Mumbai Local |  आजपासून मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर,पण 'हेच लोक' करू शकतात प्रवास

Mumbai Local |  आजपासून मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर,पण 'हेच लोक' करू शकतात प्रवास

मुंबई: राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. मुंबई लगतच्या उपनगरांमधून अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात मुंबईत ड्युटीसाठी ये-जा करतात. करोना विरुद्ध लढ्यात या कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ही मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही हा मुद्दा मांडला होता. आज ही मागणी अखेर मान्य झाली असून अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेने एक संयुक्त निवेदन जारी करून याबाबत घोषणा केली आहे. आजपासून तिन्ही मार्गांवर लोकलसेवा सुरू केली जात आहे. पहाटे ५.३० ते रात्री ११.३० या दरम्यान दोन्ही मार्गांवर लोकल धावतील. दर १५ मिनिटांच्या अंतराने लोकल सोडण्यात येतील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर अधिकाधिक लोकल चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार असून मोजक्या लोकल चर्चगेटहून डहाणूसाठी सोडण्यात येणार आहेत. चर्चगेटहून विरारपर्यंत या लोकल जलद धावतील तर तिथून पुढे धीम्या होतील, असेही नमूद करण्यात आले आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान ७३ फेऱ्या तर चर्चगेट ते डहाणूदरम्यान ८ फेऱ्या दिवसभरात असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर मिळून २०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा, कर्जत, कल्याण आणि ठाण्यासाठी १३० फेऱ्या तर हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून पनवेलसाठी ७० फेऱ्या असतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. या सर्व लोकल जलद असतील व प्रमुख स्थानकांवर थांबतील, असेही नमूद करण्यात आले आहे. लोकलचे वेळापत्रक कर्मचाऱ्यांच्या शिफ्टच्या वेळा ध्यानात ठेवून बनवण्यात आलं आहे.


गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज सोमवारपासून पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे मार्गांवर लोकल धावणार आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांनाच या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com