कबुतरांना धान्य टाकणाऱ्यांवर होणार कारवाई, पाहा काय आहे कारण?

साम टीव्ही
बुधवार, 9 डिसेंबर 2020
  •  
  • कबुतरांना धान्य टाकणं पडणार महागात
  • कबुतरांना धान्य दिल्यास दंडात्मक कारवाई 
  • ठाणे महापालिकेनं उगारला कारवाईचा बडगा

कबुतरांना धान्य टाकण्यास ठाणे महापालिकेनं मनाई केलीय. कबुतरांना धान्य टाकताना आढळणाऱ्या व्यक्तीला महापालिकेच्या कारवाईला सामोरं जावं लागणारंय. टाणे महापालिकेने हा कठोर निर्णय कोणत्या कारणासाठी घेतलाय. 

कबुतरांना धान्य खायला घालणं अनेकांना आवडतं...मुंबई, ठाण्यात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं मोठ्या संख्येनं कबुतरांचा वावर असतो. येणारे-जाणारे मोठ्या आवडीनं त्यांना धान्य खायला घालतात...पण ठाणे महापालिकेनं आता कडक भूमिका घेत कबुतरांना धान्य टाकण्यास सक्त मनाई केलीय. कबुतरांना धान्य टाकताना एखादी व्यक्ती आढळली तर त्या व्यक्तीला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणारंय. कबुतरांना धान्य टाकल्यास 500 रूपयांचा दंड होऊ शकतो अशा आशयाचे फलक जागोजागी लागले आहेत. 

एका अभ्यासानुसार कबूतरांच्या विष्ठेत परजीवी वाढतात. हे परजीवी हवेत संसर्ग आणखी पसरवतात. त्यामुळे श्वसनाचे विकार, फुफ्फुसांना संसर्ग आणि शरीरात ऍलर्जी होण्याचा धोका असतो.तसच कबुतरांच्या विष्टेपासून हायपर सेंसेटिव्ह न्यूमेनिया सारखे आजार बळवतात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी ठाणे महापालिकेकडे आल्या आहेत. 

कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. त्यातच कबुतरांची विष्टा न्यूमोनियासारख्या आजारांना आमंत्रण देत असल्यानं ठाणेकरांची चिंता वाढलीय. मात्र दुसरीकडे अशा मुक्या जिवांची जीवावर उठणं कितपत योग्य आहे हादेखील एक प्रश्न आहे. त्यामुळे कबुतरांचं खाणं बंद करण्यापेक्षा दुसरा कोणता पर्याय निघतो का? यावरही महापालिकेनं विचार करावा अशी मागणी प्राणीप्रेमींमधून होतीय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live