामानविषयक खासगी संस्थेने सांगितले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीला फटका बसला. चार विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, तर १९ विमानांचा मार्ग बदलण्यात आला. सुमारे ५३० विमानांना उशीर झाला. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालम विमानतळावरील दृश्‍यमानता आज सकाळी १२५ मीटरपेक्षा कमी झाली होती. दिल्लीसह उत्तर भारतातही धुक्‍याचा परिणाम आज जाणवला. दिल्लीत तीस रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या. दिल्लीत आत पहाटे साडेपाच वाजता पारा ४.६ अंश सेल्सिअसवर होता. रविवारी किमान तापमान ३.८, तर कमाल तापमान १५.८ अंश सेल्सिअस होते. 

हरियाना, पंजाबमध्ये शाळा बंद
सरकारी निवेदनानुसार, हरियानात काही ठिकाणी तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या जवळपास होते. राज्य सरकारने शाळांना मंगळवारी (ता. ३१) सुटी जाहीर केली आहे. त्यानंतर १ ते १५ जानेवारीपर्यंत शाळांना हिवाळी सुटी असेल. हरियाना आणि पंजाबमध्ये पुढील काही दिवस थंडीचा प्रकोप राहणार आहे.


जम्मू-काश्‍मिरातही थंडीची लाट असून, श्रीनगरमध्ये तापमान घसरले आहे. प्रसिद्ध दल सरोवरातील काही भागांत पाण्याचे बर्फात रूपांतर झाले आहे. काश्‍मीर खोरे आणि लडाखमध्येही थंडीची जोरदार लाट आहे.

ओडिशात सोनेपूरमध्ये आज किमान तापमान ५.४ अंश होते. मलकनगिरी येथे किमान तापमान ३०.० अंश होते. राज्यातील १६ ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते, असे भुवनेश्‍वरमधील हवामान विभागाने सांगितले.

धुक्‍यामुळे मोटार कालव्यात कोसळली; सहा जण ठार
राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात थंडीची लाट तीव्र झाली आहे. सोमवारी संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आज दाट धुक्‍यात लपटले होते. ग्रेटर नोएडात धुक्‍यामुळे अपघात होऊन सहा जण ठार झाले.

ग्रेटर नोएडात दनकौर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात आज सकाळी उत्तर प्रदेशमधील संभलहून नवी दिल्लीकडे येणारी एक मोटार धुक्‍यामुळे रस्ता न दिसल्याने सरळ कालव्यात पडली. गाडीतील ११ प्रवासी जखमी झाले. त्यांच्या ओरडण्याने ग्रामस्थांनी कालव्याकडे धाव घेतली. त्यांनी सर्व जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. धुक्‍यामुळे झालेला या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करीत याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.


दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रावर मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव जाणवणार आहे. यामुळे नव्या वर्षात १ ते ३ जानेवारीपर्यंत रात्री हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल. गुरुवारी (ता. २) गारा पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्‍त केली आहे. थंडीच्या लाटेमुळे हरियानाप्रमाणेच उत्तर प्रदेशमधील लखनौ आणि आग्रामधील शाळा उद्या बंद राहणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडातील शाळांनाही उद्या तसेच १ जानेवारीला सुटी जाहीर केली आहे. या आदेशाचे पालन करण्याचा आदेश गौतम बुद्धनगरचे जिल्हा दंडाधिकारी बी. एन. सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Web Title: Cold wave in northern India

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com