दोन दिवसांत खातेवाटप

 दोन दिवसांत खातेवाटप

मुंबई - 'मंत्रिमंडळ विस्तार ठरल्यानुसार झाला आहे. खातेवाटप आम्ही एकमेकांच्या समजुतीने केले आहे. उद्यापर्यंत ते जाहीर करू,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा रखडलेला बहुचर्चित विस्तार आज पार पाडला. यानंतर पत्रकार परिषदेला सामोरे गेल्यावर ठाकरे म्हणाले, ""शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. काही जण केवळ वाद घालत आहेत. त्यांना तेवढेच काम उरले आहे. दोन लाखांवरती ज्यांचे कर्ज आहे त्यांच्यासाठी आम्ही वेगळी योजना करतोय. जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करणारच. दीड लाखाची मर्यादा आम्ही दोन लाखांपर्यंत केली आहे. त्यापुढे जाऊन आम्ही त्यातील अटी व शर्ती काढून टाकल्या आहेत.'' 

शिवसेनेत नाराजी आहे का? सुनील राऊत यांच्यासह इतर नेते नाराज आहेत का? असे उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, 'शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, कुणाचीही नाराजी आमच्यापर्यंत आलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला, की अशा काही गोष्टी होत असतात. त्याचे काय करायचे ते पाहता येईल.''

राज्यपालांविरोधात तुमचा संघर्ष सुरू आहे का, असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. 'राज्यपालांसोबत आमचा कोणताही वाद नाही. संघर्ष नाही. के. सी. पाडवी हे उत्साहाच्या भरात बोलले. मात्र, शपथ घेताना काही संकेत पाळायचे असतात, ते त्यांनी पाळले नाहीत ;म्हणून राज्यपालांनी त्यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. यामध्ये संघर्षाचा काही प्रश्नच येत नाही. राज्यपालांनी पुन्हा शपथ घ्यायला लावली; कारण उद्या काही लोक त्यावर आक्षेप घेऊ शकतात. आपल्या राज्यात कसे लोक आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच,'' असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. 

आजच्या शपथविधी सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकला होता. त्याबाबत विचारले असता, आता त्यांच्याकडे दुसरे काम तरी कोणते उरले आहे, असा उपरोधिक सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मंत्रिमंडळात घराणेशाहीला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे; त्यावर बोलताना, "आम्ही जे करतो ते रोखठोकपणे आणि उघडउघड करतो. वाद घालणे आणि भिंती रंगवणे एवढेच काम आम्हाला नाही,' असा टोला उद्धव यांनी लगावला. 

कॉंग्रेसचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर भाजपने आक्षेप घेतला आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या दया याचिकेवर अस्लम शेख यांनी स्वाक्षरी केली होती, असे नमूद करीत हा आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी भाजपवर उलटवार केला. ""असे प्रश्न आम्हाला विचारणार असाल तर भाजपच्याही बऱ्याच गोष्टींच्या मुळाशी जावे लागेल,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: thackeray government post distribute in two days

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com