देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन, त्यावर उपस्थितांनी अशी दिली दाद... 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' सांगताच "तुम्ही पुन्हा या, पुन्हा या, आम्ही वाट पाहत आहोत,' अशा शब्दांत उपस्थितांनीदेखील दाद दिली.

स्वारगेट - दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' सांगताच "तुम्ही पुन्हा या, पुन्हा या, आम्ही वाट पाहत आहोत,' अशा शब्दांत उपस्थितांनीदेखील दाद दिली. त्यामुळे पुरस्काराचा कार्यक्रम संपल्यानंतरही सभागृहात हा एकच विषय चर्चेचा झाला होता. 

निमित्त होते आधार सोशल फाऊंडेशनतर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ पहिला "अटलशक्ती' पुरस्कार वितरणाचे. या कार्यक्रमात जनसेवा बॅंकेचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी पुन्हा येणाचे सूतोवाच केले. हे सूतोवाच करताना "अटलजींच्या नावाचा हा पुरस्कार दिला जात आहे. त्यामुळे पुढील वर्षी देखील मी या कार्यक्रमाला पुन्हा येईन,' असे स्पष्ट केले; परंतु सभागृहातील उपस्थितांनी "तुम्ही मुख्यमंत्री म्हणून परत या कार्यक्रमाला या' असे जोषात सांगितले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख अनिरुद्ध देशपांडे, भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी आमदार दिलीप कांबळे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप काळोखे यांसह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी लाकडावरील कोरीवकाम करणारे ठाकूर बंधू, फुलांची सजावट करणारे सरपाले बंधू, वाद्य प्रशिक्षण देणारे संजय करंदीकर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. संतोष भन्साळी, राष्ट्रीय कला अकादमीचे  मंदार रांजेकर यांना "अटलशक्ती' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जगामध्ये सन्मान आहे. त्याची मुहूर्तमेढ अटलजींच्या नेतृत्वावेळी रोवली गेली. अणुचाचणीच्यावेळी इतर देशांसमोर भारत झुकणार नाही, हे त्यांनी त्या वेळी दाखवून दिले होते. त्यामुळे त्या वेळी जगाला अटलजींच्या व भारताच्या नेतृत्वाची शक्ती समजली होती,' अशा शब्दांत त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू फडणवीस यांनी उलगडले. 

अनिरुद्ध देशपांडे यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला; तर डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप काळोखे यांनी प्रस्ताविक केले. पराग ठाकूर, विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Aadhaar Social Foundation distributes first Atlas Shakti award

 


संबंधित बातम्या

Saam TV Live