अभिनेत्री रेणुका शहाणेला विधान परिषदेवर पाठवण्याच्या मागणीमुळे काँग्रेसमधली दुफळी पुन्हा उफाळण्याची शक्यता

साम टीव्ही
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

राज्यपाल नामनिर्देशित 12 जागांचा तिढा सुटलेला नसतानाच आता काँग्रेसमध्ये एक नवं वादळ उठलंय. अभिनेत्री रेणुका शहाणेला विधान परिषदेवर पाठवा अशी मागणी मुंबई काँग्रेस सचिवांनी केलीय. त्यामुळे काँग्रेसमधली दुफळी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नामनिर्देशित 12 जागांचा तिढा सुटलेला नसतानाच आता काँग्रेसमध्ये एक नवं वादळ उठलंय. अभिनेत्री रेणुका शहाणेला विधान परिषदेवर पाठवा अशी मागणी मुंबई काँग्रेस सचिवांनी केलीय. त्यामुळे काँग्रेसमधली दुफळी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

हम आप के है कौनमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रेणुका शहाणे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. रेणुका शहाणेंना विधानपरिषदेवर पाठवा अशी मागणी मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केल्यानं राजकीय जाणकारांच्या भुवया उंचवल्या आहे. रेणुका शहाणे यांना आमदार करा अशा आशयाचं ट्विट करत जुन्नरकर यांनी थेट राहुल गांधी, काँग्रेसचे महाराष्ट्र निरीक्षक एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाच गळ घातलीय. 

आदरणीय रेणुकाजी यांना विधान परिषदेत पाठवून त्यांच्या बुद्धिमत्तेचा, उत्तम वक्तृत्वाचा, निर्भीड पणाचा फायदा महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेला व्हावा असं मनापासून वाटतं. असं ट्विट धनंजय जुन्नरकर यांनी केलंय.
 

जुन्नरकर यांच्या या मागणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार धुरळा उडालाय. काँग्रेसकडे विधान परिषदेच्या 4 जागा आहे. रेणुका शहाणे या समाजभान जपणाऱ्या अभिनेत्री आहेत. अनेक मुद्द्यांवर त्या अभ्यासपूर्ण आणि परखड भाष्य करत असतात. कंगना राणावत प्रकरणातही त्यांनी सडेतोडपणे भूमिका मांडली होती. भाजपच्या आयटी सेलला फैलावर घेतानाच खरी तुकडे तुकडे गॅंग तुमचा आयटी सेल आहे, असं रेणुका शहाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरच्या माध्यमातून थेट शब्दांत सांगितले होतं. जिथं मोठमोठे नेते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात तिथं रेणुका शहाणे निर्भीडपणे व्यक्त होतात. अशा व्यक्तीला विधान परिषदेवर पाठवून न्याय द्यावा, अशी विनंती जुन्नरकर यांनी केलीय. त्यांच्या या मागणीनं काँग्रेसच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आलाय. आता काँग्रेस रेणुका शहाणेंच्या नावाचा विचार करणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live