फडणवीस खडसेंना हा आनंद मिळवून देणार नाहीत....

 फडणवीस खडसेंना हा आनंद मिळवून देणार नाहीत....

devendra fadnavis will not join national politics
देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीत स्थलांतर करणार असल्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे भाजपच्या सूत्रांनी `सरकारनामा`ला सांगितले. 

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीच्या म्हणजे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांचा धुराळा उडाला आहे. फडणवीस यांना केंद्रातील मंत्रीपद मिळणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. आता या चर्चेत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही उडी घेतली आणि फडणवीस हे केंद्रात गेल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. ते दिल्लीत जाणे हे महाराष्ट्राच्या हिताचे असेल, असे सांगत खडसे यांनी देवेंद्र हे महाराष्ट्रात राहणे हिताचे नसल्याचे आडुनआडुन सांगितले होते.

`सरकारनामा`ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांची स्वतः दिल्लीला जाण्याची इच्छा नाही आणि भाजपच्या केंद्रिय नेतृत्त्वाचेही तसे कोणतेच नियोजन नसल्याचे सांगितले. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीस सक्रिय होते. अनेक प्रचार सभा त्यांनी घेतल्या. त्यानंतर त्यांना दिल्लीतच `स्थायिक` करणार असल्याच्या चर्चेने माध्यमांत जोर पकडला.

महाराष्ट्र सोडण्याचे फडणीवस यांच्या मनात नाही. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण पाहिले तर त्यांनीही राज्यातील नेता एकदा पराभूत झाल्यानंतर त्याचे दिल्लीत पुनर्वसन केलेले दिसत नाही. यात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरराजे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह ही नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. हे नेते मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यानंतर त्यांचेही डोळे दिल्लीतील मंत्रिपदाकडे होते. तसे घडलेले नाही. फडणवीस हे देखील याच नेत्यांच्या यादीत आहेत. त्यामुळे त्यांनाही हाच नियम लागू असल्याचे सांगण्यात आले.

दुसरीकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यात केव्हाही कुरबुरी होऊ शकतात. भाजपला येथे आज ना उद्या एखादा डाव सत्तेसाठी पुन्हा खेळावा लागेल. त्यासाठी फडणवीस यांची येथे गरज आहे, असेही सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात भाजपमध्ये फडणवीस यांचाच सध्या अंतिम शब्द चालतो. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे हे त्यांचे उघड विरोधक समजले जातात. मात्र या तिघांना केंद्रीय पातळीवर पाठिंबा नाही. सुधीर मुनगंटिवार हे फडणवीस यांचे छुपे विरोधक असल्याचे सांगण्यात येते. मात्र ते थेट फडणवीस यांच्या विरोधात भूमिका कधीच घेत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांच्यात दुरावा असल्याची चर्चा अधुनमधुन होत असली तरी या दोघांचे ट्युनिंग एकदम परफेक्ट असल्याचे दिसून येत आहे. विविध जिल्ह्यांत भाजपचे जिल्हाध्यक्ष नुकतेच निवडले गेले. ते दोघांच्याही परस्परसंमतीने घडले. येथेही या दोघांतील वाद कुठेच दिसून आला नाही. पाटील हे पुन्हा प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. ते देखील फडणवीस यांच्यासाठी पूरक आहे. त्यामुळे राज्यात देवेंद्र हेच भाजपचे नेतृत्त्व करतील, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना ते दिल्लीत जावे असे वाटत असले तरी सध्या तरी तसे घडणार नसल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.   

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com